माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Thursday, October 31, 2024

वरंध घाट

भोर पासून महाडच्या दिशेने निघाल्यावर सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये वरंध घाट लागतो. दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यामध्ये या घाटातून जाण्याचा पहिल्यांदाच योग आला. आतापर्यंत त्याचे नाव केवळ वर्तमानपत्रांमध्येच वाचत होतो. परंतु दापोलीच्या एका सहलीच्या निमित्ताने या घाटातून पहिल्यांदाच प्रवास केला.

पुणे जिल्ह्यातील निरा-देवघर धरण लागले की मुख्य घाट रस्ता सुरू होतो. परंतु इथवर येईपर्यंत रोहिडा किल्ला आणि रायरेश्वराच्या पठाराचे देखील आपल्याला दर्शन होते. उन्हाळा असल्याने नीरा-देवघर धरणामध्ये तेव्हा जास्त पाणी नव्हते. परंतु दुसऱ्यांदा जेव्हा या घाटातून जाण्याचा योग आला तेव्हा मात्र धरण जवळपास शंभर टक्के भरले होते. त्याचे दर्शन जेव्हा पहिल्यांदा होते तिथून बऱ्याच अंतरापर्यंत आपण या धरणाच्याच कडेकडेने प्रवास करत राहतो. आणि जवळपास अर्धा पाऊण तासाच्या प्रवासानंतर पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या वरंध घाटातील सीमेवर येऊन पोहोचतो. इथूनच समोर कावळागड दृष्टीस पडतो. पावसाळ्यातला आमचा इथला प्रवास अतिशय सुखद होता. घाटाच्या मध्यभागी जिथून सह्याद्रीचे उंचच उंचकडे दिसतात तेथे पावसाची जोरदार फलंदाजी चालू होती. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणावरून स्वराज्याचे साक्षीदार असणारे राजगड आणि तोरणा किल्ला देखील दिसतात. या किल्ल्यांचे दर्शन घेणे हा एक नेत्र सुखद अनुभव असतो. पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असते. शिवाय इथले रस्ते देखील बरेचशे अरुंद आहेत. घाटातून जास्त गर्दी दिसून येत नाही. पावसाळ्यातला अनुभव हा मात्र मनाला प्रसन्न करणारा असतो. दूर दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगरांवर दाट धुके दाटलेले असते आणि बऱ्याचदा सातत्याने रिमझिम पाऊस कोसळत असतो. पावसाचे दोन महिने झाल्यानंतर या ठिकाणी दिसणारी हिरवाई पाहण्याकरिता तरी या घाटातून एकदा जायलाच हवे.

 

 










Sunday, October 27, 2024

कातळशिल्प

महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पूर्व भागातील डोंगरांमध्ये प्राचीन काळी खोदलेल्या लेण्या आढळतात तशीच कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये काळ्या पाषाणातील भूभागावर कोरलेली कातळशिल्पे देखील आढळतात. यापूर्वी बातम्यांमधून, लेखांमधून मी याविषयी वाचले व ऐकले होते. परंतु यंदाच्या गणपतीपुळ्याच्या भेटीमध्ये पहिल्यांदाच हे कातळशिल्प पाहायला मिळाले. गणपतीपुळे ते संगमेश्वर रस्त्यावर अगदी थोड्याच अंतरावर डावीकडे रस्त्यालगतच अशाच प्रकारचे एक कातळशिल्प कोरल्याचे दिसते. अगदी अलीकडच्याच काळामध्ये त्या भोवती संरक्षणभिंत देखील बांधलेली दिसून येते. काळ्या पाषाणातील जमिनीवर दहा हजारपेक्षा अधिक वर्षांपूर्वी हे कातळ शिल्प कोरले असावे असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. आम्ही या ठिकाणी पाहिलेले शिल्प हे मानवी आकृतीशी जुळत होते, परंतु ती आकृती मानवाची देखील नव्हती. त्याच्या शेजारीच आणखी एका प्राण्याचे शिल्प देखील दिसून आले. या कातळ शिल्पांचा निश्चित अर्थ अजूनही पुरातत्ववेत्यांना लागलेला नाही. पण कोकणाच्या प्राचीन इतिहासामध्ये त्यांचं निश्चित काहीतरी वेगळं स्थान असणार हे मात्र निश्चित. इंटरनेटवर शोधलेल्या माहितीनुसार अशी बरीच विविध प्रकारची शिल्पे कोकणामध्ये सापडलेली आहेत.  आमची अजूनही बरीच कातळ शिल्पे पहायची बाकी आहेत. कदाचित पुढच्या भेटीमध्ये ही मनोकामना पूर्ण होऊ शकेल.