सांगलीच्या आजूबाजूचा परिसर जवळपास सपाट आहे. फारशा डोंगररांगा येथे दिसून येत नाहीत. तरीदेखील गुगल मॅप च्या साह्याने मी जवळच्या एका सुंदर टेकडीला शोधून काढले… दंडोबा टेकडी.
गुगल मॅपचे सर्वेक्षण केल्यानंतर इथल्या एकंदरीत परिसराचा अंदाज आला. परंतु माझ्या स्थानापासून त्याचे अंतर होते ३४ किलोमीटर. परंतु जाण्यासाठी लागणारा वेळ होता ४५ मिनिटे. अर्थात यापैकी बहुतांश प्रवास मी राष्ट्रीय महामार्गाने करणार होतो. ही जमेची गोष्ट होती. संध्याकाळी साडेपाच वाजता प्रशिक्षण संपल्यानंतर सूर्यास्त बघायलाच दंडोबाच्या टेकडीवर जाऊया, असे ठरवले. पुन्हा गुगलवर तपासून पाहिले की सूर्यास्त किती वाजता होणार आहे. त्या दिवशी सूर्यास्ताची वेळ होती सहा वाजून २५ मिनिटे. म्हणजेच एकंदरीत मला कसरत करत वेळेच्या आधी किंवा वेळेवर या ठिकाणी पोहोचायचे होते. अखेरीस साडेपाच वाजता प्रशिक्षण संपवले आणि थेट गाडी काढून दंडोबाच्या दिशेने हाकायला सुरुवात केली.
त्या दिवशी आकाश पूर्णपणे निरभ्र होते. सूर्य मावळतीकडे चालला होता. सांगलीतून मिरजेमध्ये आलो आणि दहाच मिनिटांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ला प्रवास चालू केला. महामार्गावर गर्दी बिलकुल नव्हती. माझ्या डाव्या बाजूला सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत चाललेला होता. आणि माझ्या गाडीतील वेगाचा काटा ८० च्या वर जायला लागला. जवळपास ४० मिनिटांनंतर मी भोसे गावाच्या हद्दीमध्ये आलो. आता उजवीकडे दंडोबाच्या दिशेने जाण्याकरता महामार्गावर जवळपास एक किलोमीटरचा वळसा घालायचा होता. तो देखील पार केला आणि महामार्ग सोडून डावीकडे खारशिंग गावाच्या दिशेने गाडी वळवली. सुरुवातीला रस्ता बराच खराब होता. तो हळूहळू पार करत मी सपाट काळ्या डांबरी रस्त्याला लागलो. काहीसा उंचीवर आल्याने येथून बराच लांबपर्यंतचा परिसर व्यवस्थित दिसायला लागला होता. हळूहळू गाडी टेकडीच्या दिशेने प्रवास करायला लागली. रस्ते वळणावळणाचे होते. आणि त्या दिवशी या रस्त्यावर अन्य कुठल्याच गाड्या मला दिसून आल्या नाहीत. संध्याकाळच्या वेळी पक्षांचा घरट्याच्या दिशेने परतीचा प्रवास चालू झाला होता. त्यांचे थवेच्या थवे आकाशात दिसून यायचे. मावळतीकडे चाललेल्या सूर्याशी मी लपंडाव करत, तिथल्या नागमोडी वळणांचा आस्वाद घेत, वृक्षवल्लीच्यामधून मार्ग काढत दंडोबाच्या शिखराकडे चाललो होतो. गुगल मॅपने दाखवल्याप्रमाणे अगदी शेवटच्या टोकापर्यंत कार जाण्यासारखा रस्ता होता. माझ्या गंतव्यस्थानाच्या अलीकडे दोन किलोमीटरवर दंडोबाच्या वनक्षेत्राची कमान दिसून आली. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले होते. यातून आत प्रवेश केल्यानंतर झाडी आणखी घनदाट झाल्याची वाटली. इथून दोन ते तीन मिनिटांमध्ये मी मंदिरापाशी पोहोचलो. आजूबाजूच्या घनदाट झाडीमध्ये अगदी लेण्यांच्या पद्धतीने हे मंदिर येथे बांधलेले होते. आत जाऊन आल्यानंतर लगेचच परतीचा प्रवास सुरू केला. दंडोबाच्या या एकंदरीत डोंगराच्या सौंदर्याचा मला आस्वाद घ्यायचा होता. मावळतीचा सूर्य दिसेल अशा ठिकाणी गाडी थांबवली. येथे निरव शांतता होती. फक्त पक्षांचे आणि रातकिड्यांचेच आवाज येत होते. दूरवर राष्ट्रीय महामार्गावर तुरळक गर्दी दिसून येत होती. सूर्य जवळपास क्षितिजाला टेकायला आला होता. एका नेत्रदीपक निसर्गचित्राचा आस्वाद घेत मी तिथेच उभा राहिलो. आजूबाजूच्या शेतांवर हळूहळू अंधार पसरू लागला. सूर्याचा सोनेरी प्रकाश केवळ त्यांच्या टोकावर दिसत होता. एक सुंदर निसर्गचित्र तिथे तयार झालं. जे आपण केवळ एखाद्या पेंटिंगमध्येच पाहत असतो.
