माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, March 28, 2020

नाणेघाट: एका थरारक प्रवासाची कहाणी

नाशिकला असताना अनेकदा सोलो ट्रेकिंग करण्याची संधी मला मिळाली. अशा संधी मी सहसा सोडत नसे. परंतु 'सोलो ट्रॅव्हलिंग' अर्थात एकट्यानेच प्रवास करण्याची संधी एकदाही चालून आलेली नव्हती. अनेकदा सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि निसर्गाचं वेड आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. असाच काहीसा प्रकार माझ्याबाबतीत त्यादिवशी घडला. घराबाहेर मस्त ढगाळ वातावरण आहे...  पावसाच्या हळूहळू सरी पडत आहेत आणि आपण मस्त घरी बसून त्याचा नजारा बघतोय, ही गोष्ट मला नेहमीच विचित्र वाटत आली आहे! अर्थात त्या दिवशी सोबत कोणीच नव्हते. त्यामुळे याला पर्याय नव्हता. पण, अगदीच चलबिचल झाल्यावर मी मात्र एकट्यानेच फिरायला जायचे ठरवले. जुन्नर हे माझे नेहमीच आवडते ठिकाण. इथे जितकं फिरू तितकं कमीच आहे. पुणे जिल्ह्यातल्या पश्चिम टोकावरचा नाणेघाट हे माझं सर्वात आवडतं ठिकाण! इथे मी दरवेळेसच काहीतरी नव्याने पाहत असतो. असंच यावेळीही काहीतरी नव्याने करायचं ठरवलं होतं. पण हातात गाडी नव्हती आणि जोडीदारही नव्हता! मग एक मोपेड मॅनेज केली. परंतु जोडीदार काही मिळाला नाही. मग काय...  एकट्यानेच जायचं ठरवलं. जी गाडी मिळाली होती ती चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता. शिवाय हेल्मेटही नव्हतं. मग रुमाल तोंडाला बांधून काम चालवावं लागलं.
जुन्नर मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चार रस्ते जातात. इथून नाणेघाटाकडे जाणारे दोन रस्ते आहेत. पहिला रस्ता आपटाळे मार्गे 25 किलोमीटरचा आहे तर दुसरा माणिकडोह धरणामार्गे 45 किलोमीटरचा आहे. आपटाळे वरचा रस्ता तर फार पूर्वीपासून ओळखीचा आहे. परंतु माणिकडोह आणि हडसर किल्ल्याकडून जाणारा रस्ता यापूर्वी केवळ दोनदाच वापरला होता. हा रस्ता मात्र अत्यंत खराब आहे, याची जाणीव आधीपासूनच होती. पण म्हटलं, चला काही तरी वेगळे करुया आणि मी माणिकडोह चा रस्ता पकडला! नाणेघाट माहित नाही असा ट्रॅकर आणि इतिहास संशोधक महाराष्ट्र शोधून सापडणार नाही हे त्याचे वैशिष्ट्य खास आहे. अशीच भुरळ मलाही पहिल्यापासून पडली आहे. शिवाय पावसाळा आणि नाणेघाट यांचा अतूट नात आहे. जणूकाही नाणेघाटाचा सौंदर्य फुलवण्यासाठी पावसाळा दरवर्षी येत असतो. हेच सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी माझा प्रवास नाणेघाटाच्या दिशेने चालू झाला.
जुन्नर मधून निघालो तेव्हा तिथे उन-पावसाचा खेळ चालू होता. परंतु मला खात्री होती की, नाणेघाटात निश्चितच पाऊस पडत असावा. हीच आशा मनात धरून माणिकडोहच्या रस्त्याला लागलो. उजव्या बाजूला लेण्याद्री आणि गणेश खिंडीचे डोंगर अतिशय सुंदर भासत होते. पावसाळ्यामुळे नटलेली हिरवाई मनाला प्रसन्न करत होती. त्यातच माणिकडोह धरणाच्या निसर्गरम्य रूप दृष्टीस पडले. कुकडी नदीवर हे पहिलेच धरण आहे. या धरणाच्या उजव्या बाजूचा घाट रस्ता नाणेघाटाच्या दिशेने जातो. धरणाच्या समोरच्या बाजूस बिबट्या संवर्धन केंद्र उभारलेले आहे. इथून पुढचा रस्ता बऱ्यापैकी घाटवळणाचा आहे. रस्त्यावरच्या राजूर गावाच्या अलीकडे एक छोटीशी पायवाट धरणाच्या दिशेने जाते. तिथून पुढे चावंड किल्ला न्याहाळता  येतो. या किल्ल्याच्या मागे कुकडेश्वरची डोंगर रांग आहे. इथवर आलो तोपर्यंत पावसाची सुरुवात झालीच नव्हती. हलक्या सरी पडत होत्या. राजुरच्या पुढे गेल्यावर समोर अजस्त्र हडसर किल्ला दिसू लागला. जीवधन आणि चावंड नंतर हडसर हा नाणेघाटाचा तिसरा पहारेकरी होय. साधारण तीन वर्षांपूर्वी आम्ही हडसरचा पहिला आणि शेवटचा ट्रेक केला होता. तीच आठवण मनाला स्पर्श करून गेली. किल्ल्याचे बेलाग कडे तो किती अजस्त्र आहे याची आठवण करून देत होते. याच किल्ल्याच्या शेजारी एका उंच डोंगरावर मांगणी देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती ढगांच्या शिवाशिवीचा खेळ पहावयास मिळाला. हडसर किल्ल्यावरही पावसाचा वर्षाव सुरू झाल्याचा दिसत होता. हडसर आणि चावंड हे दोघेही पहारेकरी माणिकडोह च्या जलाशयामुळे वेगळे झाल्याचे दिसते.
