पावसाळ्यामध्ये वर्षा सहल करण्यासाठी जुन्नरमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे नाणेघाट होय. मागच्या पंधरा वर्षांपासून इथल्या पर्यटनाची प्रगती मी पाहत आलेलो आहे. एकेकाळी अतिशय दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी अतिशय कमी लोक भेट देण्यासाठी येत असत. महाराष्ट्राच्या प्राचीन वैभवाचा वारसा सांगणारा हा परिसर असल्याने बहुतांश वेळा इतिहास संशोधक, वास्तुकला अभ्यासक अशाच लोकांचा या ठिकाणी वावर असे. परंतु समाजमाध्यमांद्वारे इथले निसर्ग सौंदर्य पूर्ण देशभर पोचले आणि पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस घालण्यासाठी हा परिसर परिचित झाला.
नाणेघाटाची नैसर्गिक रचना पाहिली तर कोणीही या परिसराच्या प्रेमात पडेल. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राणी नागणिका हिने तिच्या कारकिर्दीमध्ये हा घाट सह्याद्रीच्या या उंच डोंगररांगांमध्ये बनवून घेतला. आणि एका व्यापारी मार्गाची मुहूर्तमेढ रोवली गेली. नाणेघाटामध्ये त्याकाळी व्यापाऱ्यांकडून प्रवेश कर घेतला जात असे. एका अर्थाने नाणेघाट हा एक तपासणी नाकाच होता. घाटामध्ये त्याकाळी एक गुहा बांधली होती. आजही ही गुहा आपण इथे पाहू शकतो. या गुहेच्या आत प्रवेश केल्यानंतर डाव्या आणि उजव्या भिंतीवर तत्कालीन प्राकृत भाषेमध्ये आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले शिलालेख पाहता येतात. अर्थात आज सर्वसामान्य माणूस ही भाषा वाचू शकत नाही. कालानुरूप येथील शिलालेख आता जीर्ण होत आलेले आहेत. त्यातील अक्षरे देखील पडून गेलेली आहेत. कदाचित आणखी काही वर्षांनंतर हा ऐतिहासिक ठेवा न वाचण्याजोगा होईल. याच गुहेमधील समोरची भिंत रिकामी दिसते. वरच्या बाजूस अस्पष्ट लिहिलेली अक्षरे नजरेस पडतात. परंतु संशोधकांच्या संशोधनानुसार या ठिकाणी सातवाहन कुळातील आठ व्यक्तींचे पुतळे कोरलेले होते.
भारतातील ऐहिक लेण्याचे नाणेघाट लेणी हे उत्तम उदाहरण मानले जाते. या लेण्याच्या समोरच्या भिंतीत नागणिका राणी आणि सातवाहन कुटुंबाशी संबंधित अशा आठ जणांच्या प्रतिमा पुतळे रूपात कोरलेल्या होत्या. त्या पुतळ्यांच्या वरील भागात ब्राम्ही लिपीमध्ये त्यांची नावे देखील लिहिलेली होती. दुर्दैवाने कालौघात हे पुतळे तोडफोडीमुळे नष्ट झाले. काही प्रतिमांची पावले तेवढी भग्नावस्थेत टिकली आहेत. लेणीमध्ये डावीकडून अनुक्रमे राजा सिमुख, राणी नागणिका, राजा श्रीसातकर्णी, कुमार भायल, सहाव्या जागी महारठी त्रणकयिर, नंतर कुमार हकुश्री आणि अखेरीस कुमार सातवाहन यांचे पुतळे होते. सिमुक सातवाहन यांना सातवाहन साम्राज्याचे संस्थापक मानले जाते. श्रीसातकर्णी हा त्यांचा मुलगा तर नागणिका ही त्यांची सून. ५६ वर्षे राज्य करणाऱ्या श्रीसातकर्णीची पत्नी नागणिका हिने १८ यज्ञांची माहिती याच लेण्यावरील भिंतीवर असलेल्या शिलालेखात दिली आहे. सहाव्या प्रतिमेतील व्यक्ती महारठी त्रणकयिर हे नागणिका राणीचे पिता होय. तर कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन हे सातवाहन कुळातील राजपुत्र असावेत. एखाद्या राजकुटुंबातील किंवा राजकुटुंबाशी संबंधित अशा व्यक्तींचे पुतळे एखाद्या लेण्यात एकत्रित पाहायला मिळणे, हे एकमेव उदाहरण आहे. कदाचित जर हे पुतळे शाबूत राहिले असते तर त्या काळातील लोकांच्या शरीराशी ठेवण, वस्त्रे, अलंकार, शिरोभूषणे, आयुधे, शस्त्रे यांची माहिती उलगडता आली असती.
आज नाणेघाटातील पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. परंतु यातील एक टक्के लोकांना देखील नाणेघाटाविषयी फारशी माहिती नसते. इतिहास संशोधकांच्या मदतीने जर ही माहिती सदर परिसरात पुरवता आली तर निश्चितच आपला इतिहास आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
--- तुषार भ. कुटे
(छायाचित्र आणि माहिती संदर्भ प्र. के. घाणेकर लिखित ‘जुन्नरच्या परिसरात’, प्रकाशक-स्नेहल प्रकाशन)