— तुषार भ. कुटे
Wednesday, November 13, 2024
दंडोबा टेकडी
Tuesday, November 5, 2024
सांगली किल्ला आणि वास्तुसंग्रहालय
सांगलीमधल्या माझ्या वास्तव्यात ज्या हॉटेलमध्ये मी राहत होतो त्यांनाच इथे आजूबाजूला फिरण्यासारखी कोणते ठिकाण आहेत का? असं विचारलं होतं. त्यांचा अनेक वर्षांपासून सांगलीमध्ये हॉटेलचा व्यवसाय होता. एकंदरीत त्यांच्या अनुभवावरून त्यांनी सांगितले की, सांगली शहरामध्ये फिरण्यासारखं काहीही नाही, फार फार तर तुम्ही इथल्या गणपती मंदिरात जाऊन येऊ शकता. त्याचे हे निराशाजनक व्यक्तव्य मी फारसे मनावर घेतले नाही. आणि आपल्या चौकस नजरेने इंटरनेटवरून आजूबाजूची काही ठिकाणी शोधून काढली. त्यामध्ये मला सांगलीचा किल्ला देखील सापडला.
ऐतिहासिक पुस्तकांमध्ये कुठेतरी सांगली शहरातील भुईकोट किल्ल्याचे वर्णन ऐकल्याचे आठवते. कदाचित तो हाच किल्ला असावा, असे वाटले. गुगल मॅपवर त्याचे अंतर केवळ आठ किलोमीटर दाखवत होते. अशाच एका सकाळी किंवा संध्याकाळी तिथे जाऊन येऊ असा विचार केला. प्रशिक्षणाच्या एका दिवशी मला दुपारच्या सत्रामध्ये अनपेक्षित पणे छोटीशी सुट्टी मिळाली. हीच सत्कारणी लावण्यासाठी मी गाडी काढली आणि सांगलीच्या दिशेने कुच केले.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये नगरदुर्ग आहेत. अशाच भुईकोट दुर्गामुळे कालांतराने गावे मोठी होत गेली आणि त्यांची शहरे झाली. परंतु या किल्ल्यांच्या रूपाने अजूनही जुन्या काळातले वैभव टिकून आहे. सांगलीचा भुईकोट किल्लाही त्यातीलच एक. आज एका छोट्याशा दगडी इमारतीशिवाय तिथे दुसरे काहीही उरलेले नाही, असे दिसून आलं. कदाचित आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना देखील हा किल्ला होता किंवा आहे याचीही माहिती नसावी. सध्या या भागात सर्वच बाजूंना सरकारी कार्यालय थाटलेली दिसली. अर्थात आमच्या जुन्नरमध्ये देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. किंबहुना बऱ्याचशा गावांमध्ये आणि शहरांमध्ये अशा किल्ल्यांची जागा सरकारी कार्यालयांच्याच ताब्यात आहे. सांगलीच्या अशाच सरकारी कार्यालयांनी घेतलेल्या किल्ल्याचे मुखदर्शन केले आणि लगेचच परतीच्या मार्गाने निघालो. माझी गाडी ज्या ठिकाणी लावली होती, त्या भिंतीलाच लागून मागच्या बाजूला सांगली पुरातत्वसंग्रहालयाचा फलक दृष्टीस पडला. इथवर आलोच आहे तर हे वास्तुसंग्रहालय देखील पाहून घेऊ असा विचार केला. प्रवेशद्वारातून पुढे एका छोट्याशा बोळातून आत गेलो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्राचीन शिल्पकला केलेले अवजड पाषाण अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कदाचित जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून हे नमुने गोळा केले गेले असावेत. अर्थात सरकारी कामाची दुर्दशा या ठिकाणीही दिसून आली. ज्यांना या कलेचे महत्त्व नाही त्यांच्याच हातात कार्यालयाची दोरी असते, हेही प्रकर्षाने दिसून आले.
