माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, December 2, 2025

झपुर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय

पुणे परिसरामध्ये असणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या संग्रहालयालयांपैकी एक म्हणजे "झपुर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय". एका दिवशी या संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला. अर्थात रविवार...  सुट्टीचा वार असल्याने बऱ्यापैकी गर्दी होती. संग्रहालयावरील पाटी बघून लक्षात आले की, पुण्याच्या पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्याद्वारे तयार केलेले हे संग्रहालय आहे. 
मराठी माणूस हा कलेचा भोक्ता. पूर्ण भारतभर मराठी माणसाची ही सर्वात सकारात्मक ओळख होय. याचीच प्रचिती या संग्रहालयातील विविध दालनांमधून आली. निरनिराळ्या प्राचीन कलाकृती, चित्रे, वस्तू यांचा अनोखा संग्रह या ठिकाणी पाहायला मिळाला. जुन्या काळातील मातीची भांडी, पितळेची तसेच कांस्याची भांडी या संग्रहामध्ये आहेत. याशिवाय शेकडो वर्षांपूर्वी वापरण्यात येणारे विविध प्रकारचे दिवे, दागिने, वस्त्रे यांची स्वतंत्र दालने इथे पाहता येतात. काळाच्या ओघात महाराष्ट्रीय संस्कृतीतून नामशेष होत असलेली तसेच पूर्णतः नामशेष झालेली अनेक वस्तू आभूषणे, वस्त्रे पाहण्याचा आनंद आपल्याला घेता येतो. चित्रांच्या दालनामध्ये त्यांच्याकडे पाहण्यासाठी खरोखर कलाकाराची दृष्टी लागते याची प्रचिती येते. भारतीय चित्रपटांच्या इतिहासावर आधारित एक छोटेखानी दालनदेखील या संग्रहालयामध्ये पाहता येते. खडकवासला धरणाच्या काठावर हा परिसर वसलेला असल्याने आजूबाजूची निसर्गराजी देखील इथून अनुभवता येते. धरणाच्या काठाहून पलीकडे दिसणारा सिंहगड किल्ला इतिहासाची साक्ष देतो. आणि हे संग्रहालय इतिहासात विस्मरणात जात असलेल्या स्मृतींना पुनश्च जागृत करण्याचे कार्य करते. त्यामुळे एकदा तरी निश्चित भेट द्यावी, असेच हे स्थळ आहे. 

--- तुषार भ. कुटे
 

Saturday, November 22, 2025

ट्रिक व्हिजन म्युझियम

आपल्या हटके आणि काहीशा अनोख्या शैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक म्हणजे लोणावळा येथील "ट्रिक व्हिजन म्युझियम" होय. द्विमितीय चित्रांमधून त्रिमितीय अविष्कार सादर करणारे, हे संग्रहालय होय. इतर संग्रहालयांप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही वस्तू ठेवलेल्या नाहीत. आधुनिक काळातील चित्रकारांनी रेखाटलेली रंगीत भित्तीचित्रे इथे पाहता येतात. ती पाहण्यासाठी देखील नाहीत. त्यांच्यासोबत आपले छायाचित्र काढण्यासाठी ती रंगवलेली आहेत. यात विशेष ते काय? 
द्विमितीय चित्रांद्वारे त्रिमितीय अविष्कार सादर करण्याची कला अनेक चित्रकारांना अवगत असते. अशाच प्रकारची चित्रे या संग्रहालयामध्ये रेखाटलेली आहेत. म्हणजे एका विशिष्ट कोनातून आपण जर आपला फोटो या ठिकाणी काढला तर त्यातून आपले चित्र त्रिमितीय असल्याचा भास तयार होतो. म्हणजे चित्रातील प्राणी अथवा वस्तूंपैकीच आपण एक आहोत, असे चित्रांमध्ये दिसून येते. अर्थात याकरिता छायाचित्रणाचे कौशल्यही तितकेच महत्त्वाचे. आपल्या छायाचित्र घेताना कोन, अंतर यांचा समतोल साधून संग्रहालयातील मदतनीस आपली छायाचित्रे काढतो. 
ज्या चित्रकारांनी इथल्या भिंतीवर चित्रे रेखाटली आहेत, त्यांचे कसब प्रदर्शित करणारे हे संग्रहालय. पारंपारिक चित्रकला आणि आधुनिक छायाचित्रकला यांचा अविष्कार आपल्याला येथे पाहता येतो, हाच काय तो सारांश!

--- तुषार भ. कुटे


 

Wednesday, November 19, 2025

कळमजाईचे मंदिर

आळेफाट्याहून पुणे-नाशिक मार्गाने आळेखिंडीकडे जाताना डाव्या बाजूला एका उंच डोंगरावर कळमजाईचे मंदिर आहे. जुन्नर तालुक्यातील बहुतांश ठिकाणावरून हे मंदिर दिसून येते. त्यादिवशी मंदिरापलीकडील गव्हाळ्या डोंगराच्या माथ्यावर ढगांची बरीच गर्दी जमली होती. वारे देखील सुटले होते. वातावरणात थंडावा वाढत चाललेला होता. अशा नेत्रदीपक आणि आल्हाददायक वातावरणात कळमजाईचे हे मंदिर उठून दिसत होते. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आणि वडगाव आनंद गावात असणाऱ्या या मंदिराकडे जाण्यासाठी पायथ्यापासून छोटासा ट्रेक करत जावे लागते. शिवाय याच वाटेच्या उजव्या बाजूने एक डांबरी रस्ता देखील मंदिराच्या दिशेने जातो. या रस्त्याने आपण आधी नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करतो आणि पुन्हा मंदिरापाशी आल्यावर जुन्नर तालुक्याच्या अर्थात पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेमध्ये परततो. एका विस्तीर्ण वटवृक्षाला लागून असणारे हे मंदिर कौटुंबिक सहलीसाठी एक उत्तम स्थळ आहे. 


 

Tuesday, August 26, 2025

आरे बीच

सुमारे सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा गणपतीपुळ्याला आलो तेव्हा पहिल्यांदा रत्नागिरी आणि मग गणपतीपुळे प्रवास केला होता. या दोन्ही गावांमधला सुमारे २० किमीचा हा प्रवास. यामध्ये साखरतर आणि आरे-वारे सारखी गावे लागतात. आरे-वारेचा समुद्रकिनारा कोकणातील लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक. यानंतर देखील आम्ही बऱ्याचदा या रस्त्याने गेलो. परंतु या समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा योग आला नाही. त्या दिवशी मात्र ठरवून आरेच्या किनाऱ्यावर भटकंती केली. शनिवार असल्याने पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. शिवाय आता या ठिकाणी झिपलाईन पर्यटनाचा देखील आनंद घेता येतो. म्हणून बऱ्यापैकी पर्यटक जमा झालेले होते. किनाऱ्यावरील एका घनदाट झाडीच्या मागे पांढऱ्या वाळूचा हा सपाट प्रदेश आहे. परंतु नेहमीप्रमाणे पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्या मधूनच तो ओलांडावा लागतो. वेळ कमी असल्याने यावेळी पाण्याच्या प्रवाहापर्यंत पोहोचता आले नाही. परंतु  झिपलाईनवरून खाली येणाऱ्या उत्साही पर्यटकांकडे बघत आम्ही किनाऱ्याच्या दिशेने चालू लागलो. या बाजूला बऱ्यापैकी सुंदर शिंपल्यांची आरास दिसून आली. अशी शिंपल्यांची नैसर्गिक आरास त्या दिवशी मी पहिल्यांदाच पाहिली. थोड्याच वेळात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली होती. अर्थात त्यांचा वेग वाढण्यापूर्वीच आम्ही तेथून काढता पाय घेतला.






 
 

Monday, July 14, 2025

गणपतीपुळे सकाळ

मागच्या वेळी ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्याच ठिकाणी याही वेळी आम्ही मुक्काम केला. पावसाळी दिवस असले तरी मुलांच्या सुट्ट्या संपत आल्याने त्यांचा पुरेपूर उपभोग घेण्यासाठी आलेली बरीचशी मंडळी गणपतीपुळ्यामध्ये वावरताना दिसली. अर्थात याही वेळी गर्दी आमचा पिच्छा सोडत नव्हती. सकाळी साडेसहाच्या दरम्यान जाग आली. बाहेर वातावरण ढगाळ झाले होते. कदाचित रात्री पाऊस पडून गेला असावा. नेहमीप्रमाणे सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गणपतीपुळ्याच्या रस्त्यांवर चालू लागलो. गावाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारापर्यंत चालल्यानंतर पुन्हा मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता घेतला. याच्या डाव्या बाजूला मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे. हे त्यादिवशी पहिल्यांदाच समजले! म्हणजे यापूर्वी गणपतीपुळे नीट निरखून पाहिले नव्हते, हे निश्चित. या मार्गाला समांतर चालत मंदिरापर्यंत आलो. मागच्या वेळेपेक्षा यावेळी बऱ्यापैकी गर्दी होती. हा किनारा असा एक किनारा आहे जिथे बीच फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा जास्त भाविकांची संख्या असते. आणि ते देखील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आणि तिथल्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतात. यावेळी मात्र त्यांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे ऊन काहीच नव्हते, वातावरण पूर्णतः ढगाळ. हवेमध्ये गारवा तयार झालेला. त्यातही कोकणातील दमट वातावरण लगेच प्रभाव पडत होते.
किनाऱ्यावर मंदिराच्या दिशेने चालत चालत मी मंदिराच्याच पायऱ्यांवर जाऊन बसलो. अर्थात या बाजूने कुलूप लावलेले असल्याने मंदिरातून कोणालाही बाहेर पडता येत नाही. फक्त ते तिला समुद्र पाहू शकतात. म्हणूनच माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. ही अशी जागा होती जिथे समुद्राकडे बघत तंद्री लावून सातत्याने बसू शकतो. शिवाय किनाऱ्यावरची पर्यटकांची वर्दळ बऱ्यापैकी दूरवर होती. त्यांचे वेडे चाळे तिथून मात्र स्पष्ट दिसत होते. समुद्र आपल्या भरतीच्या मूडमध्ये जाणवला. त्याच्याकडे बघितल्यावर नेहमीप्रमाणे ज्या भावना मनामध्ये येतात त्या त्यादिवशी देखील  पुनश्च जागृत झाल्या. मागच्या बाजूला मंदिरातील घंटेचे आवाज भाविकांचा गजबजाट आणि समोर सौम्य पण काही काळ रौद्ररूप धारण केलेल्या समुद्र लाटा. त्यांच्या सहवासात बराच काळ तिथेच बसून होतो.



 

Sunday, June 22, 2025

संगमेश्वरहून गणपतीपुळेकडे रात्री

दुपारी उशिरा पुण्याहून प्रस्थान केल्याने गणपतीपुळेमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला निश्चितच रात्रीचे नऊ ते दहा वाजणार होते. तशीच तयारी आम्ही केली होती. यावेळी पहिल्यांदाच ताम्हिणी घाटातून कोकणात उतरून संगमेश्वरद्वारे गणपतीपुळेकडे पोहोचण्याची योजना होती. संगमेश्वरपर्यंत पोहतोवर रात्रीचे आठ वाजले होते. मुंबई-गोवा मार्गावर नेहमीसारखी रहदारी नव्हती. अधून मधून पावसाच्या धारा पडतच होत्या. त्यामुळे महामार्ग बऱ्याचदा या पाण्यामध्ये चमकून दिसत होता. संगमेश्वरच्या अलीकडे एका पुलाचे काम चालू होते आणि याच मुलाच्या जवळून पश्चिमेकडे जंगलात उतरणारा एक रस्ता गणपतीपुळेच्या दिशेने जात होता. प्रशासनाने नुकतीच तशी पाटी देखील तिथे लावली आहे. पाच-सहा तासांचा महामार्गावरील प्रवास संपवून आम्ही खऱ्याखुऱ्या कोकणातल्या रस्त्यांकडे वळालो होतो. मागील एका प्रवासामध्ये याच मार्गावरून पुण्याकडे परतल्याचे मला आठवते. परंतु त्यावेळी मी स्वतः गाडी चालवत नव्हतो. शिवाय यावेळी रात्रीचा प्रवास होता. रस्ता जवळपास एकेरीच. समोरून गाडी आली तर आपली गाडी डांबरी रस्त्याच्या खाली घ्यावी लागेल इतकी त्याची रुंदी. अशा रस्त्यांवरून आमचा प्रवास चालू झाला. ६०-७० किलोमीटर आधीच एका चार्जिंग स्टेशनला गाडी पूर्ण चार्ज केल्यामुळे आता बॅटरीची समस्या उरली नव्हती. म्हणून या प्रवासाचा आनंद घेण्याचे मी ठरवले. रस्त्याच्या दोनही बाजूंना घनदाट झाडे. शिवाय किर्रर्र अंधार. सरळ रस्ता कुठेच लागला नाही. अगदी थोड्याशा अंतरावर एकतर डावीकडे वळण किंवा उजवीकडे वळण घेत आम्ही त्या रस्त्यांवर चाललो होतो. शिवाय रस्त्याचे चढउतार देखील सोबतीला होतेच. चहूबाजूच्या वनराईचे ते निशासौंदर्य न्याहाळत मी गाडी चालवत होतो. अशावेळी इथे कोणी गाडी अडवेल, याची भीती नव्हती. परंतु एका वेगळ्या वेळी अनोळखी रस्त्यावर गाडी हाकण्याचा नवा अनुभव गाठीशी बांधत होतो. गुगलमॅपचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले की आपण अजूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर प्रवास करत आहोत. दोन्हींच्या मध्ये फक्त एक नदी होती…बाव नदी. कदाचित नदीवर कुठेही पूल नसल्याने या रस्त्याने पुढे जाणे क्रमप्राप्तच होते. जवळपास ४० ते ५० किलोमीटरचा हा प्रवास होता. कुणालाही वाटेल अशा रस्त्यांवरचा प्रवास लवकरात लवकर संपावा. परंतु हा विचार देखील माझ्या मनात आला नाही. गणपतीपुळ्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. निसर्गाच्या त्या वळणावळणाच्या घाटांमधून आता बिल्डिंगच्या जंगलांमध्ये पोहोचलेलो होतो.


Friday, June 20, 2025

ताम्हिणी घाट

आत्तापर्यंत मागच्या ४० वर्षांमध्ये मी कधीही मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडलेला पाहिलेला नाही. त्यामुळे जुनच्या सुरुवातीलाच सगळीकडे हिरवाई पसरलेली होती. परंतु पाऊस मात्र थांबला होता. मागच्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ताम्हिणी घाटातील धबधबे प्रवाहित झाले होते. यावेळेसची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळे होते. कोकणात उतरण्यासाठी यावेळी ताम्हिणी घाटाने निघालो होतो. मागच्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. आणि म्हणूनच हळूहळू उन्हाच्या झळादेखील बसू लागल्या होत्या. असं असलं तरी घाटमाथ्यावर बऱ्यापैकी ढगांची रेलचेल दिसून येते. शिवाय अधूनमधून पावसाचा शिडकावा देखील होत असतो. 
ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली तेव्हा देखील या परिसरात सर्वत्र ऊन पडलेलं होतं. मुळशी धरणातील पाण्याने बऱ्यापैकी तळ गाठलेला होता. त्या वळणावळणांच्या रस्त्यांवरून प्रवास करताना आजूबाजूची वनराई छानपैकी हिरवाईने नटलेली दिसत होती. अगदी पावसाळ्याच्या मध्यावर दिसते तशीच. पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. याच परिसरामध्ये डावीकडच्या उंच कड्यांवरून पावसाळी जलधारा सातत्याने कोसळत असतात. मागच्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने इथले जलप्रपात दिसतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु निसर्गाने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. अगदी कडक उन्हामध्ये ताम्हिणी घाटाच्या त्या उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे त्या दिवशी पांढऱ्या शुभ्र पाण्याचा वर्षाव करताना दिसून आले. उन्हामध्ये इतके स्वच्छ धबधबे पाहण्याचा योग त्या दिवशी आला. खर तर हा एक दुर्मिळ असा प्रसंग होता! अर्थात मी स्वतः गाडी चालवत असल्याने कॅमेऱ्यामध्ये हा क्षण टिपू शकलो नाही. केवळ एकाच ठिकाणी नाही तर ज्या ज्या ठिकाणी धबधब्यांचे बिंदू आहेत तिथे सर्वच शुभ्र पाण्याचे जलप्रपात कोसळताना दिसून आले. आणि अर्थातच पावसाळी पर्यटकांची गर्दी देखील तितकीच होती. आकाशात ढगांची गर्दी नसताना, पाऊसही पडत नसताना काळ्या पाषाणांवरून जमिनीकडे झेपणाऱ्या त्या जलधारा म्हणजे निसर्गाचा एक सुंदर अविष्कारच होता.


 

Monday, June 16, 2025

माळशेज व्ह्यू पॉईंट, एमटीडीसी रिसॉर्ट

आळेफाट्याकडून माळशेजच्या दिशेने जाताना पिंपळगाव जोगा धरण लागलं की वातावरणामध्ये थंडावा तयार होताना जाणवतो. उजव्या बाजूला दिसणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि त्याच्या पायथ्याशी सातत्याने झुळझुळणारे पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पाहिलं की मन प्रसन्न होतं. 
मढ गाव संपलं आणि वेळखिंडीतून खाली उतरलो की हरिश्चंद्रगडाच्या अजस्त्र डोंगररांगा दूरवर नजरेस पडतात. वाटत राहतं खिरेश्वर मार्गे टोलारखिंडीतून उतरावं आणि हरिश्चंद्रगडाच्या निसर्ग कुशीमध्ये स्वतःला सामावून घ्यावे. वर्षा ऋतूमध्ये हा परिसर हिरवाईने भरायला लागतो. यावर्षी तर कमालच झाली. अगदी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. याच कारणास्तव माळशेज घाटाच्या अलीकडील हा सर्व परिसर हिरवं लेणं अंगावर घेऊन डोलू लागला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली. मध्येच ढगांची सावली आणि ऊन यांचा खेळ चालू झाला होता. डोंगरमाथ्यावर असल्याकारणाने माळशेज घाटाचा हा परिसर सातत्याने ऊनपावसाचे लपंडाव अनुभवत असतो. त्या दिवशी देखील हीच परिस्थिती होती. डावीकडे सिंदोळा किल्ला मग उधळा डोंगर न्याहाळत आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या रिसॉर्टपाशी पोहोचलो. या रिसॉर्टच्या मागच्याच बाजूला… खरंतर पुढच्या बाजूला बरीच मोकळी जागा आहे. इथून माळशेज घाटाचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य परिसर न्याहाळता येतो. उंच उंच डोंगर आणि त्याच्या मध्याहून कोरलेला घाट, वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्यांवरून हळूहळू पुढे सरकत चाललेल्या गाड्या दूरपर्यंत पाहता येतात. माळशेज घाट चढून येणारे प्रवासी प्रामुख्याने घाटाचे ते दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. पावसाळ्यात ही संधी सहसा कोणी सोडत नाही. त्यादिवशी देखील अशीच गर्दी येथे दिसून आली. पाऊस पडून गेला होता. अधून मधून ढगांच्या आडून ऊन डोकावत होतं. थोडं पुढे चालत गेलं की डोंगरकड्याच्या एका ठिकाणी वाऱ्याचा भयंकर झोत वरच्या दिशेने जात असतो.. दरवेळेस हा आम्ही अनुभव घेतोच. घाटाच्या जंगलांमधून वरच्या दिशेने वाहणारे वेगवान वारे या बिंदूपाशी एकवटतात आणि वेगाने ढगांच्या दिशेने जातात. या वाऱ्यांमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू कड्यावरून खाली जात नाही. ती अतिशय वेगाने वरच्या दिशेने फेकली जाते. आणि तिला जर वजन नसेल तर अगदी रिसॉर्टपर्यंत देखील ती उडून जाऊ शकते! हा आमचा इथला नेहमीचा खेळ. त्यादिवशी देखील पुन्हा एकदा खेळून पाहिला. निसर्गात तयार होणाऱ्या अशा छोट्या छोट्या गमती अनुभवायला देखील एक वेगळीच मजा असते. घाटामध्ये एका ठिकाणी वनविभागातर्फे काही दृश्यबिंदू तयार केलेले आहेत. या ठिकाणावरून देखील माळशेज घाटातील हा परिसर इथली माणसं पाहता येतात. खालच्या त्या घनदाट जंगलामध्ये आपल्या दृष्टीद्वारे स्वतःला सामावता येते. 
समोरच्या हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांवर सातत्याने ढगांची गर्दी त्या दिवशी देखील दिसून येत होती. वाऱ्याच्या प्रवाहासोबतच ढग प्रवास करत होते. अचानक वाऱ्यांचे वेग वाढू लागले, ढगांची गर्दी देखील झाली आणि वर्षाधारा कोसळू लागल्या. यावर्षी माझ्या अंगावर अनुभवलेला तो पहिलाच पाऊस. अगदी चिंब भिजून गेलो. निसर्गाचा दरवर्षीचा अविष्कार पाहण्यासाठी मी सज्ज झालो होतो. यावर्षीचा हा पहिला अनुभव. कदाचित येथून पुढे देखील वर्षा ऋतूतील हा अनुभव पुन्हा शरीर सुखावून जाईल, हे निश्चित.









Saturday, June 14, 2025

ओझर आणि येडगाव धरण

अष्टविनायकांपैकी विघ्नहर गणेशाचे स्थान म्हणजे जुन्नर जवळील ओझर होय. या मंदिरामध्ये आमचे सातत्याने येणे जाणे असतेच. परंतु ओझर गाव ज्या कुकडी नदीच्या आणि येडगाव धरणाच्या काठावर वसलेले आहे, तिथले निसर्ग सौंदर्य पाहत राहणे म्हणजे पर्वणीच असते. येडगाव धरणाच्या बॅकवॉटर परिसरात अजूनही पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाणी साठलेले दिसते. नेहमीच पक्षांची रेलचेल दिसते. त्या दिवशी संध्याकाळी आकाशामध्ये अंधार होण्यापूर्वी घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांचे थवे सातत्याने दिसत होते. पश्चिमेकडे शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या बाजूलाच सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत चालला होता. शिवनेरी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोनेरी किरणांची उधळण दिसून येत होती. त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला अर्थात पूर्वेकडे दूरवर नारायणगड किल्ला देखील हळूहळू अंधारामध्ये गुडूप होताना दिसत होता. धरणातील पाणी मात्र शांत होते. टक लावून ऐकलं की आजूबाजूच्या परिसरातील पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. मागच्या बाजूला गणपती मंदिराततील गजबजाट ऐकू येत असला तरी नैसर्गिक आवाजांची साथ मात्र कानावर सातत्याने पडतच राहत होती. संध्याकाळ आणि सकाळ या दोन्ही प्रसंगी निसर्गामध्ये जो ताजेपणा असतो तो अनुभवताना मनाला एक वेगळीच उभारी येते. असं वाटत राहतं की, हा काळ संपूच नये. संध्याकाळ अंधाराकडे जरी नेत असली तरी ती आपल्या शरीराला सकारात्मकतेची ऊर्जा प्रदान करत असते. या ऊर्जेच्या आधारावरच आपण अंधार स्वीकारू लागतो आणि प्रतीक्षा करत असतो उद्या पुन्हा उजाडण्याची. हे निसर्गचक्र अनुभवने म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते, हे निश्चित.




 

Wednesday, June 11, 2025

आंबेनळी घाट

जवळपास अडीच ते तीन तासांचा गोवा-मुंबई महामार्गावरचा प्रवास करत आम्ही पोलादपूरला पोहोचलो. यावेळी पुण्यामध्ये परतण्यासाठी आंबेनळी घाटाचा पर्याय निवडला. यापूर्वी देखील मी स्वतः या घाटातून कधीच उतरलो अथवा चढलो नव्हतो. त्या दिवशी माझा हा पहिलाच अनुभव होता. कोकणातील दमट वातावरण आणि प्रखर सूर्यकिरणांना मागे टाकत आमची गाडी घाटाच्या दिशेने निघाली. अगदी थोड्याच अंतरावर घाट रस्त्याचा प्रवास देखील चालू झाला. आजूबाजूची हिरवीगार झाडी नागमोडी वळणांनी पार करत हळूहळू चढाच्या दिशेने आम्ही चाललो होतो. 20 ते 25 मिनिटांमध्येच मानवी वस्ती बऱ्यापैकी मागे पडली आणि सह्याद्रीच्या जंगलांमध्ये आमचा प्रवेश झाला. त्या दिवशी घाटामध्ये फारशी वाहतूक नव्हती. अगदीच महाबळेश्वर पाचगणी किंवा वाईला जाणारी वाहने अथवा येणारी वाहने अधून मधून दिसून यायची. परिसरातील वनराजी बऱ्यापैकी दाट होती. कोकणात उतरणाऱ्या अन्य घाटांपेक्षा ती निश्चितच घनदाट वाटत होती. सह्याद्रीच्या अशा जंगलांमधून प्रवास करताना तेथील नैसर्गिक हवा अंगावर घेताना जी शीतलता अनुभवता येते ती निश्चितच मन सुखावणारी असते. त्यादिवशी देखील माझी काही वेगळी भावना नव्हती. जवळपास मध्यापर्यंत घाट चढून आल्यावर एका वळणावरती उंच गगनाला भिडलेला शिवरायांचा प्रतापगड नजरेस पडला. या किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी मार्ग झालेला आहे. त्यामुळे त्याची उंची इतकी जाणवत नाही. परंतु आंबेनळी घाटाच्या या बाजूने प्रतापगडाचे रौद्ररूप मात्र मनात भरले. साडेतीनशे वर्षांपूर्वी याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 दातांचा बोकड कापला होता याची वारंवार आठवण येत राहिली. शिवाजी महाराजांनी त्याकाळी या किल्ल्याची का निवड केली असावी? याचे उत्तर मात्र मला मिळाले. किल्ल्याभोवती असणार जावळीचं घनदाट जंगल म्हणजे या परिसराचं नैसर्गिक संरक्षणच होतं.
घाट चढून जवळपास सपाटीला आल्यावर आम्ही बऱ्यापैकी उंची गाठलेली आहे याची जाणीव झाली. ठीक ठिकाणी वळणावर उंच कडा वाहने सावकाश चालवा अशा पाट्या लावलेल्या दिसल्या. कोकणात उतरणाऱ्या अन्य कुठल्याही घाटात अशा प्रकारची पाटी दिसली नाही. शिवाय वरून पाहिल्यावरती खालच्या बाजूला खोल खोल दर्या दिसत होत्या. कदाचित हा सर्वात उंचीवरचा घाट असावा. अनेकदा  अरुंद रस्त्यांवर गाडी चालवताना येथे धडकी देखील भरते. जिथवर नजर जाईल तिथपर्यंत केवळ जंगलच जंगल नजरेस पडत होतं. रायगड जिल्ह्याची हद्द संपून आम्ही सातारा जिल्ह्यात अर्थात महाबळेश्वर मध्ये प्रवेश केला. आणि लगेचच थंडगार वाऱ्यांनी आमचे सहर्ष स्वागत केले. महाबळेश्वरला पोहोचलो तोवर वातावरणात बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. आजूबाजूच्या घनदाट वनराईमुळे थंडगार वाऱ्याचे झोप अंगावर घेत आम्ही वाईच्या दिशेने प्रस्थान केले.

--- तुषार भ. कुटे 











Thursday, May 22, 2025

खवणे पॅराडाईज

सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला तालुक्यातील खवणे समुद्रकिनाऱ्यावरचा हा आमचा पहिलाच प्रवास. रविवार असल्याने बऱ्यापैकी गर्दी दिसून येत होती. तरीही सिंधुदुर्ग जिल्हा पुणे-मुंबईपासून दूर असल्याने रायगड, रत्नागिरीच्या तुलनेत या ठिकाणी गर्दी बरीच कमी असते. सावंतवाडी वरून निघालो ते थेट खवण्याच्या समुद्रकिनाऱ्याकडेच. किनाऱ्याच्या अलीकडेच उजव्या बाजूला समुद्राच्या बॅकवॉटरच्या दिशेने एक रस्ता खाली उतरतो. या बॅकवॉटरच्या काठावर खवणे पॅराडाईज या होमस्टे मध्ये आम्ही थांबलो होतो. समोर समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये पसरलेली कांदळीवने दिसून येत होती. त्याच्या काठावरच आमचा निवास होता. मागच्या वर्षीपासून इथे कयाकिंग सुरू झालेले आहे. रविवार असल्याकारणाने या तलावसदृश जलवनामध्ये रंगीबेरंगी होड्यांची गर्दी झालेली दिसली. वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले पर्यटक अतिशय उत्साहाने वल्हे मारत होड्या चालवत होते. आजूबाजूने कांदळी वनाने वेढलेल्या त्या जलसांभारामध्ये या रंगीबेरंगी होड्या विशेष भासत होत्या.
अजून दोन दिवस तरी आमचा या ठिकाणी मुक्काम असणार होता. विशेष म्हणजे मोबाईलला रेंज नव्हती! त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क जणू तुटल्यातच जमा होता. इंटरनेटसुद्धा बंदच. म्हणून समोरच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत राहणं हा एकच उद्योग उरला होता.











Saturday, April 5, 2025

मांगणी देवी मंदिर

जवळपास दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा हडसर किल्ल्यावर गिर्यारोहण करण्याची संधी मिळाली. वातावरण पावसाळी होते. त्यामुळे आजूबाजूचा पूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजावरून समोरच्या हिरव्यागार डोंगररांगा ढगांच्या गर्दीमध्ये न्याहाळताना एका टोकावर एक मंदिर दृष्टीस पडले. हे मांगणी देवी मंदिर. तेव्हापासूनच या डोंगराच्या टोकावरील मंदिरात जाऊन यावे, असे वाटत होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये योग आला नाही. एक दिवस मी एकट्यानेच या डोंगराच्या टोकावर जाण्याचे ठरवले. मांगणेवाडी हे या डोंगराच्या पायथ्याचे गाव. जुन्नरचा गणेशखिंड घाट याच डोंगरामध्ये आहे. गणेश खिंडीच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराच्या टोकावर मांगणी देवीचे हे मंदिर स्थित आहे.
सकाळच्या प्रहरी साडेसहाच्या दरम्यान गावातून वाट काढत मी डोंगर सर करायला सुरुवात केली. उन्हाळा असल्याकारणाने रस्त्याच्या आजूबाजूला केवळ वाळलेले गवत होते. त्यामुळे वाट देखील व्यवस्थित दिसत होती. परंतु आजूबाजूला चिटपाखरू देखील नव्हते. वळणावळणाच्या त्या रस्त्याने मार्ग काढत मी पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचलो. त्या ठिकाणावरून नाणेघाटापर्यंतच्या डोंगररांगा दृष्टीस येत होत्या. आणि समोरच आणखी एका उंचवट्यावर मांगणी देवीचे मंदिर देखील दिसून आले. अगदी काही मिनिटांमध्येच मी डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर अर्थात मंदिरापाशी पोहोचलो. तिथून दिसणारा नयनरम्य परिसर कदाचित शब्दांमध्ये मांडणे निश्चितच अवघड होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जवळजवळ पूर्ण जुन्नर तालुका, इथले किल्ले, डोंगररांगा, पाणीसाठे तसेच छोटी छोटी गावे स्पष्ट दिसत होती. त्यामुळे इथला व्हिडिओ काढण्याचा मोह मला आवरला नाही.

--- तुषार भ. कुटे 


 








Wednesday, March 19, 2025

किल्ले निवती

कोकणातल्या प्रत्येक प्रवासामध्ये किमान एक तरी किल्ला पाहता येतो. यावेळी आम्ही वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या किल्ले निवतीला भेट दिली. खवणे गावापासून अर्ध्याच तासाच्या अंतरावर कोकणातील वळणावळणाचे रस्ते पार करत आम्ही पोहोचलो. दुपारचे ऊन बऱ्यापैकी होते. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या निवती गावातून एक डांबरी रस्ता किल्ल्याच्या दिशेने जात होता. त्याच रस्त्याने आम्ही थेट किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. सोमवार असल्याकारणाने येथे फारशी गर्दी नव्हतीच. गाडी ज्या ठिकाणी लावली तेथून समुद्रकिनारा व्यवस्थित दिसत होता. समोरच भोगवे किनारा दिसून आला. आणि दूरवर खोल समुद्रामध्ये डोंगर देखील दिसून येत होते. यापैकीच एका खडकावर निवतीचा दीपस्तंभ अर्थात ‘लाईट हाऊस’ बांधलेले आहे.
निवतीचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम झाल्यानंतर लगेचच या किल्ल्याची बांधणी झाली, असे इतिहास सांगतो. करली नदीचे खोरे आणि वेंगुर्ला यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली असावी. आज तो पूर्णपणे भंगलेल्या स्थितीत असल्याचे दिसते. क्रांती रेडकरच्या ‘काकण’ या चित्रपटामध्ये हा किल्ला दाखवलेला आहे. तेव्हापासूनच तो पाहण्याची माझी उत्सुकता होती.
आज किल्ल्याचे बुरुज पावसामुळे माजलेल्या दाट झाडीमध्ये भग्नावस्थेत लपल्याचे दिसून येत होते. किल्ल्याकडे जाणारी पायवाट देखील एकावेळी केवळ एकच जण जाऊ शकेल, इतकी रुंद होती. जाताना आजूबाजूला पडलेले पाषाणाचे अवशेष दृष्टीस येत होते. मध्यवर्ती भागात देखील पहारेकर्‍यांची देवडी, बुरुज आणि तटबंदी या वास्तू हा किल्ल्याचा भाग आहे, असं आपल्याला वारंवार सांगताना दिसत होत्या. या दुर्गाच्या शेवटच्या टोकावर एक ध्वजस्तंभ दिसून आला. येथून खालच्या बाजूला जाण्यासाठी रस्ता असावा असे वाटले. समोरच समुद्रकिनाऱ्यावर सोनेरी रंगाचे खडक दिसून आले. एखाद्या विशिष्ट रासायनिक प्रक्रियेतून त्यांचा रंग असा झाला असावा असे वाटते. किल्ल्याचा घेर हा अंदाजाने बांधता आला नाही. कदाचित इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्या ताब्यात हा किल्ला आल्यानंतर त्याची बहुतांश पडझड झाली असावी असं वाटलं. परतीच्या मार्गावर जाताना निवतीच्या छोटेखानी समुद्रकिनाऱ्याची देखील दर्शन झाले.

--- तुषार भ. कुटे.

#दुर्ग #किल्ला #कोकण #भटकंती #समुद्र #किनारा #महाराष्ट्र #मराठी #शिवाजी_महाराज