त्या छोटेखानी जलाशयाच्या काठावर पोहोचलो तोवर संध्याकाळ झाली होती. सूर्य त्याच्या पुढच्या प्रवासाच्या वाटेला क्षितिजाखाली जाऊ लागला होता. अंजनेयाच्या पर्वताचे ते दोन सुळके सूर्याला रात्रीपूर्वीचा नमस्कार करण्यासाठी स्थिर उभे होते. सूर्यकिरणे जलाशयामध्ये जेव्हा पडली तेव्हाचा सोनेरी अविष्कार निसर्गाच्या एका चमत्काराची अनुभूती देऊन जात होता. बराच वेळ मी त्या जलाशयाच्या काठावर सूर्याकडे पाहत होतो. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी बंध असतो. कदाचित हाच बंध जल, वायू, प्रकाश आणि पर्वत यांच्यामध्ये देखील असावा, असे चित्र त्या सायंकाळी समोर उभे राहिले.