माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, November 13, 2024

दंडोबा टेकडी

सांगलीच्या आजूबाजूचा परिसर जवळपास सपाट आहे. फारशा डोंगररांगा येथे दिसून येत नाहीत. तरीदेखील गुगल मॅप च्या साह्याने मी जवळच्या एका सुंदर टेकडीला शोधून काढले… दंडोबा टेकडी.
गुगल मॅपचे सर्वेक्षण केल्यानंतर इथल्या एकंदरीत परिसराचा अंदाज आला. परंतु माझ्या स्थानापासून त्याचे अंतर होते ३४ किलोमीटर. परंतु जाण्यासाठी लागणारा वेळ होता ४५ मिनिटे. अर्थात यापैकी बहुतांश प्रवास मी राष्ट्रीय महामार्गाने करणार होतो. ही जमेची गोष्ट होती. संध्याकाळी साडेपाच वाजता प्रशिक्षण संपल्यानंतर सूर्यास्त बघायलाच दंडोबाच्या टेकडीवर जाऊया, असे ठरवले. पुन्हा गुगलवर तपासून पाहिले की सूर्यास्त किती वाजता होणार आहे. त्या दिवशी सूर्यास्ताची वेळ होती सहा वाजून २५ मिनिटे. म्हणजेच एकंदरीत मला कसरत करत वेळेच्या आधी किंवा वेळेवर या ठिकाणी पोहोचायचे होते. अखेरीस साडेपाच वाजता प्रशिक्षण संपवले आणि थेट गाडी काढून दंडोबाच्या दिशेने हाकायला सुरुवात केली.
त्या दिवशी आकाश पूर्णपणे निरभ्र होते. सूर्य मावळतीकडे चालला होता. सांगलीतून मिरजेमध्ये आलो आणि दहाच मिनिटांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ला प्रवास चालू केला. महामार्गावर गर्दी बिलकुल नव्हती. माझ्या डाव्या बाजूला सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत चाललेला होता. आणि माझ्या गाडीतील वेगाचा काटा ८० च्या वर जायला लागला. जवळपास ४० मिनिटांनंतर मी भोसे गावाच्या हद्दीमध्ये आलो. आता उजवीकडे दंडोबाच्या दिशेने जाण्याकरता महामार्गावर जवळपास एक किलोमीटरचा वळसा घालायचा होता. तो देखील पार केला आणि महामार्ग सोडून डावीकडे खारशिंग गावाच्या दिशेने गाडी वळवली. सुरुवातीला रस्ता बराच खराब होता. तो हळूहळू पार करत मी सपाट काळ्या डांबरी रस्त्याला लागलो. काहीसा उंचीवर आल्याने येथून बराच लांबपर्यंतचा परिसर व्यवस्थित दिसायला लागला होता. हळूहळू गाडी टेकडीच्या दिशेने प्रवास करायला लागली. रस्ते वळणावळणाचे होते. आणि त्या दिवशी या रस्त्यावर अन्य कुठल्याच गाड्या मला दिसून आल्या नाहीत. संध्याकाळच्या वेळी पक्षांचा घरट्याच्या दिशेने परतीचा प्रवास चालू झाला होता. त्यांचे थवेच्या थवे आकाशात दिसून यायचे. मावळतीकडे चाललेल्या सूर्याशी मी लपंडाव करत, तिथल्या नागमोडी वळणांचा आस्वाद घेत, वृक्षवल्लीच्यामधून मार्ग काढत दंडोबाच्या शिखराकडे चाललो होतो. गुगल मॅपने दाखवल्याप्रमाणे अगदी शेवटच्या टोकापर्यंत कार जाण्यासारखा रस्ता होता. माझ्या गंतव्यस्थानाच्या अलीकडे दोन किलोमीटरवर दंडोबाच्या वनक्षेत्राची कमान दिसून आली. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले होते. यातून आत प्रवेश केल्यानंतर झाडी आणखी घनदाट झाल्याची वाटली. इथून दोन ते तीन मिनिटांमध्ये मी मंदिरापाशी पोहोचलो. आजूबाजूच्या घनदाट झाडीमध्ये अगदी लेण्यांच्या पद्धतीने हे मंदिर येथे बांधलेले होते. आत जाऊन आल्यानंतर लगेचच परतीचा प्रवास सुरू केला. दंडोबाच्या या एकंदरीत डोंगराच्या सौंदर्याचा मला आस्वाद घ्यायचा होता. मावळतीचा सूर्य दिसेल अशा ठिकाणी गाडी थांबवली. येथे निरव शांतता होती. फक्त पक्षांचे आणि रातकिड्यांचेच आवाज येत होते. दूरवर राष्ट्रीय महामार्गावर तुरळक गर्दी दिसून येत होती. सूर्य जवळपास क्षितिजाला टेकायला आला होता. एका नेत्रदीपक निसर्गचित्राचा आस्वाद घेत मी तिथेच उभा राहिलो. आजूबाजूच्या शेतांवर हळूहळू अंधार पसरू लागला. सूर्याचा सोनेरी प्रकाश केवळ त्यांच्या टोकावर दिसत होता. एक सुंदर निसर्गचित्र तिथे तयार झालं. जे आपण केवळ एखाद्या पेंटिंगमध्येच पाहत असतो.

— तुषार भ. कुटे 










No comments:

Post a Comment