माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, August 2, 2024

होली क्रॉस पॉइंट

नवीन रिसॉर्टमध्ये आम्ही सेट झालो होतो. दुपारच्या जेवणानंतर आजूबाजूला फिरायचे ठरवले. येथून जवळच समुद्रकिनाऱ्यावरचा होली क्रॉस पॉइंट होता. तो पाहण्यासाठी निघालो. अधून मधून पावसाचा शिडकावा होतच होता. परंतु त्यात जास्त जोर नव्हता. म्हणून आम्ही मुक्तपणे फिरू शकत होतो. रिसॉर्टहून निघाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्येच डावीकडे समुद्राच्या दिशेने वळण घेतले. पुढे जाणारा रस्ता बऱ्यापैकी पाण्याने भरलेला होता. शिवाय त्यामध्ये खाचखळगे देखील होते. म्हणून रस्त्याचा आणि पाण्याचा अंदाज घेण्यासाठी तिथेच थांबून राहिलो. दोन तीन गाड्या गेल्यानंतर आम्ही देखील आमची गाडी अंदाज घेत घेत रस्त्याने पुढे नेली. पाण्याच्या कडेकडेने रस्ता शोधत आम्ही समुद्रकिनाऱ्यापाशी पोहोचलो. खरे तर हा किनारा नव्हताच. समुद्राच्या काठावरील उंच ठिकाणी वसलेला हा दृश्यबिंदू म्हणजे होली क्रॉस पॉइंट होय. इथे पोहोचलो तेव्हा वारे वेगाने वाहत होते. कदाचित याचमुळे समुद्रदेखील खवळलेला होता. समुद्राच्या लाटांचा आवाज रौद्ररूप धारण करत असल्याचे जाणवले. लाटा वेगाने खडकांवर आदळत होत्या. पाऊस जवळपास थांबलेला होता परंतु वाऱ्यामुळे त्या ठिकाणी उभे राहणे काहीसे अवघड होत होते. परंतु एकंदरीत नजारा हा नेत्रदीपक असाच होता. एका बाजूला दूरवर पसरलेल्या समुद्र आणि दुसरीकडे गर्द वनराई. फोटो काढण्यासाठी ही एक उत्तम जागा होती.


 


 

No comments:

Post a Comment