बेतुल किल्ल्याची छोटेखाणी सफर पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा काबो-दे-रामाच्या दिशेने वळवला. पुन्हा नाकेरीतून दक्षिणेकडे निघालो. आणि अगदी दहाच मिनिटांमध्ये काबो-दे-रामाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी पोहोचलो. या ठिकाणी किनाऱ्याच्या अलीकडे थोडे खाली जात एक बीच रिसॉर्ट होते. परंतु समुद्रकिनारा कुठेही दिसून येत नव्हता. म्हणून तिथेच एकाला रस्त्याविषयी विचारले. तेव्हा त्याने इथला समुद्रकिनारा डोंगराच्या खालच्या बाजूला आहे, असे सांगितले. या समुद्रतटावर देखील आम्ही उंच भागावर होतो आणि समुद्र खाली. वातावरण ढगाळ होतं, मात्र विरळ ढगांमुळे सूर्य नेमकी कोणत्या दिशेला आहे हे लक्षात येत होतं. आणि याच कारणास्तव सूर्याची मंद किरणे समुद्रामध्ये पडलेली होती. आम्ही चालत चालत उत्तरेच्या दिशेने निघालो. याच रस्त्यावर अनेकांची ये-जा होती अर्थात यावरूनच समुद्रकिनारा याच दिशेला असावा, हे लक्षात आले. २०० ते ३०० मीटर चालल्यानंतर दूरवर खाली काबो-दे-रामाचा समुद्रकिनारा दृष्टीस पडला. आम्हाला हा डोंगर उतरून खाली जावे लागणार होते. त्यामुळे वाट काढत काढत आम्ही उतरणीला लागलो. या ठिकाणी छोटीशी गर्द झाडी देखील होती. त्यातूनच पायऱ्या पायऱ्यांचा रस्ता समुद्रकिनाऱ्याकडे जात होता. यातून माग काढत आम्ही खाली उतरत आलो. आणि समोर समुद्रकिनारा दिसला. समुद्र इथेही खवळलेलाच होता. त्याचे पात्र विस्तीर्ण नव्हते, त्यामुळे कदाचित या ठिकाणी समुद्रपातळी खोल असावी, असे वाटले. उजव्या बाजूला दूरवर समुद्रकिनाऱ्यावर लाटा वेगाने आदळत होत्या. निसर्गाचा तो अद्भुत नजारा डोळ्यात साठवत या किनाऱ्याचा आनंद आम्ही घेतला. अर्थातच ऑफ-सीजन आणि सप्ताहातील दिवस असल्याने गर्दी फारशी नव्हती. परंतु गोव्याच्या किनाऱ्यावरील एका सुंदर समुद्रकिनाऱ्याची दृश्ये आम्ही डोळ्यात साठवली आणि परतीच्या मार्गाला लागलो.
No comments:
Post a Comment