माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, January 20, 2021

अविस्मरणीय दौंड्या

कोरोना विलगीकरणाचे ते १४ दिवस संपता संपत नव्हते. एक-एक दिवस मोजत पूर्ण केला आणि हा कालावधी संपल्यानंतर पाचव्या दिवशी आठ महिने घरी बसून काढलेला दुष्काळ संपवण्याची वेळ आली. जुन्नर मधला नवीन पर्वत सर करण्याचे ध्येय होते. त्यातच माळशेजच्या रांगेमध्ये असलेला दौंड्या डोंगर सापडला.
फेसबुकवर वाचलेली जुजबी माहिती ज्ञात होती. तिच्या आधारावर ट्रेकिंगच्या नव्या मोसमाची सुरुवात आम्ही करणार होतो. ऑक्टोबर महिना आणि गारवा यांचं फार असं नातं नसतं पण पहाटे पहाटे थोडी का होईना थंडी जाणवत असते. याच थंडीमध्ये सकाळी सहा वाजता मार्गक्रमण सुरू केले. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी याच डोंगरावर एक आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे विमान कोसळले होते. त्यामुळे हा डोंगर इथल्या लोकांना विशेष परिचित आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्ही तळमाची गावामध्ये पोहोचलो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ मधून आत गावाकडे जाणारा वळणावळणाचा व काहीसा घाट मार्ग असलेला रस्ता मात्र अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात बहरलेली झाडी वातावरणात गारवा निर्माण करत होती. गावामध्ये पोहोचलो तोवर सुर्योदय झालेला होता. तळमाचीच्या तीनही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या दिसल्या. बऱ्याच ठिकाणी सरळसोट कडे आहेत आणि या कड्यांच्याच मागच्या बाजूला माळशेज घाट आहे. डोंगराकडे बघितल्यावर वाटत नाही की इथून वर माथ्यावर जायला रस्ता असावा. तो शोधून काढण्याचे पहिले आव्हान आमच्यासमोर होते. गावांमध्ये एकाला रस्ता विचारला. त्यांने माहिती सांगितली. पण प्रत्यक्ष चालायला सुरुवात केल्यावर आपण जंगलातील न मळलेल्या वाटेवर चालत आहोत, हे ध्यानात आले. वाट चुकली तर होतीच. पण त्यातूनही मार्ग काढत काढत आम्ही जंगलातल्या एका मळलेल्या वाटेला लागलो. जंगल बर्‍यापैकी घनदाट होतं पण पायवाट देखील तितकीच सहज व सुंदर होती. ती पाहता या वाटेने सातत्याने लोकांची ये-जा असावी असे वाटले. कदाचित जंगलांमध्ये लाकडे तोडण्यासाठी लोक येत असावेत. आता वाट रस्त्याच्या दिशेने जात होती. वातावरण तसं स्तब्ध होतं होतं. अधून-मधून रस्त्याच्या कडेला डोंगरावरून तुटून आलेले मोठमोठाले दगड दिसून यायचे. त्याला वळसा घालून पुन्हा मळलेल्या वाटेला लागायचो. अगदी थोड्याच वेळात चढण सुरू झाली. काही ठिकाणी दगड व्यवस्थित रचून रस्ता तयार केलेला होता. चढण फारशी खडी नव्हती. अगदी लहान मुलेही व्यवस्थित या रस्त्याने चालू शकतील, असे वाटून गेले. थोडेच वरती गेल्यावर जंगलाच्या वरच्या भागात आम्ही पोहोचलो. इथून तळमाची गाव व्यवस्थित दिसत होतं. सूर्याची ढगांबरोबर लपाछपी चाललेली होती. रस्ता योग्य आहे, याची खात्री करून आम्ही पुन्हा मार्गक्रमण चालू केले. अनेक ठिकाणी रस्ता खोदून तयार केल्याचे दिसत होते. काही ठिकाणी तर माथ्यावरुन येणारे झुळझुळ पाणी