कोकणातल्या प्रत्येक प्रवासामध्ये किमान एक तरी किल्ला पाहता येतो. यावेळी आम्ही वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या किल्ले निवतीला भेट दिली. खवणे गावापासून अर्ध्याच तासाच्या अंतरावर कोकणातील वळणावळणाचे रस्ते पार करत आम्ही पोहोचलो. दुपारचे ऊन बऱ्यापैकी होते. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या निवती गावातून एक डांबरी रस्ता किल्ल्याच्या दिशेने जात होता. त्याच रस्त्याने आम्ही थेट किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. सोमवार असल्याकारणाने येथे फारशी गर्दी नव्हतीच. गाडी ज्या ठिकाणी लावली तेथून समुद्रकिनारा व्यवस्थित दिसत होता. समोरच भोगवे किनारा दिसून आला. आणि दूरवर खोल समुद्रामध्ये डोंगर देखील दिसून येत होते. यापैकीच एका खडकावर निवतीचा दीपस्तंभ अर्थात ‘लाईट हाऊस’ बांधलेले आहे.
निवतीचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम झाल्यानंतर लगेचच या किल्ल्याची बांधणी झाली, असे इतिहास सांगतो. करली नदीचे खोरे आणि वेंगुर्ला यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली असावी. आज तो पूर्णपणे भंगलेल्या स्थितीत असल्याचे दिसते. क्रांती रेडकरच्या ‘काकण’ या चित्रपटामध्ये हा किल्ला दाखवलेला आहे. तेव्हापासूनच तो पाहण्याची माझी उत्सुकता होती.
आज किल्ल्याचे बुरुज पावसामुळे माजलेल्या दाट झाडीमध्ये भग्नावस्थेत लपल्याचे दिसून येत होते. किल्ल्याकडे जाणारी पायवाट देखील एकावेळी केवळ एकच जण जाऊ शकेल, इतकी रुंद होती. जाताना आजूबाजूला पडलेले पाषाणाचे अवशेष दृष्टीस येत होते. मध्यवर्ती भागात देखील पहारेकर्यांची देवडी, बुरुज आणि तटबंदी या वास्तू हा किल्ल्याचा भाग आहे, असं आपल्याला वारंवार सांगताना दिसत होत्या. या दुर्गाच्या शेवटच्या टोकावर एक ध्वजस्तंभ दिसून आला. येथून खालच्या बाजूला जाण्यासाठी रस्ता असावा असे वाटले. समोरच समुद्रकिनाऱ्यावर सोनेरी रंगाचे खडक दिसून आले. एखाद्या विशिष्ट रासायनिक प्रक्रियेतून त्यांचा रंग असा झाला असावा असे वाटते. किल्ल्याचा घेर हा अंदाजाने बांधता आला नाही. कदाचित इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्या ताब्यात हा किल्ला आल्यानंतर त्याची बहुतांश पडझड झाली असावी असं वाटलं. परतीच्या मार्गावर जाताना निवतीच्या छोटेखानी समुद्रकिनाऱ्याची देखील दर्शन झाले.
--- तुषार भ. कुटे.
#दुर्ग #किल्ला #कोकण #भटकंती #समुद्र #किनारा #महाराष्ट्र #मराठी #शिवाजी_महाराज
Wednesday, March 19, 2025
किल्ले निवती
Wednesday, March 12, 2025
किल्लेनिवती दीपस्तंभ
खवणेवरून सकाळीच सुनामी आयलँड बघण्यासाठी निघालो. कोकणातल्या त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करत आम्ही समुद्राच्या दिशेने चाललो होतो. परंतु एका ठिकाणी या सुनामी बेटाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने रस्ता बंद केलेला होता. म्हणूनच पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. हा रस्ता अगदीच कच्चा होता. परंतु आंब्यांच्या बागांमधून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने जात होता. गुगल मॅपचा आधार घेत आम्ही या रस्त्याने चालू लागलो. थोड्याच अंतरावर असलेल्या किनाऱ्यावरील झाडीपाशी पोहोचलो. इथेच गाडी पार्क केली. गुगल मॅपवर इथून सुनामी बेट अगदीच जवळ दिसत होते. आणि त्याच्या पलीकडे देवबागचा समुद्रात आलेला पट्टादेखील दिसून येत होता. गाडी पार्क केल्यानंतर चालतच झाडींमधून रस्ता काढत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. समोरच देवबाग किनारा दिसून येत होता. याच ठिकाणी आम्हाला विश्वेश भेटला. त्याची स्वतःची बोट होती. आलेल्या पर्यटकांना देवबाग, भोगवे, निवती या परिसरातील पर्यटन स्थळांवर फिरवून आणायचे आणण्याचे काम तो करत होता. त्यादिवशी त्याने आम्हाला इथल्या परिसराची तसेच तो करत असलेल्या सफरीची माहिती दिली. सुट्टीचा दिवस नसल्याने त्या दिवशी काहीच गर्दी नव्हती. आणि विशेष म्हणजे समुद्र देखील शांत होता.
समुद्रात सुमारे १५ किलोमीटर आतमध्ये काही छोटी छोटी बेटे आहेत. यापैकीच एका बेटावर दीपस्तंभ उभारलेला आहे. याची माहिती विश्वेशने आम्हाला दिली. तिथल्या समुद्राच्या राईडविषयी तो आम्हाला सांगू लागला. आम्ही देखील विचार मंथन करून अखेरीस दोन अडीच तासांच्या या समुद्र प्रवासासाठी तयार झालो. त्याने लगेचच आपली बोट समोर किनाऱ्याला लावली. आणि आमचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम आमची बोट निघाली सुनामी बेटाकडे. सुनामीने वाहून आलेल्या वाळूमुळे तयार झालेले हे बेट. करली नदी देवबागच्या समुद्राला जिथे मिळते त्याच ठिकाणी हे बेट तयार झालेले आहे. बहुतांश वेळा ते पाण्याखालीच असते. इथे अनेक छोटी छोटी दुकाने आहेत. आणि समुद्रातील खेळ देखील येथे खेळता येतात. अशा प्रकारचं बेट कोकणामध्ये मी पहिल्यांदाच अनुभवले!
सुनामी बेटावरून आम्ही आमच्या मुख्य वाटेला लागलो. बोट थेट निवतीच्या दीपस्तंभाकडे निघाली. समुद्राच्या दोन्ही बाजूंना दाट नारळाची झाडे दृष्टीस पडत होती. म्हणूनच की काय देवबागच्या या भागाला महाराष्ट्राचे केरळ देखील म्हणतात. देवबागचा समुद्रामध्ये आलेला भाग जिथे संपतो त्या ठिकाणी सीगल पक्षांवरून नाव दिलेले ‘सीगल बेट’ देखील त्याने आम्हाला दाखवले. त्यादिवशी ते पूर्णपणे पाण्यामध्ये होते. सुनामी येण्यापूर्वी देवबाग या बेटापर्यंत होते, असे त्याने आम्हाला सांगितले. परंतु आता किनारा बऱ्यापैकी मागे सरकलेला दिसतो.
सीगल बेट मागे पडल्यानंतर आम्ही समुद्रसफरीच्या मार्गाला लागलो. यापूर्वी पद्मदुर्ग, जंजिरा, सुवर्णदुर्ग अशा जलदुर्गांना भेट देताना समुद्रात बोटींद्वारे प्रवास केला होता. परंतु आजचा हा प्रवास सर्वात लांबचा ठरणार होता, हे मात्र नक्की. अगदी थोड्याच अंतरावर डॉल्फिन माशांची देखील गर्दी आम्हाला पाहायला मिळाली. या माशांचे भक्ष असणारे अन्य मासे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने येथे डॉल्फिन नियमित पाहता येतात. परंतु चित्रपटांमध्ये जसे पाहतो तसे डॉल्फिन फार उंच उडत नव्हते. कदाचित त्यांच्या वजनामुळे त्यांना ते जमत नसावे!
सुमारे पाऊण तासाच्या प्रवासानंतर समुद्रातली ती छोटी छोटी बेटे दिसायला लागली. मागे समुद्रकिनारा आता पूर्णपणे हरवून गेला होता. चहूबाजूंनी केवळ समुद्रच समुद्र दृष्टीस पडत होता. इतक्या खोल समुद्रामध्ये आम्ही त्या दिवशी पहिल्यांदाच प्रवास करत होतो. आतली ही छोटी छोटी बेटे वैशिष्ट्यपूर्ण अशी होती. पूर्णपणे दगडाची आणि टोकदार. कदाचित समुद्रातील ज्वालामुखी मुळे तयार झाली असावीत, असं वाटून गेलं. रस्त्यामध्ये समुद्राच्या पाण्यावर तरंगणारं एक कासव देखील दृष्टीस पडलं. अर्थात समुद्रामध्ये होणार ते पहिलं कासव मला त्यादिवशी दिसलं. समुद्र-डोंगरांच्या मधून प्रवास करत आम्ही सर्वात पहिल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण बेटापाशी आलो. या बेटाला मध्यभागी एक गुहा असल्यासारखी दिसत होती. त्याबद्दल विश्वेशने आम्हाला सविस्तर माहिती सांगितली. या गुहेमध्ये पाकोळी पक्ष्यांची अगणित घरटी आहेत. त्यांची एकेकाळी येथे तस्करी व्हायची. केरळहून आलेले तस्कर या पाकोळ्यांना पकडण्यासाठी जाळे लावत असत. परंतु आज असं काहीही संभवत नाही. या बेटाला गोल फेरी मारून आम्ही मागच्या बेटाच्या दिशेने निघालो. या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे स्कुबा डायव्हिंग देखील केले जाते. अर्थात इथले पाणी देखील तशाच प्रकारचे आहे.
