माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, March 17, 2024

फरिया बाग

फराहबक्ष…. गुगलवर टाकले आणि मॅप सुरू केला. जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण होते. शहराच्या बाहेर गाडी आल्यावर एका ठिकाणी कॅलव्हरी संग्रहालयाचा फलक दिसला. पुढचा रस्ता हा मिलिटरी भागातून जात होता. केवळ एकच गाडी जाईल एवढ्या छोटा डांबरी रस्त्याने मी आत गेलो. अगदी एका किलोमीटर अंतरावर डावीकडे एक रस्ता छोट्याशा वनक्षेत्रातून पुढे जात होता. साधारणत: अर्धा किलोमीटरवर मला माझे इच्छित स्थळ सापडले. सकाळी तिथे चिटपाखरू देखील नव्हते. परिसर पूर्ण निर्मनुष्य. दूरवरून हा फराह बक्षमहल एका पुराण वास्तूप्रमाणेच दिसत होता. मुस्लिम वास्तुकलेचा तो एक नमुनाच म्हणता येईल. आजूबाजूला असणाऱ्या एकंदरीत परिसरावरून या ठिकाणी कदाचित जुन्या काळी पाण्याचे साठे असावेत, असे वाटले. हा महल एका अष्टकोनी रचनेमध्ये बांधलेला दिसला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने येथे लावलेल्या फलकावरून याचे काम चंगेज खान याने सुरू केल्याचे समजले. बुऱ्हानशहा पहिला याच्या देखरेखीखाली नियामत खान याने हा महल पूर्ण केला. शिवाय बुऱ्हानशहा दुसरा याला तो न आवडल्याने उध्वस्त करण्याचे व पुनर्निर्माण करण्याचा आदेश देखील दिल्याचे इतिहास सांगतो. साधारणत: १५०८ ते १५५३ या दरम्यान हा महाल बांधला गेला असावा. त्या काळात जवळच्याच भिंगार गावातून पाणी आणून त्याच्याभोवती जवळपास १५ एकर जागेमध्ये ते टाकले गेले होते. असे म्हणतात की शाहजहाँने या महालाकडे पाहूनच ताजमहालची रचना केली असावी. परंतु याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.
अहमदनगर मधील इतिहासाच्या पानात जास्त लिहिले न गेल्याने कदाचित हे एक दुर्लक्षित ठिकाण असावे, असे वाटले. बाकी तत्कालीन इतिहासाची छोटीशी का होईना झलक या महलामुळे आपल्याला होते.








No comments:

Post a Comment