माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, July 28, 2024

श्री ग्रामदेव लक्ष्मीनारायण मंदिर, खोला

काल अगोंदच्या दिशेने निघालो तेव्हा रस्त्यामध्येच हे मंदिर दिसून आले होते. दक्षिण गोव्यातील खोला गावामध्ये एका दाट झाडीमध्ये हे मंदिर वसलेले दिसले. अगोंदमधून निघालो तेव्हा सर्वप्रथम नवीन रिसॉर्ट शोधायचे होते. परंतु रस्त्यामध्येच हे मंदिर लागले. म्हणूनच सर्वप्रथम मंदिराच्या दिशेने गाडी मिळवली. एव्हाना पाऊस थांबलेला होता आणि सूर्यप्रकाश पडलेला होता. त्यामुळे त्या लख्ख सूर्यप्रकाशात खोला गावातील लक्ष्मीनारायणाचे मंदिर अधिकच उठून दिसत होते. आजूबाजूला डोंगरदऱ्या आणि त्यावर पावसाळ्यामध्ये अधिक खुललेली गर्द वनराई, अशा नेत्रसुखद परिसराच्यामध्ये हे मंदिर वसलेले दिसले. त्या दिवशी मंदिरामध्ये कोणीही नव्हते, अगदी कोणीही. आजूबाजूला झाडांमधून केवळ पक्षांचे आवाज येत होते. कोकणातल्या आणि गोव्यातल्या मंदिरांची स्थापत्यशैली जवळपास एक सारखीच दिसून येते. अशाच पठडीतली उत्तम रंगसंगती असणारे हे एक मंदिर होते. मंदिराच्या छतावर बहुदा त्याच्या  डागडुजीचे काम चालू असावे, असे दिसून आले. त्याच्या मागच्याच बाजूला नारळाच्या दाट बागा होत्या. मंदिर आतून अतिशय स्वच्छ आणि सुंदर असे होते. भिंतीवर देखील कुठेही डाग नाही किंवा जमिनीवर देखील कचरा दिसून येत नव्हता. आतमध्ये गेल्यावर मंदिरातील कलाकुसर नजरेस भरून आली. सुमारे १६ व्या शतकामध्ये हे मंदिर बांधल्याचे समजते. खोला गावातील ग्रामदेवता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. याशिवाय अन्यही काही मूर्ती येथे दिसून आल्या. इतक्या सुंदर मंदिराला माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून आम्ही लगोलग तिथून निघालो.








No comments:

Post a Comment