माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, September 9, 2024

विलासगड दुर्ग

सांगली शहरापासून सर्वात जवळ असलेला डोंगरी किल्ला म्हणजे विलासगड होय. निघण्याच्या आदल्या दिवशी गुगल मॅपवर त्याचे स्थान शोधले. माझ्या सध्याच्या स्थानापासून त्यांचे अंतर होते जवळपास ४० किलोमीटर. सकाळच्या वेळी जरी निघालो तरी किमान पाऊण तास तरी लागणार होता. म्हणून आदल्या दिवशी लवकरच झोपलो. सकाळी साडेपाच वाजता जाग आली आणि सहा वाजेपर्यंत मी किल्ल्याची चढाई करण्यासाठी तयार झालो होतो. हिवाळा असल्यामुळे दिवस लहान होता आणि सूर्यही उशिरा उगवणार होता. त्यामुळे अजूनही बऱ्यापैकी अंधार पडलेला होता. सांगलीहून निघालो तेव्हा सूर्य उगवण्याची काहीच चिन्हे नव्हती. रस्त्यावर देखील तुरळक गर्दी होती. गाडी आष्टाच्या दिशेने लागली तोवर रस्त्यांवरील पथदीप देखील बंद झालेले होते. सांगलीच्या बाहेर इस्लामपूरच्या दिशेने जाणारा रस्ता बऱ्यापैकी खराब झालेला होता. शिवाय बऱ्याच ठिकाणी खड्डे देखील पडलेले होते. त्यातूनच वेगाने वाट काढत मी आष्टाच्या दिशेने निघालो. आष्टामध्ये पोहोचलो तेव्हा काहीसा सकाळचा संधी प्रकाश दिसायला लागला होता. तसेच आजूबाजूची उसाची शेती देखील हिरवीगार दिसत होती. आष्टा गावातून डावीकडे एका फाट्याने येडेनिपाणीच्या दिशेने निघालो. रस्ता वळणावळणाचा आणि हिरव्यागार उसाच्या शेतातून जाणारा होता. सकाळच्या त्या प्रहरी या रस्त्यावर प्रवास करणारा कदाचित मीच एकटा होतो. रस्त्यात लागलेल्या एका गावापाशी परिवहन मंडळाची बस दिसून आली. तेव्हा हायसे वाटले. सुमारे पावणे सात ते सातच्या सुमारास मी येडेनिपाणी गावच्या अलीकडेच डाव्या बाजूला वळण घेतले. एव्हाना त्या डोंगरावरील मल्लिकार्जुनाचे मंदिर व्यवस्थित दिसत होते. निघण्यापूर्वी या किल्ल्याचे तसेच किल्ल्यावरील मल्लिकार्जुनाच्या मंदिराची छायाचित्रे आंतरजालावर पाहिली होतीच. म्हणून सदर किल्ला ओळखण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावली. त्यावेळी येथे येणारा कदाचित मी एकटाच असेल. या किल्ल्यावर मल्लिकार्जुनाचे देवस्थान आहे म्हणूनच पायथ्यापासूनच भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी अतिशय व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या दिसल्या. आजूबाजूला बऱ्यापैकी सुंदरसं जंगल होतं. परंतु बहुतांश झाडाची पानगळ झालेली दिसली. किल्ला चढायला सुरुवात केली आणि झपाझप पायऱ्या चढत थेट मल्लिकार्जुनाच्या मंदिरापाशीच थांबा घेतला. जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटे इथे पोहोचायला लागली असती. एव्हाना सूर्यदेवाने पूर्व क्षितिजावरून दर्शन दिले होते. सूर्याचा आता कोवळा प्रकाश आसमंतात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेला दिसला. ऊस पट्ट्यातली ती हिरवीगार शेती आता व्यवस्थित दिसायला लागली होती. दूरवरुन या डोंगरावर दिसून आलेले मल्लिकार्जुनाचे देवस्थान आता जवळू लागलं होतं. डोंगरात खोदलेल्या एका लेण्यांमध्ये मल्लिकार्जुन देवस्थान स्थित असल्याचे दिसले. आतमध्ये शंकराची एक पिंडी देखील होती. मानवी कारागिरांनी खोदलेलं ते एक सुंदर लेणं होतं. मंदिराच्या आत जाऊन आलो आणि पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो. येथूनच वरच्या बाजूला जाण्यासाठी एक पायवाट देखील दिसून आली. विलासगड दुर्गाच्या पाऊलखुणा याच भागात दिसून येतात. पाचच मिनिटांनी किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावर पोहोचलो. इथे खऱ्याखुऱ्या दुर्ग पाऊलखुणा दिसून आल्या. मंदिर आणि दर्गा यांच्या भिंती एकमेकांना लागलेल्या होत्या. समोरच एक भग्न अवस्थेतील कृष्णमंदिर होते. तर दर्ग्याला लागून विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर देखील दिसून आले. त्याच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा अखेरच्या घटका मोजत असलेला दिसला. दर्ग्याला वळसा घालून पूर्वेकडे आलो तर तिथे देखील किल्ल्यावरील वाड्यांचे भग्नावशेष आढळून आले. समोरच्या बाजूला बऱ्यापैकी मोकळे मैदान होते. किल्ल्यावरील एकमेव टाके पाण्याअभावी सुकलेले दिसले. काही वेळ आजूबाजूचा परिसर न्याहाळून मी परतीच्या मार्गाला लागलो. अधूनमधून तुटलेल्या तटबंदी देखील दिसून होत्या. आणि शिवरायांच्या स्वराज्यातील किल्ल्यांवर असलेला जरीपटका इथे मनाने डोलताना दिसून आला.


















No comments:

Post a Comment