माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, August 13, 2024

पणजी

शेकडो वर्षे गोवा प्रांतावर पोर्तुगीजांची सत्ता होती. याच कारणास्तव आजही गोव्यात पोर्तुगीजांच्या बहुतांश पाऊलखुणा नजरेस पडतात. त्यात प्रामुख्याने किल्ले आणि चर्च यांचा समावेश होतो. याशिवाय गोव्याची राजधानी असणाऱ्या पणजी मध्ये पोर्तुगीज वास्तुकलेच्या रचना आजही पाहायला आणि अनुभवायला मिळतात. समाज माध्यमांवर गोव्यातील फाउंटन हास या भागाचे विविध छायाचित्रे व्हायरल झालेले पाहायला मिळतात. किंबहुना पणजीची ती ओळखच असल्यासारखी आहे. पणजी शहराच्या मध्यवर्ती भागात बांधलेल्या इमारती आजही पोर्तुगीज वास्तुशैलीमध्ये वसलेल्या दिसतात.
राष्ट्रीय महामार्ग सोडून आम्ही पणजी शहरामध्ये या ठिकाणी दुपारी बाराच्या सुमारास पोहोचलो असू. त्या दिवशी आठवड्यातला मधला दिवस होता. शिवाय पावसाळा चालू असल्याने शहरांमध्ये पर्यटकांची गर्दी देखील नव्हती. म्हणूनच शोधत शोधत
पणजीच्या अल्टींनो टेकडी भागामध्ये आलो. इथे शहरातल्या छोट्या छोट्या गल्ल्या दिसून येत होत्या. हा संपूर्ण भाग रहिवाशी आहे. म्हणून मुख्य रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि पायीच रस्त्यांवर आम्ही फिरू लागलो. प्रत्येक घराचा रंग वेगवेगळा आहे. त्याची रचना भारताच्या अन्य भागामध्ये कुठेही दिसून येत नाही. अशी रंगीबेरंगी घर इथल्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये दिसून येतात. त्यातून फिरलं की, कुठल्यातरी वेगळ्याच देशात फिरत आहोत असा भास होतो.
समाजमाध्यमांवर इथे बनवलेले रील्स लोकप्रिय झाल्यामुळे बहुतांश शनिवार-रविवारी इथे पर्यटकांची गर्दी होत असावी.  कदाचित याच कारणास्तव इथल्या रहिवाशांनी येथे ‘फोटोग्राफीला परवानगी नाही’चे फलक देखील लावलेले आहेत. तरीदेखील आम्ही त्या गल्ल्यांमधून फिरून ठिकठिकाणी फोटो काढले. अर्थात या ठिकाणी फोटो काढले नाही तर पणजीमध्ये फिरण्याची भावनाच तयार होत नाही,हे ही तितकच खरं.









1 comment: