सांगलीमधल्या माझ्या वास्तव्यात ज्या हॉटेलमध्ये मी राहत होतो त्यांनाच इथे आजूबाजूला फिरण्यासारखी कोणते ठिकाण आहेत का? असं विचारलं होतं. त्यांचा अनेक वर्षांपासून सांगलीमध्ये हॉटेलचा व्यवसाय होता. एकंदरीत त्यांच्या अनुभवावरून त्यांनी सांगितले की, सांगली शहरामध्ये फिरण्यासारखं काहीही नाही, फार फार तर तुम्ही इथल्या गणपती मंदिरात जाऊन येऊ शकता. त्याचे हे निराशाजनक व्यक्तव्य मी फारसे मनावर घेतले नाही. आणि आपल्या चौकस नजरेने इंटरनेटवरून आजूबाजूची काही ठिकाणी शोधून काढली. त्यामध्ये मला सांगलीचा किल्ला देखील सापडला.
ऐतिहासिक पुस्तकांमध्ये कुठेतरी सांगली शहरातील भुईकोट किल्ल्याचे वर्णन ऐकल्याचे आठवते. कदाचित तो हाच किल्ला असावा, असे वाटले. गुगल मॅपवर त्याचे अंतर केवळ आठ किलोमीटर दाखवत होते. अशाच एका सकाळी किंवा संध्याकाळी तिथे जाऊन येऊ असा विचार केला. प्रशिक्षणाच्या एका दिवशी मला दुपारच्या सत्रामध्ये अनपेक्षित पणे छोटीशी सुट्टी मिळाली. हीच सत्कारणी लावण्यासाठी मी गाडी काढली आणि सांगलीच्या दिशेने कुच केले.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये नगरदुर्ग आहेत. अशाच भुईकोट दुर्गामुळे कालांतराने गावे मोठी होत गेली आणि त्यांची शहरे झाली. परंतु या किल्ल्यांच्या रूपाने अजूनही जुन्या काळातले वैभव टिकून आहे. सांगलीचा भुईकोट किल्लाही त्यातीलच एक. आज एका छोट्याशा दगडी इमारतीशिवाय तिथे दुसरे काहीही उरलेले नाही, असे दिसून आलं. कदाचित आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना देखील हा किल्ला होता किंवा आहे याचीही माहिती नसावी. सध्या या भागात सर्वच बाजूंना सरकारी कार्यालय थाटलेली दिसली. अर्थात आमच्या जुन्नरमध्ये देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. किंबहुना बऱ्याचशा गावांमध्ये आणि शहरांमध्ये अशा किल्ल्यांची जागा सरकारी कार्यालयांच्याच ताब्यात आहे. सांगलीच्या अशाच सरकारी कार्यालयांनी घेतलेल्या किल्ल्याचे मुखदर्शन केले आणि लगेचच परतीच्या मार्गाने निघालो. माझी गाडी ज्या ठिकाणी लावली होती, त्या भिंतीलाच लागून मागच्या बाजूला सांगली पुरातत्वसंग्रहालयाचा फलक दृष्टीस पडला. इथवर आलोच आहे तर हे वास्तुसंग्रहालय देखील पाहून घेऊ असा विचार केला. प्रवेशद्वारातून पुढे एका छोट्याशा बोळातून आत गेलो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्राचीन शिल्पकला केलेले अवजड पाषाण अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कदाचित जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून हे नमुने गोळा केले गेले असावेत. अर्थात सरकारी कामाची दुर्दशा या ठिकाणीही दिसून आली. ज्यांना या कलेचे महत्त्व नाही त्यांच्याच हातात कार्यालयाची दोरी असते, हेही प्रकर्षाने दिसून आले.
संग्रहालय बघण्यासाठी दहा रुपयांचे तिकीट होते. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे माझ्याकडे खिशामध्ये काहीच पैसे नव्हते. विशेष म्हणजे इथे यूपीआय पेमेंटचा देखील कोणताच पर्याय नव्हता. सदर व्यवस्थापकाला मी तुम्हाला पैसे पाठवतो आणि तुम्ही ती कॅशमध्ये भरा असं, देखील सुचवलं तरीही साहेब मानायला तयार नव्हते. सरकारी लोकांशी हुज्जत न घालता मी परत मागे फिरलो आणि गाडीमध्ये काही पैसे मिळतात का, हे बघायला लागलो. इकडच्या तिकडच्या कप्प्यांमध्ये मिळून माझ्या दुर्दैवाने बरोबर नऊ रुपयांची नाणी मला मिळाली. यावर एक रुपया देखील सापडेना. मला माहित होतं की, हा एक रुपया जरी नसेल तरी देखील मला वास्तुसंग्रहालय बघू दिले जाणार नाही. मग करायचं काय? या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयास केला. आजूबाजूच्या एक-दोन दुकानांमध्ये ऑनलाईन पेमेंट करून कॅश मिळते का ते बघितले. परंतु अनेकांनी असमर्थता दर्शवली. किल्ल्याच्या समोरच्या मैदानामध्ये कोपऱ्यावर एक चहाची टपरी होती. त्याने मात्र मला ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर लगेचच कॅशमध्ये पैसे दिले. आणि परत हेदेखील विचारले की अजून लागत असतील तर नक्की सांगा. त्याच्या या सहकार्याबद्दल कृतज्ञता म्हणून मी ते दहा रुपये घेऊन वास्तुसंग्रहालयामध्ये प्रवेश मिळवला. तसं पाहिलं तर हे संग्रहालय अतिशय छोटं होतं. परंतु त्यामध्ये प्राचीन काळातील अतिशय सुंदर खजिना मला बघायला मिळाला.
आत मध्ये अतिशय निरव शांतता होती. माझ्याशिवाय तिथे केवळ एक सुरक्षारक्षक होता. त्याने देखील गेल्यागेल्या इथे फोटो काढू नका एवढेच सांगितलं आणि स्वतःच्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसला. मी तिथल्या प्राचीन कलासौंदर्याचा आस्वाद घेत फिरायला लागलो. जुन्या काळातील मूर्ती, शिल्पकला, तैलचित्रे असं बरंच काही त्या ठिकाणी ठेवलेले होते. आपल्या पूर्वजांच्या कलागुणांना नमन करत पूर्ण वास्तुसंग्रहालय फिरून मी परतीच्या मार्गाला लागलो.
कदाचित या संग्रहालयाची माहिती अतिशय कमी लोकांना आहे. आणि शासन देखील त्याची जाहिरात करायला फारसे कष्ट घेत नाही, असे एकंदरीत दिसतं. पण त्यादिवशी सांगलीमध्ये घालवलेला तो एक तास सत्कारणी लागला याचे मात्र समाधान मिळून गेलं.
--- तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment