छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्य कोणत्याही किल्ल्यापेक्षा मला राजगड
किल्ला हा अतिशय खास वाटतो. कारण शिवरायांच्या एकंदरीत कालखंडातील सर्व
प्रमुख घटनांचा तो साक्षीदार राहिलेला आहे. तसेच महाराजांचा सर्वाधिक सहवास
या किल्ल्याला लाभलेला आहे.
बालपणी राजमाता जिजाऊंसोबत पुण्यात आले
असता शिवाजी महाराज ज्या ठिकाणी राहत होते तो म्हणजे लाल महाल. या
वास्तुविषयी देखील असंच काहीतरी आहे. छत्रपती शिवाजी रस्ता आणि जिजामाता
चौक या ठिकाणी सिग्नलला जेव्हा जेव्हा गाडी थांबते तेव्हा डावीकडे लाल महाल
नजरेस पडतो. सततच्या कामाच्या व्यापामुळे इथे इतक्या वर्षांमध्ये जाण्याची
कधीच संधी मिळाली नाही. परंतु त्या दिवशी आवर्जून आम्ही या वास्तूला भेट
दिली. शिवरायांचे बालपण या वास्तूमध्ये गेलं होतं. तसेच याच ठिकाणी त्यांनी
औरंगजेबाचा मामा असणाऱ्या शाहिस्तेखानाची फजिती करून त्याची तीन बोटे
छाटली होती. मुघलशाहीवर जबरदस्त प्रहार करणारा हा प्रसंग आणि त्याचा
साक्षीदार म्हणजे लाल महाल होय. शनिवारवाड्याच्या कडेलाच लागून ही वास्तू
दिमाखात उभी आहे. आज सुशोभीकरणाद्वारे तसेच विविध प्रकारच्या मूर्तींचा
वापर करून ही वास्तू स्थानिक प्रशासनाद्वारे दिमाखात उभी असल्याचे दिसते.
जिजाऊंची प्रसन्न मूर्ती महालाच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे. तसेच
शिवरायांच्या बालपणातील अनेक प्रसंग इथल्या भिंतीवर रेखाचित्रित केल्याचे
देखील दिसतात.
Wednesday, May 29, 2024
लाल महाल
Tuesday, May 28, 2024
बहादुरवाडी
येडेनिपाणीचा विलासगड दुर्ग उतरून खाली आलो तेव्हा सव्वा आठ वाजत आले होते.
म्हणजे परत जाण्यासाठी माझ्याकडे अजून बराच वेळ होता. त्यामुळे
बहादुरवाडीला जाण्याचे नक्की केले. येडेनिपाणी मधून एक रस्ता मुंबई-बंगळूर
महामार्गाच्या दिशेने जातो. अगदी दहा मिनिटांमध्येच मी महामार्गाला
पोहोचलो. मग काय गाडी सुसाट वेगाने निघाली. थोड्याच अंतरावर पुन्हा डाव्या
बाजूला बहादुरवाडीच्या दिशेने प्रवास चालू केला.
महाराष्ट्रातल्या अन्य
गावांप्रमाणेच हे एक गाव. त्याच्या मधोमध बहादूरवाडी भुईकोट दुर्ग दिसून
येतो. रस्त्याचे काम चालू असल्याने अलीकडेच गाडी लावली आणि चालतच या
दुर्गाच्या दिशेने निघालो. भुईकोट म्हटलं की जी परिस्थिती आठवते तशाच
स्थितीमध्ये हा दुर्ग सध्या दिसून येतो. प्रवेशद्वार बऱ्यापैकी उत्तम.
परंतु आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दुर्गाची दुरावस्था दृष्टीस पडते. काही
ठिकाणी डागडूजी केल्याचे दिसते. पण बहुतांश दुर्ग एका पडक्या वाड्यासारखा
आहे. दुर्ग म्हणावा अशा खानाखुणा मात्र स्पष्टपणे दिसतात. प्रवेशद्वाराच्या
बुरुजावर जाणारा रस्ता व्यवस्थित होता. तिथून बहादुरवाडी गाव बऱ्यापैकी
दिसून येतं.
तटबंदी आणि बुरुजामध्ये जंग्या आणि झरोके आहेत.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोकळी जागा दिसते. त्यासमोरील तटबंदीत चार
दरवाजे आहेत. कदाचित या ठिकाणी जुन्या काळात घोड्यांच्या पागा असाव्यात.
आतल्या तटबंदीतून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर सगळीकडे प्रचंड झाडी
माजलेली आढळते, त्यात दुर्गाचे सगळे अवशेष हरवून गेलेले आहेत!
Friday, May 24, 2024
सह्याद्रीतील एक जंगल
आंबा घाट चढून वर आलं की अगदी काहीच अंतरावर उजव्या बाजूला एक रस्ता विशाळगड आणि पावनखिंडीच्या दिशेने जातो. सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जाणारा वळणावळण्याचा रस्ता म्हणजे उन्हाळ्यात सुखद क्षणांची एक अनुभूतीच असते. जवळपास दहा किलोमीटरचा रस्ता हा सह्याद्रीच्या पूर्णपणे घनदाट जंगलातून जातो. अनेक ठिकाणी तर दिवसभरात सूर्याची किरणे देखील जमिनीवर पडत नसावीत, अशी परिस्थिती दिसते. ही जंगले निसर्गाचा समतोल टिकवून आहेत. शिवकाळात कदाचित याहीपेक्षा दाट झाडी या ठिकाणी असावी.