रस्ता पार करताना दिसत होते. डोंगर चढाई सुरू झाल्यानंतर मात्र आजूबाजूला फारशी झाडे दिसली नाहीत. एव्हाना दुरवर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही व्यवस्थित दिसत होती. डोंगर चढणीच्या मध्यावर गेल्यावर माथ्याच्या दिशेने काही लोक रस्ता उतरताना दिसले. आता मात्र आमची वाट योग्य आहे, याची खात्री झाली. ते झपाझप पावले टाकत खाली उतरत होते. आम्ही मात्र अनेक महिन्यांचा वनवास संपवून अतिशय आनंदाने रमत-गमत डोंगर चढत चाललो होतो. दूरवरून या उंच डोंगराला कुठून रस्ता असेल, याची खात्री नव्हती. पण रस्ता मात्र अतिशय सुंदर तयार झालेला दिसला. डोंगर बऱ्यापैकी चढून आल्यावर एक मोठी घळ दिसून आली. आजूबाजूला अजस्त्र दगड चक्क लोंबकळताना दिसत होते. कदाचित ते कधीही पडतील, अशी परिस्थिती होती. त्याच्याच कडेकडेने आमची चढाई चालू राहिली. घळी मधून अजूनही झुळझुळ वाहणारे पाणी व त्याचा खळखळाट जाणवत होता. याठिकाणी भर पावसाळ्यामध्ये चांगला मोठा धबधबा असावा, असे जाणवले. थोडं आणखी चढून आल्यावर आम्ही लवकरच माथ्यावर पोहोचलो. माळशेजच्या सर्व डोंगररांगा तसे सिंदोळा आणि निमगिरी किल्ला आता व्यवस्थित दिसत होता. सूर्याची कोवळी किरणं अंगावर येत होती. अशा वातावरणात फोटोग्राफीचा मोह मात्र आवरला नाही. इथून पुढचा रस्ता शोधायला लागणार होता. समोरच काही कच्ची घर दिसून आली. जवळ जाउन पाहिले तर तिथे कुणीही राहत नव्हते. पाळीव प्राण्यांना विशेषतः गाई-म्हशींना बांधण्यासाठी त्या घरांचा वापर होत असावा, असे दिसले. आम्हाला माळशेजच्या डोंगरांवर जायचे होते म्हणून घरांच्या उजव्या बाजूने मार्गक्रमण चालू केले. माथ्यावर जंगल फारसे घनदाट नव्हते. अजूनही बऱ्याच ठिकाणी पावसाचा ओलावा जाणवत होता. इथे फुलपाखरांची काही कमी नव्हती. वातावरणात बऱ्यापैकी शांतता होती. त्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू यायचे. डोंगरमाथ्यावर उजव्या बाजूने कडेकडेने आम्ही मार्ग शोधायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर जंगलाच्या आत जाणारा रस्ता होता. तो आम्ही पकडला पण दुरून कोणीतरी आम्हाला पाहिले होते. त्याने ओरडूनच उजव्या बाजूचा रस्ता पकडा असे आम्हाला सांगितले. इतक्या लांबून कोणीतरी आम्हाला पाहत आहे, याचे जरा आश्चर्य वाटले. रस्ता दाखवणारा मार्गदर्शक मिळाल्याने आमचे काम सोपे झाले होते. थोडं अंतर चालून गेल्यावर दोन डोंगरांना जोडणारा एक अतिशय रुंद रस्ता होता. या जागेला वानरदरा असे म्हटले जाते. तो ओलांडून पुढे आलो तर दूरवर अस्वलदरा दिसून आला. अतिशय छोट्या प्रवाहासह जमिनीवर कोसळणारे धबधब्यांचे आवाज ऐकू यायला लागले होते. डोंगराच्या मागच्या बाजूला आलो तर जुन्नर मावळातला सर्व परिसर दिसून आला आणि समोर दिसत होता नाणेघाटातील जीवधन किल्ला! जीवधन किल्ल्याची इतक्या लांबून एका वेगळ्याच डोंगरावरची छटा आम्ही पहिल्यांदाच पाहिली. नाणेघाट जवळ असला तरी नानाचा अंगठा काही दिसला नाही मावळातला खूप मोठा परिसर मात्र नजरेत आला होता. अगदी अंजनावळे गावातली वऱ्हाडी रांगही स्पष्ट दिसत होती. या