माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, March 17, 2024

एक सूर्यास्त

काही सूर्यास्त खासच असतात. त्यातीलच हा एक.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यास्त अगदी सातच्या नंतर होणार होता. त्या दिवशी सायकल घेऊन मी एका धरणाच्या सफरीवर गेलो होतो. पलीकडे जाण्यासाठी डोंगराच्या मधोमध काढलेला एक रस्ता होता. काळा कुळकळीत आणि सपाट रस्ता डोंगरामधील खिंडीतून खाली उतरत होता. माझी सायकल फेरी संपली आणि मी परतीच्या मागे मार्गाने निघालो तेव्हा सूर्य पश्चिमेच्या क्षितिजाकडे हळूहळू झुकत चालला होता. मला सूर्यास्त होण्याआधी डोंगराच्या त्या खिंडीमध्ये परत पोहोचायचे होते. कारण याच माथ्यावरून दूरवर सूर्यास्त अधिक उत्तम दिसेल याची मला खात्री होती.. डोंगर जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची चढण अधिक तीव्र होत होती. शेवटी या चढणीवर सायकल चालवणे मला कठीण होऊन बसले. सायकलवरून उतरलो आणि ती हातात घेऊनच निघालो. झपाझप पावले टाकत अंगातून घाम काढत मी त्या डोंगरावरच्या खिंडीकडे निघालो होतो. सूर्य मागच्या बाजूला होता. खिंडीतील वळणावळणाचा तो रस्ता मला त्याच्या दिशेने खुणावत होता. त्या खिंडीत मधोमध एक छोटेखानी मंदिर देखील बांधलेले होते. दोन पाच मिनिटांनी एखादी चारचाकी व दुचाकी त्या खिंडीतून खाली यायची. माझे ध्येय हळूहळू जवळ येत होते. मी वेगाने चालत चालू लागलो. आणि अखेरीस त्या खिंडीपाशी पोहोचलो. सायकल स्टॅंडवर लावली आणि मागे सूर्याच्या दिशेने वळून बघितले.
आजूबाजूच्या डोंगररांगांमधून सूर्य पश्चिम क्षितिजावर पोहोचलेला होता. त्याची सकाळप्रमाणेच शांत व शितल किरणे आसमंत उजळवून टाकत होती. तसाच खिंडीत बसून राहिलो. शहरापासून दूर गावापासूनही काही अंतरावर असणाऱ्या त्या शांत आणि निवांत परिसरात तो सूर्यास्त अतिशय उठून दिसत होता. तेजस्वी सूर्याची शांतता अनुभवता येत होती. सूर्य मावळून दिवस अंधाराकडे तरी जात असला तरी तो उद्या पुन्हा नव्याने उगवण्याची आशा देऊन जात होता. प्रत्येक सूर्यास्त हीच आशा देऊन जातो. त्यामुळेच त्याच्याकडे पाहत तासनतास बसत रहावसं वाटतं!


 

No comments:

Post a Comment