माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, August 27, 2024

केशवराज मंदिर

कोकणातील सर्व सुप्रसिद्ध मंदिरे ही समुद्रकिनाऱ्यावर वसलेली आहेत. जसे गणपतीपुळे, वेळणेश्वर, कुणकेश्वर, हरिहरेश्वर इत्यादी. परंतु दापोलीतील मागच्या भेटीमध्ये आम्हाला असे एक मंदिर मिळाले जे घनदाट झाडीमध्ये आणि डोंगरावर वसलेले होते.
दापोलीच्या मुरुडमध्ये आमचा मुक्काम होता. इथूनच सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असूद गाव आहे. गावातील व्याघ्रेश्वर-गारंबी रस्त्यावर काही अंतरावर डावीकडे खालच्या दिशेने जाणारा एक रस्ता दिसून येतो. या पायवाटेने आम्ही चालत चालत जंगलामध्ये प्रवेशकर्ते झालो. कोकणातील इतर जंगलांप्रमाणे हे देखील एक घनदाट जंगल होते. सुरुवातीला पायवाट उताराच्या दिशेने जाणारी होती. दाट झाडी असली तरी बऱ्यापैकी मनुष्यवस्ती या ठिकाणी दिसून आली. आजूबाजूला नारळी, पोफळी, सुपारी आणि फणसाची झाडे जी कोकणामध्ये निसर्ग अस्तित्वाच्या पाऊलखुणा आहेत, दिसून येत होते. सात ते आठ मिनिटांमध्ये आम्ही उतार संपवून सपाटीवर पोहोचलो. समोर एक निर्जल ओढा होता. यावर सुंदरसा पूल देखील बांधलेला होता. ओढ्यातील खडकांची रचना पाहता पावसाळ्यामध्ये इथे वेगाने पाणी वाहत असावे, असे दिसले. ओढा संपला आणि पुन्हा चढण सुरू झाली. इथून पुढे बऱ्यापैकी पायऱ्यांची रचना केलेली होती. जितकी उतरण आम्ही उतरून आलो तेवढीच चढण चढून डोंगराच्या दिशेने निघालो होतो. अगदी पाचच मिनिटांमध्ये मंदिरापाशी पोहोचलो. मंदिर पूर्ण घनदाट जंगलामध्ये असले तरी आजूबाजूला बऱ्यापैकी मनुष्यवस्ती होती. विष्णूचे हे केशवराज मंदिर चहूबाजूंनी वनराईने घेरलेले दिसले. कदाचित अलीकडच्या काळात मंदिराभोवती दगडांचे कुंपण देखील केले असावे. त्याला एक छोटासा दरवाजा होता. त्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक पाण्याचा खळाळता प्रवाह देखील दिसून आला. समोरच दिसत असलेल्या एका गोमुखातून हे पाणी वेगाने खाली पडत होते. तो एक पाण्याचा जिवंत झरा होता. मागील बाजूच्या डोंगरावरून हे पाणी २४ तास मंदिराच्या कडेने वाहत खाली जात होते. शिवाय हे पाणी पूर्णपणे पिण्यायोग्य होते. निसर्गाच्या कुशीतून वाहणारे असे थंड पाण्याचे झरे सह्याद्रीच्या रांगेत बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. याची शितलता आणि स्वच्छता कदाचित बाटलीतल्या पाण्याला देखील येत नाही.
मंदिरामध्ये आम्ही काही काळ व्यतीत केला. इथल्या निसर्गराईचा आनंद घेतला. आणि पुन्हा परतीच्या वाटेला लागलो.












No comments:

Post a Comment