इथून पुढे मात्र रस्त्यांची अवस्था खरोखर बिकट झाल्याची दिसत होती. विरळ वस्तीमुळे या भागात लोकसंख्या तशी कमीच. त्यामुळे इथे येणाऱ्या वाहनांची संख्याही कमी होती. म्हणूनच कदाचित वर्षानुवर्ष रस्त्यांची अशीच अवस्था असावी. कधीतरी पंधरा वीस मिनिटानंतर एखादे वाहन रस्त्यावर दिसायचे. दोन्ही बाजूला उंचच उंच डोंगर आणि त्यावर चालणारा ढगांचा खेळ...  हा एका बाजूने आकर्षक आणि दुसऱ्या बाजूने भयावह वाटत होता. कारण, अशा खडतर रस्त्यावर एकट्याने प्रवास करायचा म्हणजे थोडं रिस्कीच होतं. पुढे निमगिरी किल्ला दिसायला लागला आणि मनातले विचार मात्र बदलू लागले होते. कारण याच किल्ल्यापासून एक रस्ता थेट नगर-कल्याण हायवे ला मिळतो. इथून परत करण्याचा विचार मनात आला. परंतु मोहीम अशीच वाऱ्यावर सोडणाऱ्या मधला मी नव्हतो. त्यामुळे पुन:श्च विचार करून मार्गक्रमण करू लागलो. रस्त्याच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी हिरवीगर्द झाडी पसरलेली होती. अनेक ठिकाणी साठलेली तळी आणि वाहणारे झरे खरोखर निसर्गसौंदर्याची वेगळीच अनुभूती देताना देत होते. हळूहळू मनुष्यवस्ती मात्र पूर्ण विरळ झाली होती. मधेच एखादे विरळ वस्तीचे गाव लागायचे. त्यातही माणसांची संख्या नगण्य. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी आणि डांबर यांचा मागमूसही नव्हता. त्यामुळेच खडी नसलेला खडतर प्रवास या रस्त्यावर करावा लागला. इथल्या देवळे गावापर्यंत नारायणगाव डेपोची बस येत असते. या बसेस खिळखिळ्या का झाल्या? हे या प्रवासाने मात्र समजले. आता मात्र ढगांची गर्दी आणि पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली होती. अंगात घातलेल्या पावसाळी जॅकेट पूर्णपणे निष्प्रभ ठरू लागले होते. अर्थात पूर्णपणे नखशिखांत भिजण्याची ही एक सुरुवात होती. चहूबाजूंनी अंगावर पावसाच्या सरी वेग धरू लागल्या. त्यात गाडीची अवस्था तर बिकट झाली होती. पण ती तग धरून राहिली हे मात्र विशेष! अंगावर येत असलेल्या भयंकर पावसाने नाणेघाट जवळ येण्याची चाहूल लागली होती. खडतर रस्ते आणि अंगावर येणारा जोरदार वारा यामुळे मला अनेकदा विश्रांती घ्यावी लागली. अंजनावळे हे या रस्त्यावरचे सर्वात शेवटचे गाव. ते संपलं की, नाणेघाटातलं घाटघर गाव लागते. मोबाईलची रेंज पूर्णपणे संपलेली होती. शिवाय पावसाचा जोर होता त्यामुळे मी तो गाडीच्या डिकीत टाकून ठेवला. रस्त्यावर चालणाऱ्या एका गावकऱ्याला विचारल्या वर समजले की, अंजनावळे अजून पाच किलोमीटर अंतरावर आहे! पावसाचा जोर काही कमी होण्याचे नाव घेईना. त्यामुळे हे पाच किलोमीटर कधी सरतील असं झालं होतं. पावसाच्या जोराबरोबरच थेंबांचा आकारही वाढत चाललेला होता. त्यामुळे अंगावर अक्षरशः छोटे छोटे दगड पडत आहे की काय, असं वाटत होतं. एकंदरीतच माझा प्रवास प्रत्यक्ष ढगांमधून चाललाय की काय? अशी विनोदी शंकाही मला आली! पावसामुळे अगदी दोन-तीन मीटरवरही नीट दिसत नव्हतं. आजूबाजूला वस्ती नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी साठलेलं. रस्ता कसाबसा दिसत होता, हे माझ्या मी भाग्य समजलं! त्यामुळे पाच किलोमीटर पन्नास किलोमीटर सारखा भासत होतं. निमगिरीचा रस्ता पकडायला हवा होता?, असा पश्चातापवाचक प्रश्नही मनात येऊन गेला. पण मी धीर सोडला नाही. नेटाने पावसात गाडी चालवत राहिलो. माझ्या आजूबाजूला दूर-दूरपर्यंत चिटपाखरूही नव्हतं. याची त्या भर पावसात मला मला खात्री वाटत होती. नाणेघाट आणि पावसाचं खरखुरं नातं आज मी अनुभवत होतो. अखेर अंजनावळे गाव आलं आणि मनाला धीर देऊन गेलं.  इथून नाणेघाटाच्या अर्थात घाटघरच्या दिशेने जाणारा रस्ता बऱ्यापैकी चांगला होता. काळं कुळकुळीत डांबर दिसत होतं आणि त्यावर पावसाचे थेंब बदाबदा आदळत होते! त्यामुळेच रस्ता अक्राळविक्राळ भासू लागला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाताची मोठी शेती, त्यात भरलेले पाणी एका महासागरा सारखे भासत होतं आणि मी डांबरी रस्त्यावरून माझी मोपेड चालवत होतो. एखादा वाऱ्याचा प्रवाही मला रस्त्याच्या खाली ढकलू शकत होता. त्यामुळे तसा विचारही मनात आला नाही. पुढे थोडासा पाऊस कमी झाल्यासारखा वाटला आणि गोंगाट ऐकू यायला लागला. आला नाणेघाटाचा रस्ता...  याची जाणीव झाली आणि हायसे वाटायला लागले.  पावसाच्या एका अजस्त्र शिडकावातून मी बाहेर आलो होतो. घाटघर गाव दिसू लागलं होतं आणि नाणेघाट कडे जाणारा रस्ताही. नेहमीप्रमाणे नाणेघाटात दिसणारे उडाणटप्पू पर्यटक येथेही दिसले. त्यांचा गोंगाट इथे खूप झालेला होता. घाटघरचा जीवधन किल्ला मात्र नखशिखांत ढगांमध्ये बुडलेला होता. नाणेघाटाच्या दिशेने पर्यटकांची वर्दळ चालू झालेली दिसली. पुढे घाटाच्या दिशेने नव्हता मी चावंडच्या दिशेचा परतीचा प्रवास सुरू केला इथून जुन्नर फक्त वीस किलोमीटर अंतरावर राहिले होते अर्थात या रस्त्याने जाऊन मी माणिकडोह धरणाची एक परिक्रमा पूर्ण करणार होतो. या रस्त्यावरच पाऊस बऱ्यापैकी कमी होता आणि गर्दीही जास्त होती. पावसाचे मोठे मोठे प्रवाह रस्त्यावरून वेगाने माणिकडोह धरणाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. शिवाय डोंगररांगाही हिरव्या प्रफुल्लित झालेल्या होत्या. अंगावरच्या पावसाळी जॅकेटचा फक्त वाऱ्यापासून बचाव करण्यापुरताच उपयोग झाला. पावसाचं त्याचा मात्र काही संबंध नव्हता.
लवकरच कुकडेश्वर आले आणि चावंड किल्ला दिसू लागला. कुकडेश्वर चा शंभू डोंगर अंगावर येतो की काय, असं भासत होतं. रस्त्याकडेचे धबधबे आता स्पष्ट दिसत होते. केवळ पंधरा मिनिटातच आपटाळे गाव लागले आणि पावसाचा जोर जवळपास संपुष्टात झाला होता. पावसाने व्यापलेला एका भयावह गुहेतून बाहेर आल्याची अनुभूती मला झाली. पाऊस आणि नाणेघाट मार्ग यांचे काय नात आहे, हे मात्र पुरेपूर समजलं! एका थरारक प्रवासाचा अनुभव मन प्रसन्न करणारा होता. असा अनुभव यापूर्वी कधी आला नव्हता आणि कदाचित पुढे कधी येईल याचा योग वाटत नाही!










2 comments: