होली क्रॉस पॉइंट पाहून झाल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा काल येताना रस्त्याने लागलेल्या बेतुल किल्ल्याकडे वळवला. ओएनजीसीच्या प्लांटला लागूनच समुद्राच्या दिशेने तटावर हा किल्ला बांधलेला आहे. मुख्य रस्त्यातून एक छोटी वाट समुद्राच्या दिशेने किल्ल्याकडे जाते. या ठिकाणी साळ नदी समुद्राला मिळते तिच्याच तटावर हा किल्ला बांधलेला आहे. अगदी समुद्राला लागूनच किल्ल्याची तटबंदी आजही शाबूत असल्याची दिसते. परंतु अवशेष अतिशय नगण्य प्रमाणात दिसून येतात. आम्ही किल्ल्याच्या दिशेने चालायला लागलो तेव्हा सूर्य बरोबर आमच्या समोर होता. उजव्या बाजूला साळ नदीचे विस्तीर्ण खोरे दिसून येत होते. त्याच्या पलीकडून समोरच्या डोंगरावर बेतुलचे लाईट हाऊस देखील नजरेस पडले. डाव्या बाजूला थोडे अंतरावर किल्ल्यावर जाण्यासाठी अत्यंत पडीक अशी पायवाट दिसून आली. येथे किल्ला आहे की नाही हे देखील लक्षात येत नाही. समोरच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडी दिसून येत होती. कदाचित हाच किल्ला असावा, असा कयास आम्ही बांधला. आणि समुद्राच्या कडेकडेने चालत निघालो. समोर काठावर एक छोटेखानी मंदिर बांधलेले दिसले. त्याच्याच बरोबर मागच्या बाजूला एक जीर्ण तटबंदी दिसून आली आणि याच तटबंदीवर एक तोफेची नळी देखील दिसून आली. यावरून किल्ल्याची खरीखुरी पाऊलखूण आम्हाला नजरेस पडली. या तोफेच्या नळीशिवाय किल्ला म्हणावं असं इथे सध्या काहीही उरलेलं नाही. समोर दिसतो फक्त तो विस्तीर्ण समुद्र आणि साळ नदीचे खोरे. असं म्हणतात की इसवी सन १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी करवून घेतली होती. गोवा प्रांतात असलेल्या शिवाजी महाराजांचा हा एकमेव किल्ला होता.
No comments:
Post a Comment