डोंगराचा माथा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. सहसा तो कोणत्याही इतर डोंगरावरून दिसत नाही. अगदी जीवधन किल्ल्यावरूनही नाही. दौंड्याच्या मागच्या बाजूला देखील तितकीच मोठी झाडी आहे आणि आणि दूरवर वसलेली छोटी आदिवासी गावेही आहेत. त्यांचं निरीक्षण करत या टोकावर आम्ही बसलो. वातावरणातील गारवा मनाला प्रसन्न करत होता. दौंड्याचा पहिला टप्पा आम्ही समर्थपणे पार केला होता व त्याचा आनंद घेत होतो. इथून पुढे पुन्हा वाटचाल सुरू केली. जायला पुन्हा दोन वाटा होत्या त्यापैकी डावी वाट निवडली. माथ्यावर गाईंचे सर्वत्र पडलेले शेण पाहून इथे जनावरांचा सातत्याने वावर असावा, असे दिसले. मनुष्य प्राण्याचा वावर मात्र कुठेच नव्हता! दहा मिनिटांच्या वाटचालीनंतर आम्ही एका मोठ्या पठारापाशी पोहोचलो. समोर आणखी एक टेकडी होती. ती खालूनही आम्हाला दिसली होती. याच टेकडीवर एक छोटेखानी मंदिर बांधलेले आहे. तिथे जाणारी पायवाट सापडत नव्हती. कदाचित ती दुसऱ्या बाजूने असावी, असे वाटून गेले. म्हणून उगलेल्या गवतातूनच आम्ही आमची पाय वाट तयार केली व त्या माथ्याच्या दिशेने जाऊ लागलो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून पुढे जाण्याआधी एखादी रिकामी जागा शोधली व पेटपूजा उरकून घेतली. त्यामुळे तरतरी आली होती. आता आम्ही त्या माथ्याच्या अगदी समोर होतो. त्याच्या उजव्या बाजूने एक रस्ता पुढे जात होता. तिथून मार्गक्रमण चालू केले. परंतु टेकडीवर जाण्याचा रस्ता मात्र सापडला नाही. तिच्या कडेकडेने जंगलातून जाणारी वाट आम्ही धरली. हीसुद्धा बऱ्यापैकी मळलेली होती. डोंगर पायथ्याचा बराच मोठा परिसर जंगलांनी व्यापलेला दिसत होता. पहिली टेकडी मागे पडली तर पुढे आणखी तशीच टेकडी दिसून आली. ती मात्र सरळसोट होती. तिच्यावर कोणत्याही प्रकारचे मंदिर दिसून आले नाही. किंबहुना तिच्यावर जाण्यासाठी रस्ताही नसावा. काही अंतरावर अनेक प्रयत्न करून देखील पुढचा रस्ता सापडला नाही. कदाचित पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा वाटा नष्ट झाल्या असाव्यात. तिथे आम्ही डोंगराच्या तिसऱ्या टप्प्यावर होतो. येथून दुसर्‍या टप्प्यावर दूरवर एका पानवठ्यापाशी सांबराचे दर्शन झाले. तसे पाहिले तर सांबर एकटी फिरत नाहीत. पण ते एकटेच दुडूदुडू फिरताना दिसले. त्याला आमची चाहूल लागली असावी, म्हणून त्याने लगेच जवळच्या झाडीमध्ये झेप घेतली व ते गायब झाले. आमच्या प्रवासाचा हा अंतिम बिंदू होता. येथून पुन्हा माघारी फिरायचे आम्ही ठरवले. जंगलातली आणखी कोणती वाट सापडते का, ते पाहिले. पण त्यात यशस्वी झालो नाही. परतीच्या वाटेने अतिशय कमी वेळात आम्ही पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. येताना चुकलेली वाट पुन्हा समजली. गावांमध्ये पोहोचलो तेव्हा वर जाण्याची योग्य वाट कोणती, हे ध्यानात आले.
तीन ते चार तासांचा कित्येक महिन्यांपासून रखडलेला ट्रेक सफल झाला होता. परतीच्या वाटेत गाडीमध्ये बसलो आणि पुढच्या प्रवासाची अर्थात ट्रेकची मनोमनी तयारी सुरू केली.



















6 comments: