कोल्हापुरातून निघालो तेव्हा वातावरण पूर्णपणे ढगाळ होते. अधून मधून पावसाची एखादी सर यायची. ती सुद्धा फक्त रस्ता ओला करण्यापुरतीच. यंदाच्या दमदार पावसाने राधानगरीचा रस्ता हिरव्यागार वनराईने फुललेला होता. पाऊण-एक तासानंतर आम्ही खिंडी वरवडे गावामध्ये पोहोचलो. आणि उजवीकडे राधानगरी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागलो. पावसाळ्यातल्या अन्य रस्त्यांप्रमाणेच बऱ्याच ठिकाणी याही रस्त्याची स्थिती दिसत होती. पण ती देखील सुरुवातीलाच. पुढे गेल्यानंतर रस्ता बऱ्यापैकी ठीकठाक होता. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये, डोंगरदर्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याने आम्ही मार्गक्रमण करत चाललो होतो. डोंगरमाथ्यावरील ढगांची गर्दी वाढत चाललेली होती. आणि वातावरण देखील ढगांमुळे अधिक गडद झाल्याचं भासत होतं.
वळणावळणाचे ते रस्ते पार करत आम्ही दाजीपूर अभयारण्यामध्ये शिरलो. गव्यांसाठी हे अभयारण्य सुप्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी तशा पाट्या देखील लावलेल्या दिसल्या. धुके आणि पावसाचा खेळ पूर्ण रस्त्याने चालूच होता. अधेमध्ये एखादं गाव लागायचं. त्यातील वस्ती देखील फार मोठी नव्हती. गावाकडच्या जीवनाचे प्रतिबिंब अनुभवत आम्ही फोंडा घाटाच्या दिशेने निघालो. अगदी थोड्याच वेळामध्ये राधानगरी धरणाचा जलाशय दिसून आला. दोन-तीन दिवसांपूर्वीच हे धरण १००% भरले होते. शिवाय त्याचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडले होते. परंतु पाण्याची एकंदरीत आवक पाहता धरण १००% च्या पातळीवरच स्थिर असावे असे वाटून गेले. धरणाच्या उत्तरेकडून जंगलामधून जाणाऱ्या रस्त्याने आम्ही हळूहळू चढत्या दिशेला चाललो आहोत, असे वाटत होते. डाव्या बाजूला निसर्ग झाडीतून राधानगरीचा जलाशय सातत्याने नजरेस पडत होता तर उजवीकडे डोंगरांवरून खळाळते झरे आणि धबधबे देखील दृष्टीस पडत होते. याच रस्त्यावर राऊतवाडीचा सुप्रसिद्ध धबधबा देखील दिसून आला. लाल मातीच्या पाण्यामुळे त्याचा रंग लालसर दिसून येत होता. येथूनच वळसा घालून आम्ही डोंगर झाडीमध्ये प्रवेशकर्ते झालो. एव्हाना रस्त्याची गर्दी पूर्णपणे नाहीशी झाली होती. मंद धुक्याच्या वातावरणात प्रवास करत आणि पावसाचे तुषार अंगावर झेलत त्या हिरव्या झाडीतून आम्ही पुढे निघालो होतो.
सह्याद्रीच्या अशा छत्रसावलीमध्ये निसर्गाचे वर्षा ऋतूतील अप्रतिम सौंदर्य दृष्टीस पडते. ते किती साठवू आणि किती नको, या प्रश्नाचे उत्तर देखील आपण सातत्याने शोधत राहतो. असेच काहीसे त्या दिवशी आमच्या बाबतीत देखील घडले.
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Saturday, September 14, 2024
दाजीपूरच्या अभयारण्यातून
लेबल्स
अभयारण्य,
कोल्हापूर जिल्हा,
धरण,
पावसाळा,
राधानगरी तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment