सांगली शहर सांगली जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. अगदी थोड्याच अंतरावर कोल्हापूर जिल्ह्याची हद्द लागते, हे मला त्यादिवशी प्रवासात पहिल्यांदा समजले. एके दिवशी सकाळीच नृसिंहवाडी अर्थात नरसोबाच्या वाडीला जाऊन यायचे होते. गुगल मॅपवर अंतर बघितले तर केवळ २३ किलोमीटर. अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर हे पवित्र स्थळ स्थित असल्याचे दिसून आले. बरोबर सकाळी सहा वाजता सांगलीहून निघालो. एव्हाना सूर्योदय देखील झालेला नव्हता. मिरज पार झाले आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १०६ ओलांडून मी पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यामध्ये प्रवेश केला. रस्ता अतिशय सुंदर होता. वळणावळणाचा आणि कुठेही खड्डा नसलेला. थोड्याच अंतरावर सांगली जिल्हा संपला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी प्रवेश केला. मुबलक पाण्याचा प्रदेश असल्याने चहूबाजूंना हिरवीगार शेतं दिसून येत होती. बहुतांश ठिकाणी सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये धुक्याची चादर तयार झाल्याची येथील दिसून आली. एके ठिकाणी कृष्णा नदीचा पूल ओलांडला. शिरोळ गाव मागे पडले आणि थोड्याच वेळात मी नरसोबाच्या वाडीमध्ये प्रवेश केला. त्या दिवशी सकाळी तिथे बऱ्यापैकी शांतता होती. एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले की हळूहळू इथली वर्दळ वाढत जात असावी. मी पोहोचलो त्यावेळेस अतिशय तुरळक गर्दी त्या ठिकाणी दिसून आली. दोनच मिनिटांमध्ये मी कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या मंदिरामध्ये पोहोचलो. पाण्याचा प्रवाह स्थिर होता. आजवर दर पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीच्या पुराच्या बातम्या बघत आलो होतो. शिवाय हीच नदी या मंदिराच्या पायथ्यापर्यंत जलाभिषेक करते असे देखील व्हिडिओ पाहिले होते. आज पहिल्यांदा नदी आणि मंदिर दोघांचेही दर्शन झाले. इथून समोरच कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे. त्या ठिकाणी तर कोणीच नव्हते. दोन्ही नद्या शांत आणि संथपणे वाहत होत्या. संगमाच्या ठिकाणी दलदलीच्या भागामध्ये बरेच पक्षी विहार करताना दिसून आले. त्यांची चलबिचल न्याहाळत काही काळ मी तिथेच थांबलो. सात वाजून गेल्यानंतर हळूहळू कृष्णेच्या पलीकडून सूर्यदेव दर्शन देताना दिसले. पंचगंगेच्या पलीकडे एक जुन्या काळातील वास्तू देखील दिसून येत होती. मंदिराचे दर्शन झाल्यानंतर नदीला वळसा घालून ती वास्तू देखील पाहूया असे ठरवून मी येथून निघालो.
No comments:
Post a Comment