माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, March 4, 2020

थरारक केंजळगड

दिनांक १९ फेब्रुवारी २०२०, शिवजयंती

यंदाच्या शिवजयंतीला थोडा हटके किल्ला करावा असा बेत होता. त्यातूनच आमची किल्ले केंजळगड व रायरेश्वराची गडभ्रमंती निश्चित झाली. ज्ञानेश्वरीला सोबत घेऊन केलेला हा सतरावा किल्ला होय.
मागे रोहीड्याच्या भ्रमंतीमध्ये किल्ल्यावरून केंजळगडाचे भौगोलिक स्थान लक्षात आले होते. त्यामुळे रस्त्याची बर्‍यापैकी माहीती होती. शिवाय गुगल मॅपची सोबत तर नेहमीच असते. आम्ही तिघे, प्रतीक व सुमेध असे पाच जण यावेळी किल्ला सर करणार होतो. केंजळगड तसा पुणे जिल्ह्याच्या टोकावर असणारा किल्ला होय. परंतु, प्रत्यक्ष पायथ्याच्या गावात पोहोचल्यावर समजले की, तो सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात येतो! तीन चार किलोमीटरचा घाट चढल्यावर घाटातच ओवरी वस्ती नावाचे बहुतेकांनी आदिवासी गाव आहे. तिथून किल्ल्याची खरी चढण चालू होते. डोंगरावरील डांबरी रस्त्याच्या घाटामुळे ६० ते ७० टक्के चढण कमी झालीये. तदनंतर जवळपास अर्ध्या तासाचा रस्ता उरतो. आम्हाला इथवर पोहोचता-पोहोचता साडेनऊ वाजले होते. ऊन पडू लागलं होतं. परंतु, किल्ल्यावर जाणारी वाट ही जंगलातील असल्याने उन्हापासून संरक्षण होण्याची शक्यता होती. दहा-पंधरा घरांची वस्ती असलेल्या या गावातही सातारा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेपासूनच समोर जाणारा रस्ता पुढे गावात व उजवीकडून किल्ल्याच्या दिशेने जातो. या हमरस्त्याने आमची पदभ्रमंती चालू झाली. गावातील एका ग्रामस्थांना वाट विचारली होती. परंतु, प्रत्यक्ष चालून गेल्याशिवाय तिचा अंदाज येत नाही, हेही तितकेच खरे! याचा अनुभव याहीवेळी आम्हाला आला. निम्म्या रस्त्यापर्यंत छान पायवाट होती त्यानंतर पुढे जाण्यासाठी दोन रस्ते फुटलेले होते. उजव्या बाजूच्या मळलेल्या पायवाटेने पायर्‍या तयार केलेल्या दिसल्या. डाव्या बाजूची मात्र फारशी प्रचलित नव्हती, असे दिसले. परंतु मळलेली पायवाट किती आव्हानात्मक असते, याची प्रचिती यावेळी मात्र आम्हाला आली. खडी चढण व त्यात मातीची पायवाट ही आमच्या किल्लेरोहनाच्या कौशल्याची परीक्षा पाहणारी ठरली. ती कित्येक ठिकाणी निसरडी झाली होती. त्यातही ज्ञानेश्वरी सोबत असल्याने अतिशय सावधगिरीने हा टप्पा एकमेकांच्या साथीने पार करावा लागला. इथल्या पंधरा ते वीस मिनिटांचा रस्ता खरोखर थरारक असाच होता! तो झाडीतून जात असल्याने उन्हाची तीव्रता जाणवली नाही. तो पार करत आम्ही कातळकोरीव पायर्‍यांच्या समोर येऊन ठेपलो. मुख्य दरवाजा पूर्ण उद्ध्वस्त झालेला होता. त्याच्या समोरच एक मोठी गुहा होती. पावसाळा संपून इतके महिने झाले तरी पाण्याचा ओलावा अजूनही या गुहेत जाणवत होता. किल्ल्याचा शेवटचा टप्पा सहज व पूर्णपणे कातळकोरीव पायऱ्यांचा होता. शिवाय तो सावलीत असल्याने इथे बसून समोरील सह्याद्रीचे रूप न्याहाळत बसायला एक वेगळाच आनंद मिळाला. डाव्या बाजूला रायरेश्वराचे पठार तर उजवीकडे रोहिड्याच्या डोंगररांगा नजरेस पडल्या. किल्ल्याच्या माथ्यावर मात्र किल्लेपणाचे फारसे अवशेष दिसले नाहीत. थंडगार पाण्याचे एक टाके, दोन-तीन पडीक मंदिरे, वाड्याचे भग्न अवशेष, चुन्याचा घाणा व धान्यकोठार यापलीकडे किल्ल्यावर पूर्ण वाढलेले व वाळलेले गवत पसरलेले दिसले. पलीकडच्या बाजूने महाबळेश्वरच्या महाकाय डोंगर रांगा व धोम धरणाचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवता आले. किल्ल्यावरून परतताना मात्र डाव्या बाजूची वाट आम्ही चुकवली होती ती शोधत शोधत खाली उतरलो. त्यामुळे गडउतार सहज सोपा झाला होता. एक छोटेखानी टुमदार किल्ल्याची भ्रमंती पार पडली होती व ज्ञानेश्वरीच्या यादीत एका थरारक किल्लेरोहनाची भर पडली होती. किल्ल्याच्या पूर्वेकडे एकवार नजर टाकून आम्ही रायरेश्वराच्या दिशेने प्रस्थान चालू केले.



No comments:

Post a Comment