माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, January 10, 2021

एका अतिदुर्गम किल्ल्याची भ्रमंती

स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट आहे. हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांमध्ये विश्रांती घेण्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी नियमितपणे येत असे. तो या परिसरात निवासास असायचा. स्थानिक लोक या अधिकाऱ्याला पोप असे म्हणायचे व तो दर रविवारी अर्थात संडेच्यादिवशी या ठिकाणी मुक्कामास असायचा. याच कारणास्तव या भागातील गावाला अपभ्रंशित असे "फोफसंडी" नाव पडले.
नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागात हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याची सीमा व डोंगरदऱ्यात वसलेल्या परिसर ही या गावाची मुख्य ओळख होय. या गावामध्ये शिवकालीन कुंजरगड किल्ला आहे. गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे या गडावर भ्रमंती करण्यासाठी फारशी वर्दळ नसते. परंतु शिवस्पर्श लाभलेला हा किल्ला एकदा तरी सर करायचा, असे आम्ही मनोमन ठरवले होते. त्यानिमित्ताने फोफसंडी मधील अद्भुत निसर्गही पाहता येईल, अशी आमची मनीषा होती.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर वसलेले जुन्नर मधील उदापूर हे गाव होय. या गावातून उत्तरेकडे एक डांबरी रस्ता जातो. या मधल्या डोंगररांगांमध्ये मांदारने घाट आहे. तो ओलांडला की मांडवी नदीचं खोरं सुरू होतं. मुथाळणे, मांडवे व कोपरे ही गावे संपली की जुन्नर तालुका व पर्यायाने पुणे जिल्हाही समाप्त होतो.
इथवर रस्त्याची स्थिती अत्यंत चांगली होती. परंतु, कोपरे गाव संपले आणि रस्त्याचा खळखळाट चालू झाला. डोंगर-दर्‍यांमधे वेढलेला निसर्ग मात्र मन प्रफुल्लित करणारा होता. डाव्या बाजूला उंचच उंच कड्यांनी सजलेले हिरवेगार डोंगर आणि उजव्या बाजूला दरीमधून वाहणारी मांडवी नदी. अशा वातावरणात आमचा प्रवास चालू झाला. या दुर्गम भागामध्ये अनेक मोठाले धबधबे दिसून येतात. ऑक्टोबरचा काळ असल्यामुळे त्यांच्यातील प्रवाह बराच कमी झाला होता. हे सर्व पाणी मांडवी नदीच्या पात्रात जात असावे. मांडवी नदीपात्र दोन्ही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेले आहे. तिचा असा प्रवाह पाहिला की, काश्मीरच्या खोऱ्यामधून वाहणार्‍या सिंधू नदीची आठवण होते. ही नदी फोफसंडी गावातच उगम पावते. तिथपासून चिल्हेवाडी धरणापर्यंत ती केवळ डोंगरदऱ्यातूनच वाहत येते.
फोफसंडीला जोडणारा हा रस्ता चार चाकी गाडीसाठी मात्र निश्चितच योग्य नव्हता. त्यामुळे चांगला रस्ता कधी लागेल याची वाट बघतच आम्ही त्या हिरव्यागार परिसरातून भ्रमंती सुरू ठेवली होती. पंधरा ते वीस मिनिटातच दूरवर डोंगरातच्या पायथ्याशी फोफसंडी गाव नजरेस पडले. एव्हाना सूर्योदय झाला होता. सूर्यकिरणे गावातील घरे उजळवून टाकत होती. अशा वातावरणातच आम्ही गावात प्रवेश केला. गावच्या मुख्य वेशीसमोरून एक रस्ता उत्तरेकडील डोंगराकडे जात होता. त्याची स्थितीही फारशी चांगली नव्हती. परंतु स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिथून किमान दोन चाकी गाडी तरी वरील जांभळे वस्ती पर्यंत जाते. त्यामुळे त्या अवघड वाटेने आमचा खडतर प्रवास सुरू झाला. जसजसे आम्ही वर जाऊ लागलो तसतसा आजूबाजूचा परिसर दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागला होता. परंतु, वाट ही बिकट होती. उत्तरेच्या वाटेवर आम्हाला कुंजरगड किल्ला दृष्टीस पडला. स्थानिक लोक त्यास कोंबड किल्ला असेही म्हणतात. त्याचे कारण माहीत नाही. परंतु किल्ल्याची रचना हत्तीच्या सोंडेप्रमाणे असल्याने त्यास कुंजरगड म्हणत असावेत, असे वाटते. कारण 'कुंज' या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो.
साधारणत: दीड ते दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर डोंगरावर एक छोटी वस्ती लागली. हीच ती जांभळे वस्ती होती. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच आम्ही मागे वळून पाहिले. दूरदूरवर आम्ही पार केलेल्या डोंगररांगा दिसत होत्या. जुन्नरमध्ये असणारी हटकेश्वर डोंगररांग व तिच्यावरील नैसर्गिक पूल अगदी स्पष्ट दिसत होता. म्हणजे इतकी पायपीट करूनही आम्ही फार लांब आलो नव्हतो, हे ध्यानात आले! पुणे आणि नगर जिल्ह्याची सिमा असणारा रांजना डोंगर आकाशाकडे टोक दाखवत उभा असलेला दिसला. या ठिकाणावरून आमची खरी चढाई चालू झाली. जुन्नरपेक्षा दाट रानवाटा याठिकाणी दिसून येत होत्या. पावसामुळे वरून घसरत आलेले दगड रस्त्यांवर चहुकडे पडलेले होते. त्यातूनच मार्ग काढत आम्ही चढाई चालू ठेवली. दहा मिनिटांमध्ये पहिला टप्पा पार केला. इथे एक छोटेखानी आदिवासी घर बांधलेले होते. आता मात्र किल्ल्याचा मुख्य बुरुज व्यवस्थित दिसायला लागला. शिवाय उत्तरेपर्यंत किल्ला व त्यातील ढासळलेले बुरुज नजरेस पडत होते. बहुतांश किल्ल्यांवर शिवकाळात बांधलेल्या बुरुजांचे अवशेष दिसून येत नाहीत. परंतु, इतक्या दुर्गम भागात असूनही या किल्ल्यावरील दोन्ही बाजूंचे बुरुज बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत दिसून येत होते.
किल्ल्याची इथून पुढची चढण मात्र गवताळ वाटेने जाणारी होती. ऊन लागलं होतं. पण आम्ही बऱ्याचशा उंचीवर आल्याने त्याची तीव्रता जाणवत नव्हती. थंड हवेचे झोत अंगावर येत होते. त्या गवताळ पायवाटेने समोरचा भग्न बुरुज समोर ठेवून आम्ही भ्रमंती चालू ठेवली. ही पायवाट वगळता अन्य ठिकाणी बऱ्यापैकी झाडी होती. पायवाट संपली तिथून पुढे काही अंतरावर ढासळलेला बुरुज दिसून आला. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा नव्हता. त्यामुळे त्या तुटलेल्या अवशेषांवरून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागली. ती फारशी अवघड नव्हती. बुरुज चढून आल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचे दक्षिण-उत्तर टोक व्यवस्थित दिसत होते. अगदी हत्तीच्या सोंडेप्रमाणे उत्तरेकडचे टोक लांब असल्याचे दिसले. किल्ल्याचा पूर्ण परिसर रानगवताने आच्छादित झाल्याचा दिसत होता. येथून उजव्या बाजूने एक पायवाट उत्तरेकडे जाताना दिसली.
थोड्याच अंतरावर थंड व शुद्ध पाण्याचे मानवनिर्मित टाके दिसून आले. तसं पाहिलं तर अशी नऊ ते दहा टाकी या किल्ल्यावर बांधलेली आहेत. त्यामधील पाणीही बऱ्यापैकी शुद्ध आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जवळपास सर्वच टाकी काठोकाठ भरल्याची दिसत होती. किल्ल्याच्या मध्यभागी एका उघड्या जागेत महादेवाची पिंडी स्थापन केलेली होती व त्यासमोरच एक पाषाणातून निर्मित नंदी महादेवाला नमन करत होता. या उघड्या मंदिराच्या मागे किल्ल्यावरील वाड्यांचे अवशेष दिसून आले. इतिहासातील नोंदींनुसार सन १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर मुक्काम केला होता. कदाचित ते याच वाड्यामध्ये थांबले असावे. शिवस्पर्श लाभलेला असा किल्ला पाहणे म्हणजे एक ऐतिहासिक रोमांच असतो, याची जाणीव त्या क्षणी झाली. किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे जाताना त्याची रचना लोहगडाच्या विंचूकड्यासारखी भासत होती. मागचा भाग आता अधिक स्पष्ट दिसत होता. हरिश्चंद्रगडाच्या रांगा व्यवस्थित दिसू लागल्या होत्या. या डोंगररांगांमधील अनेक खेडी असे विहीर, कोठाळे, शिंदे, कोहणे ही गावे किल्ल्यावरून दृष्टीस पडत होती. किल्ल्याची प्रत्यक्ष उंची या बाजूने खऱ्या अर्थाने ध्यानात येत होती. विहीर गावातून येणारा रस्ता हा पूर्णपणे पायवाटेचा असावा असे दिसले. पुढे थोड्याच अंतरावर एक मानवनिर्मित गुहा होती. परंतु, ती पाण्याने पूर्ण भरलेली दिसून आली व त्या भोवती मोठ्या प्रमाणात गवत उगलेले होते. किल्ल्याचे उत्तरेकडील टोक गाठले तेव्हा अकोले तालुक्यातील बहुतांशी भाग नजरेच्या टप्प्यात आला होता. दूरदूरची खेडी व त्यांना जोडणारे छोटेखानी रस्ते असा हा सारा नजारा या ठिकाणावरून दिसत होता. फोफसंडी गावातून मागच्या बाजूला यायचे म्हणजे समोरील डोंगररांगेला कमीत कमी पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा वळसा घालावा लागत असावा, असे दिसले. पूर्वेकडील दरीमध्ये मांडवी नदीचे उगमस्थान होते. येथूनच दरीच्या वाटेने अनेक वळणे घेत मांडवी नदी प्रवास करत असताना दिसली. सह्याद्रीचे उंच उंच डोंगर व त्यामध्ये वसलेल्या कुंजरगड किल्ला असा अद्भुत संगम या ठिकाणावरून दिसत होता.
किल्ल्याची शेवटचे टोक गाठल्याने आम्ही दुसऱ्या बाजूने मागे जाण्यास सुरुवात केली. पुन्हा किल्ल्याच्या मधोमध आल्यानंतर डावीकडे बर्‍यापैकी चांगली वाट खाली जाताना दिसली. ही किल्ल्यावर येण्या-जाण्याची मुख्य वाट होती. कोहणे तसेच फोफसंडी गावातून येणारी किल्ल्यावरील वाट या ठिकाणी एकत्र येते. शिवकालामध्ये या ठिकाणी कदाचित किल्ल्याचा महादरवाजा असावा. त्याचे अवशेष मात्र तिथे दिसत नाहीत. या वाटेने आम्ही खाली उतरलो. अगदी थोड्याच अंतरावर डावीकडे एक मोठी निसर्गनिर्मित गुहा होती. वीस पंचवीस लोक इथे सहज उभे राहू शकतील इतकी भव्य जागा होती. शिवाय समोरील डोंगररांगा व जंगलं या जागेवरून स्पष्ट दिसत होती. इथून पुढची पायवाट जंगलातून जाणारी दिसली. अगदी दोनच मिनिटांच्या अंतरावर पुन्हा डावीकडे एक मानव निर्मित गुहा दिसून आली. एखाद्या लेण्यासारखी रचना येथे करण्यात आली होती. त्यावर कोणीतरी "भुयार" असे पेन्ट केल्याचे दिसले.  कुंजरगडावरील हे सर्वोत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळ होय. कारण ही मानवनिर्मित गुहा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण भुयार आहे. या भुयारातून आत गेल्यानंतर किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूचा पूर्ण परिसर पाहता येतो. याचा अर्थ या भुयारातून किल्ल्याच्या दोन्ही बाजूंना व्यवस्थित टेहाळणी करता येऊ शकते. कदाचित याच उद्देशाने त्याची निर्मिती असावी. किल्ल्याच्या सोंडेला भोक पाडून या भुयाराची रचना झाली असल्याचे दिसते. त्यात बऱ्यापैकी पाणी साठलेले होते.
भुयाराची अनुभूती घेतल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो. डावीकडील रस्ता कोहणे व विहीर गावाकडे जातो तर उजवीकडील पुन्हा फोफसंडीमध्ये उतरतो. दोन्ही रस्ते दाट झाडीमध्ये स्थित आहेत. आम्ही फोफसंडीच्या रस्त्याला लागलो तेव्हा किल्ला उजव्या बाजूला दिसून येत होता. वरील पूर्ण तटबंदी पुन्हा न्याहाळता येत होती. १५ ते २० मिनिटांच्या पायपिटीनंतर आम्ही पुन्हा जांभळे वस्तीमध्ये येऊन पोहोचलो.
एकंदरीत दोन तासांचा हा प्रवास होता. एक अनवट वाटेवरील अपरिचित किल्ला पाहण्याचा प्रसंग त्यादिवशी आम्ही अनुभवला. इथून अकोले तालुक्यातील कोतुळ गाव ४० किलोमीटर अंतरावर आहे. त्या बाजूनेही किल्ल्याला भेट देता येते. शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील तसेच शहरी वर्दळीपासून दूर असलेल्या एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची असल्यास कुंजरगड नक्की अनुभवावा असाच आहे.










No comments:

Post a Comment