संग्रहालय बघण्यासाठी दहा रुपयांचे तिकीट होते. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे माझ्याकडे खिशामध्ये काहीच पैसे नव्हते. विशेष म्हणजे इथे यूपीआय पेमेंटचा देखील कोणताच पर्याय नव्हता. सदर व्यवस्थापकाला मी तुम्हाला पैसे पाठवतो आणि तुम्ही ती कॅशमध्ये भरा असं, देखील सुचवलं तरीही साहेब मानायला तयार नव्हते. सरकारी लोकांशी हुज्जत न घालता मी परत मागे फिरलो आणि गाडीमध्ये काही पैसे मिळतात का, हे बघायला लागलो. इकडच्या तिकडच्या कप्प्यांमध्ये मिळून माझ्या दुर्दैवाने बरोबर नऊ रुपयांची नाणी मला मिळाली. यावर एक रुपया देखील सापडेना. मला माहित होतं की, हा एक रुपया जरी नसेल तरी देखील मला वास्तुसंग्रहालय बघू दिले जाणार नाही. मग करायचं काय? या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयास केला. आजूबाजूच्या एक-दोन दुकानांमध्ये ऑनलाईन पेमेंट करून कॅश मिळते का ते बघितले. परंतु अनेकांनी असमर्थता दर्शवली. किल्ल्याच्या समोरच्या मैदानामध्ये कोपऱ्यावर एक चहाची टपरी होती. त्याने मात्र मला ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर लगेचच कॅशमध्ये पैसे दिले. आणि परत हेदेखील विचारले की अजून लागत असतील तर नक्की सांगा. त्याच्या या सहकार्याबद्दल कृतज्ञता म्हणून मी ते दहा रुपये घेऊन वास्तुसंग्रहालयामध्ये प्रवेश मिळवला. तसं पाहिलं तर हे संग्रहालय अतिशय छोटं होतं. परंतु त्यामध्ये प्राचीन काळातील अतिशय सुंदर खजिना मला बघायला मिळाला.
आत मध्ये अतिशय निरव शांतता होती. माझ्याशिवाय तिथे केवळ एक सुरक्षारक्षक होता. त्याने देखील गेल्यागेल्या इथे फोटो काढू नका एवढेच सांगितलं आणि स्वतःच्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसला. मी तिथल्या प्राचीन कलासौंदर्याचा आस्वाद घेत फिरायला लागलो. जुन्या काळातील मूर्ती, शिल्पकला, तैलचित्रे असं बरंच काही त्या ठिकाणी ठेवलेले होते. आपल्या पूर्वजांच्या कलागुणांना नमन करत पूर्ण वास्तुसंग्रहालय फिरून मी परतीच्या मार्गाला लागलो.
कदाचित या संग्रहालयाची माहिती अतिशय कमी लोकांना आहे. आणि शासन देखील त्याची जाहिरात करायला फारसे कष्ट घेत नाही, असे एकंदरीत दिसतं. पण त्यादिवशी सांगलीमध्ये घालवलेला तो एक तास सत्कारणी लागला याचे मात्र समाधान मिळून गेलं.
--- तुषार भ. कुटे
Monday, September 9, 2024
विलासगड दुर्ग
सांगली शहरापासून सर्वात जवळ असलेला डोंगरी किल्ला म्हणजे विलासगड होय.
निघण्याच्या आदल्या दिवशी गुगल मॅपवर त्याचे स्थान शोधले. माझ्या सध्याच्या
स्थानापासून त्यांचे अंतर होते जवळपास ४० किलोमीटर. सकाळच्या वेळी जरी
निघालो तरी किमान पाऊण तास तरी लागणार होता. म्हणून आदल्या दिवशी लवकरच
झोपलो. सकाळी साडेपाच वाजता जाग आली आणि सहा वाजेपर्यंत मी किल्ल्याची चढाई
करण्यासाठी तयार झालो होतो. हिवाळा असल्यामुळे दिवस लहान होता आणि सूर्यही
उशिरा उगवणार होता. त्यामुळे अजूनही बऱ्यापैकी अंधार पडलेला होता.
