माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, May 28, 2024

बहादुरवाडी

येडेनिपाणीचा विलासगड दुर्ग उतरून खाली आलो तेव्हा सव्वा आठ वाजत आले होते. म्हणजे परत जाण्यासाठी माझ्याकडे अजून बराच वेळ होता. त्यामुळे बहादुरवाडीला जाण्याचे नक्की केले. येडेनिपाणी मधून एक रस्ता मुंबई-बंगळूर महामार्गाच्या दिशेने जातो. अगदी दहा मिनिटांमध्येच मी महामार्गाला पोहोचलो. मग काय गाडी सुसाट वेगाने निघाली. थोड्याच अंतरावर पुन्हा डाव्या बाजूला बहादुरवाडीच्या दिशेने प्रवास चालू केला.
महाराष्ट्रातल्या अन्य गावांप्रमाणेच हे एक गाव. त्याच्या मधोमध बहादूरवाडी भुईकोट दुर्ग दिसून येतो. रस्त्याचे काम चालू असल्याने अलीकडेच गाडी लावली आणि चालतच या दुर्गाच्या दिशेने निघालो. भुईकोट म्हटलं की जी परिस्थिती आठवते तशाच स्थितीमध्ये हा दुर्ग सध्या दिसून येतो. प्रवेशद्वार बऱ्यापैकी उत्तम. परंतु आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दुर्गाची दुरावस्था दृष्टीस पडते. काही ठिकाणी डागडूजी केल्याचे दिसते. पण बहुतांश दुर्ग एका पडक्या वाड्यासारखा आहे. दुर्ग म्हणावा अशा खानाखुणा मात्र स्पष्टपणे दिसतात. प्रवेशद्वाराच्या बुरुजावर जाणारा रस्ता व्यवस्थित होता. तिथून बहादुरवाडी गाव बऱ्यापैकी दिसून येतं.
तटबंदी आणि बुरुजामध्ये जंग्या आणि झरोके आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोकळी जागा दिसते. त्यासमोरील तटबंदीत चार दरवाजे आहेत. कदाचित या ठिकाणी जुन्या काळात घोड्यांच्या पागा असाव्यात. आतल्या तटबंदीतून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर सगळीकडे प्रचंड झाडी माजलेली आढळते, त्यात दुर्गाचे सगळे अवशेष हरवून गेलेले आहेत!






 

No comments:

Post a Comment