माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, January 3, 2021

खंड्या

सकाळी आठ वाजता किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरापाशी पोहोचलो. तोच समोरच्या कमानीतून 'तो' शेपटी हलवत आमच्यापाशी आला. त्याला कदाचित खायला हवे होते असे वाटले. आम्ही सुरुवातीला त्याच्याकडे काहीसे दुर्लक्ष केले आणि किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. मग तोही आमच्या बरोबरच चालायला लागला. पायवाट पूर्णपणे जंगलातून जाणारी होती. बऱ्याच ठिकाणी दोन वाटा जाताना दिसायच्या. अर्थात हा सर्व भुलभुलैयात वाटायला लागला. पण तो त्या वाटेने सराईतपणे आमच्या बरोबर चालला होता. त्याला रस्ता व्यवस्थित माहीत होता. इतक्या घनदाट जंगलातून पुढे सरकायला आम्हाला काहीशी भीती वाटत होती. कारण आमच्या तिघांना व्यतिरिक्त त्या जंगलात कोणीही नव्हते. कदाचित आमच्या आधीही कुणी गेले नसावे. जंगलातल्या त्या पायवाटेवरून चालताना हीच वाट योग्य आहे का? अशी शंका मनात उभी राहायची. पण तो मात्र त्या पायवाटेने सहजपणे पुढे चालला होता. त्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे त्याच्या सोबत चालू लागलो. कधी कधी तो मध्येच जंगलातल्या चिंचोळ्या वाटेत घुसायचा व परत मळलेल्या वाटेकडे धाव घ्यायचा. रानावनात झाडांच्या टोकावरून उड्या मारणाऱ्या माकडांना आणि वानरांना आमची चाहूल लागली की ते त्यांच्या त्याची खबर आपल्या भाऊबंदांना विशिष्ट आवाज करून देत होते. त्या निबिड जंगलामध्ये तो आवाज भेसूर आणि भीतीदायक वाटत होता. पण आमचा सोबती आणि मार्गदर्शक कधीकधी धावत जाऊन माकडांना हुसकून लावायचा. आम्ही थांबलो की तोही स्वतःसाठी एखाद्या झाडीमध्ये जमीन उकरून थंडावा शोधायचा व तिथे अंग टाकून द्यायचा. तो आमची साथ सोडत नव्हता. कदाचित त्याला आमच्या सोबत किल्ल्यावर यायचे होते. एक तास झाला तरीही किल्ल्याच्या पायर्‍या लागल्या नव्हत्या. पण मळलेली पायवाटही अजून संपत नव्हती. जंगलातला प्रदीर्घ रस्ता संपला आणि समोर सह्याद्रीचा कोकणकडा दिसू लागला. लवकरच एक मंदिरही दिसायला लागले. विश्रांती घेण्यासाठी ती एक उत्तम आणि प्रशस्त जागा होती. आम्ही थांबल्यावर तोही मंदिराच्या बाहेर पहुडला. इथून पुढचा टप्पा मात्र पायर्‍यांच्या वाटेचा होता. आता किल्ल्याच्या मुख्य पायऱ्या व्यवस्थित दिसायला लागल्या होत्या. आधीच आमची दमछाक झालेली होती. त्यात ह्या खड्या पायऱ्या चढून जायचे होते. 
 


 
 
ऊन डोक्यावर आलं तरी झाडांचा थंडावा शरीराला अल्हाददायक शीतलता प्रदान करत होता. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. कातळटप्पा सुरु झाला तिथून मात्र ऊन थेट अंगावर येत होतं. तोही आमच्या सोबतीने तिथवर आला. उभा कातळटप्पा हातांचाही वापर करत आम्ही सर करू लागलो. काही ठिकाणी अवघड पायऱ्यांचा मार्ग होता. पण तो अगदी सराईतपणे त्याने पार केला. त्याच्या चढाईमध्ये अगदीच सहजता जाणवत होती. जणूकाही तो रोजच या किल्ल्यावर येत असावा मुख्य दरवाजा पार केल्यानंतर मात्र त्याने आपले अंग टाकून दिले. कदाचित आमची फोटोग्राफीची गडबड लक्षात घेता अजून पंधरा-वीस मिनीटे तरी आम्ही इथून हालणार नाही, असे त्याला वाटले असावे. आणखी दोन पायऱ्यांचे मार्ग सर केल्यानंतर आम्ही एका भव्य गुहेपाशी येऊन पोहोचलो. ते एक मानवनिर्मित लेणंच होतं. हजारो वर्षांचा इतिहास त्यात सामावलेला होता. कमीत कमी ६० ते ७० लोक मावतील इतकी मोठी ती जागा होती. आल्या आल्या त्याने आपली नेहमीची जागा हेरली आणि अंग टाकून दिले. एव्हाना किल्ल्याच्या पायथ्यापासून दोन तास होऊन गेले होते. आम्हालाही भूक लागली होती. त्यामुळे पाठीवरच्या सॅक काढून ठेवल्या व पोट पूजेची सोय करू लागलो. त्यांने आम्हाला इतपर्यंत सोबत दिली होती. कदाचित त्याला काहीतरी खायला हवे असावे, असे आम्हाला वाटले. पण आम्ही दिलेल्या कोणत्याही पदार्थाकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही. आपले मार्गदर्शनाचे कर्तव्य त्याने पूर्ण केले होते. शेवटच्या कातळ टप्प्यासाठी तो आमच्या सोबत नव्हता. येतानाही तो त्या गुहेमध्ये परत दिसला नाही. किंबहुना रस्त्यातही तो आम्हाला परत दिसलाच नाही.
कदाचित केवळ आम्हाला किल्ल्याचा मार्ग दाखवण्यासाठी तो आमच्यासोबत आला असावा. त्याला आम्ही लाडाने "खंड्या" असे नाव ठेवले होते!





No comments:

Post a Comment