सांगलीहून निघालो तेव्हा सूर्य उगवण्याची काहीच चिन्हे नव्हती. रस्त्यावर
देखील तुरळक गर्दी होती. गाडी आष्टाच्या दिशेने लागली तोवर रस्त्यांवरील
पथदीप देखील बंद झालेले होते. सांगलीच्या बाहेर इस्लामपूरच्या दिशेने
जाणारा रस्ता बऱ्यापैकी खराब झालेला होता. शिवाय बऱ्याच ठिकाणी खड्डे देखील
पडलेले होते. त्यातूनच वेगाने वाट काढत मी आष्टाच्या दिशेने निघालो.
आष्टामध्ये पोहोचलो तेव्हा काहीसा सकाळचा संधी प्रकाश दिसायला लागला होता.
तसेच आजूबाजूची उसाची शेती देखील हिरवीगार दिसत होती. आष्टा गावातून
डावीकडे एका फाट्याने येडेनिपाणीच्या दिशेने निघालो. रस्ता वळणावळणाचा आणि
हिरव्यागार उसाच्या शेतातून जाणारा होता. सकाळच्या त्या प्रहरी या
रस्त्यावर प्रवास करणारा कदाचित मीच एकटा होतो. रस्त्यात लागलेल्या एका
गावापाशी परिवहन मंडळाची बस दिसून आली. तेव्हा हायसे वाटले. सुमारे पावणे
सात ते सातच्या सुमारास मी येडेनिपाणी गावच्या अलीकडेच डाव्या बाजूला वळण
घेतले. एव्हाना त्या डोंगरावरील मल्लिकार्जुनाचे मंदिर व्यवस्थित दिसत
होते. निघण्यापूर्वी या किल्ल्याचे तसेच किल्ल्यावरील मल्लिकार्जुनाच्या
मंदिराची छायाचित्रे आंतरजालावर पाहिली होतीच. म्हणून सदर किल्ला
ओळखण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावली.
त्यावेळी येथे येणारा कदाचित मी एकटाच असेल. या किल्ल्यावर मल्लिकार्जुनाचे
देवस्थान आहे म्हणूनच पायथ्यापासूनच भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी
अतिशय व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या दिसल्या. आजूबाजूला बऱ्यापैकी सुंदरसं
जंगल होतं. परंतु बहुतांश झाडाची पानगळ झालेली दिसली. किल्ला चढायला
सुरुवात केली आणि झपाझप पायऱ्या चढत थेट मल्लिकार्जुनाच्या मंदिरापाशीच
थांबा घेतला. जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटे इथे पोहोचायला लागली असती.
एव्हाना सूर्यदेवाने पूर्व क्षितिजावरून दर्शन दिले होते. सूर्याचा आता
कोवळा प्रकाश आसमंतात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेला दिसला. ऊस
पट्ट्यातली ती हिरवीगार शेती आता व्यवस्थित दिसायला लागली होती. दूरवरुन या
डोंगरावर दिसून आलेले मल्लिकार्जुनाचे देवस्थान आता जवळू लागलं होतं.
डोंगरात खोदलेल्या एका लेण्यांमध्ये मल्लिकार्जुन देवस्थान स्थित असल्याचे
दिसले. आतमध्ये शंकराची एक पिंडी देखील होती. मानवी कारागिरांनी खोदलेलं ते
एक सुंदर लेणं होतं. मंदिराच्या आत जाऊन आलो आणि पुन्हा मुख्य
दरवाज्यापाशी पोहोचलो. येथूनच वरच्या बाजूला जाण्यासाठी एक पायवाट देखील
दिसून आली. विलासगड दुर्गाच्या पाऊलखुणा याच भागात दिसून येतात. पाचच
मिनिटांनी किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावर पोहोचलो. इथे खऱ्याखुऱ्या दुर्ग
पाऊलखुणा दिसून आल्या. मंदिर आणि दर्गा यांच्या भिंती एकमेकांना लागलेल्या
होत्या. समोरच एक भग्न अवस्थेतील कृष्णमंदिर होते. तर दर्ग्याला लागून
विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर देखील दिसून आले. त्याच्या मागच्या बाजूला
चुन्याचा घाणा अखेरच्या घटका मोजत असलेला दिसला. दर्ग्याला वळसा घालून
पूर्वेकडे आलो तर तिथे देखील किल्ल्यावरील वाड्यांचे भग्नावशेष आढळून आले.
समोरच्या बाजूला बऱ्यापैकी मोकळे मैदान होते. किल्ल्यावरील एकमेव टाके
पाण्याअभावी सुकलेले दिसले. काही वेळ आजूबाजूचा परिसर न्याहाळून मी
परतीच्या मार्गाला लागलो. अधूनमधून तुटलेल्या तटबंदी देखील दिसून होत्या.
आणि शिवरायांच्या स्वराज्यातील किल्ल्यांवर असलेला जरीपटका इथे मनाने
डोलताना दिसून आला.
Tuesday, May 28, 2024
बहादुरवाडी
येडेनिपाणीचा विलासगड दुर्ग उतरून खाली आलो तेव्हा सव्वा आठ वाजत आले होते.
म्हणजे परत जाण्यासाठी माझ्याकडे अजून बराच वेळ होता. त्यामुळे
बहादुरवाडीला जाण्याचे नक्की केले. येडेनिपाणी मधून एक रस्ता मुंबई-बंगळूर
महामार्गाच्या दिशेने जातो. अगदी दहा मिनिटांमध्येच मी महामार्गाला
पोहोचलो. मग काय गाडी सुसाट वेगाने निघाली. थोड्याच अंतरावर पुन्हा डाव्या
बाजूला बहादुरवाडीच्या दिशेने प्रवास चालू केला.
महाराष्ट्रातल्या अन्य
गावांप्रमाणेच हे एक गाव. त्याच्या मधोमध बहादूरवाडी भुईकोट दुर्ग दिसून
येतो. रस्त्याचे काम चालू असल्याने अलीकडेच गाडी लावली आणि चालतच या
दुर्गाच्या दिशेने निघालो. भुईकोट म्हटलं की जी परिस्थिती आठवते तशाच
स्थितीमध्ये हा दुर्ग सध्या दिसून येतो. प्रवेशद्वार बऱ्यापैकी उत्तम.
परंतु आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दुर्गाची दुरावस्था दृष्टीस पडते. काही
ठिकाणी डागडूजी केल्याचे दिसते. पण बहुतांश दुर्ग एका पडक्या वाड्यासारखा
आहे. दुर्ग म्हणावा अशा खानाखुणा मात्र स्पष्टपणे दिसतात. प्रवेशद्वाराच्या
बुरुजावर जाणारा रस्ता व्यवस्थित होता. तिथून बहादुरवाडी गाव बऱ्यापैकी
दिसून येतं.
तटबंदी आणि बुरुजामध्ये जंग्या आणि झरोके आहेत.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोकळी जागा दिसते. त्यासमोरील तटबंदीत चार
दरवाजे आहेत. कदाचित या ठिकाणी जुन्या काळात घोड्यांच्या पागा असाव्यात.
आतल्या तटबंदीतून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर सगळीकडे प्रचंड झाडी
माजलेली आढळते, त्यात दुर्गाचे सगळे अवशेष हरवून गेलेले आहेत!
Tuesday, March 19, 2024
दंडोबावरील सूर्यास्त
सोलापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरून उजव्या बाजूला वळालो तेव्हा सूर्य हळूहळू पश्चिम क्षितिजाकडे निघालेला होता. दंडोबाच्या टेकडीवरील धुळीने माखलेली झाडे सूर्यप्रकाशातील रंगात वेगळ्या तऱ्हेची भासत होती.
दंडोबाला दंडवत घालून पुन्हा परतीच्या मागे मार्गाने निघालो तेव्हा सूर्य बऱ्यापैकी खाली आलेला होता. टेकडीवरच्या त्या वळणावळणाच्या रस्त्याने तो जणूकाही माझ्याशी लपंडावच खेळत होता, असे वाटले!
#dandoba #hills #sangli #maharashtra #sunset
Wednesday, October 30, 2019
इस्लामपूरची दत्त टेकडी
या छोटेखानी ट्रेकने मात्र थोडंसं का होईना समाधान प्राप्त झालं होतं.





























