आता समोर दिसणारे बेट या द्वीप समूहातील सर्वात मोठे बेट होते. आणि याच बेटावर समोर दीपस्तंभ दिसून आला. त्याला किल्लेनिवती चे नाव दिलेले आहे. हा दीपस्तंभ इंग्रजांनी बांधलेला आहे. आणि या ठिकाणी लक्ष ठेवण्याकरता एका व्यक्तीची देखील नियुक्ती केलेली आहे. चहूबाजूंनी समुद्राने वेढलेल्या या भागात एकट्याने राहणे किती अवघड असेल, याची प्रचिती तो भाग पाहिल्यानंतर येते. या बेटावर अजूनही बरीच बांधकामे दिसून आली. त्याच्या खालच्या भागात समुद्राच्या वेगवान प्रवाहानंतर एका कपारीतून उडत असलेल्या पाण्याचे दृश्य देखील आम्हाला दिसले. याला ‘म्हातारीची चूळ’ असे म्हणतात. परंतु त्या दिवशी समुद्र बऱ्यापैकी शांत असल्याने म्हतारीच्या या चूळीमध्ये फारशी ऊर्जा नव्हती. आमची बोट बराच वेळ इथे थांबून होती पण पाण्याचा प्रवाह स्तब्ध असल्याने त्यातील त्यातील ऊर्जा या कपारीतून अनुभवता आली नाही.
बेटाला गोल फेरी मारत आम्ही पुढच्या बेटाकडे आलो. ही बेटे जरी असली तरी यांना किनारा नाही. वैशिष्ट्यपूर्ण खडक समुद्रातून थेट सरळ वर आलेले आहेत, असं दिसतं. शेजारच्या एका बेटामध्ये समुद्राचा प्रवाह आतमध्ये जात होता आणि दुसऱ्या बाजूने बाहेर येत होता. निसर्गाचा हा जलखेळ पाहण्याची मजा काहीतरी वेगळीच होती. त्या दोन बेटांच्या मधून आमची बोट पुढे गेली. दुसऱ्या एका बेटाच्या आतमध्ये समुद्र प्रवाहातून जाऊन आम्ही परत मागे आलो. एव्हाना आणखी दोन बोटीदेखील या प्रवासामध्ये आम्हाला दृष्टीस पडल्या. शेजारच्या दुसऱ्या बेटावर ब्रिटिशांपूर्वी पोर्तुगीजांनी बांधलेला आणखी एक दीपस्तंभ दृष्टीस पडला. हा बऱ्यापैकी जीर्ण झालेला होता. या ठिकाणी मात्र कोणीही राहत नव्हते. याची उंची ब्रिटिशकालीन दीपस्तंभापेक्षा कमी होती. समुद्र खवळलेला असताना पोर्तुगीजांच्या या दीपस्तंभापर्यंत पाण्याच्या लाटा सहज पोहोचत असतील, इतपत त्याची उंची होती. या दीपस्तंभाला मागे टाकत आम्ही सर्वांच्या मध्यभागी आलो. अर्थात या ठिकाणी आमचा प्रवास खऱ्या अर्थाने समाप्तीकडे चाललेला होता. एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी बांधून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. विशेष म्हणजे संपूर्ण प्रवासामध्ये या ठिकाणची इत्यंभूत माहिती विश्वेशने आम्हाला सांगितली. आम्ही भोगवे समुद्रकिनाऱ्यावरून निघालो होतो. परंतु जेवणासाठी त्याने आम्हाला पलीकडे देवबागला सोडले. जेवण झाल्यानंतर तो न्यायला देखील आला. आणि परत आमच्या गंतव्यस्थानी त्याने आम्हाला सोडले. एका अविस्मरणीय प्रवासाचा जवळपास तीन साडेतीन तासानंतर विराम झाला.
यात एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. आमचा सारथी विश्वेश याने अतिशय नम्रपणे सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती दिली. प्रवासासाठी पाणी विकत घेण्यासाठी देखील त्यानेच मदत केली. जेवणासाठी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने आम्हाला देवबागला सोडले होते. आणि पुन्हा तिथून शेवटच्या स्थळी देखील सोडले. यानंतरच त्याने आमच्याकडून ठरलेले पैसे घेतले. त्याने आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता. खरंतर आजच्या व्यावसायिक युगामध्ये अशी माणसं क्वचितच सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कोकणातली अशी साधी भोळी माणसं आपल्याला नजरेस पडतात. त्यातीलच तोही एक.
— तुषार भ. कुटे
#कोकण #सिंधुदुर्ग #दीपस्तंभ #निवती #समुद्र #देवबाग #भोगवे