माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, December 31, 2023

दुधारी डोंगर

शिरोलीच्या या दुधारी डोंगरावर मी यापूर्वी अनेकदा एकट्यानेच ट्रेकिंग केलेली आहे. पण यावेळेस पहिल्यांदाच एका धारेने चढाई तर दुसऱ्या धारेने खाली उतरलो. कदाचित याच दोन पायवाटांमुळे या डोंगराला दुधारी असे म्हणत असावेत. हिवाळ्यातल्या एका शीतल सकाळी चढाई करताना फारशी दमछाक झाली नाही. यावेळेस मागील वेळेपेक्षा पाच मिनिटे लवकरच टोकावर पोहोचलो.
सकाळच्या प्रहरी आजूबाजूच्या परिसरात फारसा गोंगाट जाणवत नाही. त्या दिवशी देखील तो नव्हता. अगदी दोनच मिनिटात दुसऱ्या बाजूने डोंगर उतरायला सुरुवात केली. ही वाट तशी मळलेली आहे. परंतु या मार्गाने मी पहिल्यांदाच खाली उतरत होतो आणि महत्त्वाची म्हणजे या बाजूला उतार कमी आहे. म्हणूनच त्याचे अंतर देखील जास्त आहे. उतरताना रस्त्याला एका ठिकाणी एक बोराचे झाड दिसून आले. ते बोरांनी पूर्ण लगडलेले होते. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी किंबहुना बऱ्याच वर्षांनी अशी रानटी बोरे खायला मिळाली. खाली उतरताना रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. हमरस्त्याला लागलो तिथे देखील कोणीही दिसून आले नाही. एक चांगला भला मोठा रस्ता गावाच्या दिशेने जातो. याच्या आजूबाजूला उसाची, कांद्याची, डाळिंबाची शेती आहे. सूर्य बऱ्यापैकी वर आलेला असला तरी वातावरणातील या ठिकाणची शांतता काहीशी भयावह अशीच होती. बिबट्यांचे निवासस्थान असणाऱ्या आमच्या जुन्नरमध्ये दिवसा देखील त्याचे दर्शन होते. कदाचित तो अशाच कुठल्यातरी शेतामध्ये लपलेला असावा, असं वाटून गेले आणि दुधारी डोंगराचा हा प्रवास सुफल झाला.


 

Saturday, November 18, 2023

दुर्गादेवीचे दुःख

बारा वर्षांपूर्वी पहिल्यांदा दुर्गुवडी किल्ल्याच्या शोधार्थ या भागामध्ये आलो होतो. जुन्नर मधला हा अतिशय पश्चिमेतला दुर्गम भाग. शहरी संस्कृतीपासून दूर आणि खेडेपण जपून होता. इथे आल्यानंतर निसर्गाची एक अद्वितीय अनुभूती मिळाली. इथल्या वृक्षवल्लींच्या रूपाने ऑक्सिजनचं कोठार गवसल्याचा आनंद झाला होता. याच कारणास्तव जुन्नरमधील फिरण्यासाठी हे आमचं सर्वात लाडकं ठिकाण झालं होतं. परंतु मधल्या काळात परिस्थिती बदलत गेली. सोशल मीडियाद्वारे अशी निरनिराळी छुपी ठिकाणे लोकांना समजत गेली. म्हणूनच शहरी लोक फिरण्यासाठी किंबहुना दंगा करण्यासाठी या भागात यायला लागली. वनविभागाने देखील याची दखल घेऊन इथल्या कोकणकड्यावर रेलिंग बांधले, शिवाय अनेक साधन सुविधा देखील निर्माण केल्या. पावसाळ्यामध्ये स्वर्गाची अनुभूती देणारा हा परिसर आहे. म्हणूनच पावसाळी बेडकांचा अर्थात पर्यटकांचा देखील वावर वेगाने वाढत गेला आणि हाच वावर आता इथल्या निसर्गाच्या मुळावर घाव घालू पाहत आहे. आज जेव्हा वृक्ष विविधतेचं भांडार असणाऱ्या दुर्गावाडीला येतो तेव्हा नेहमीच पर्यटकांची गर्दी येथे पाहायला मिळते. त्यांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या, पिशव्या यांचा खच पडलेला दिसून येतो. भविष्यात तो अजून वेगाने वाढेल यात शंका नाही. हा कचरा निसर्गाची हानी करतो आहे. येणारे लोक बिनदिक्कतपणे सर्व कचरा इथेच टाकून जातात. मग तो उचलणार कोण? ही जबाबदारी स्थानिक रहिवाशांची आहे की निसर्ग स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवी संघटनांची? याचे उत्तर ज्याने त्यानेच शोधायला हवे.


मॉलमधली दिवाळी

पाश्चात्य संस्कृतीचे सातत्याने प्रदर्शन आणि समर्थन करणारे ठिकाण म्हणजे मॉल! परंतु, यावर्षी चिंचवडच्या एल्प्रो सिटी मॉलमध्ये आम्हाला काहीतरी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या इतिहासात मानाचे स्थान असणारे शिवरायांचे किल्ले या मॉलमध्ये दिसून आले. आपल्या सर्व प्रमुख किल्ल्यांच्या प्रतिकृती भव्य स्वरूपात येथे तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वांनी एकदातरी निश्चितच पाहाव्या आणि कौतुक कराव्या अश्याच आहेत. 



Thursday, July 27, 2023

गोवादुर्ग

गोवा नावाचा किल्ला महाराष्ट्रामध्ये आहे याची माहिती आम्हाला नव्हती. हर्णै बंदरावर पोहोचलो तेव्हा इथे कणकदुर्ग आणि गोवादुर्ग नावाचे दोन किल्ले आहेत, असं समजलं. समुद्रामध्ये जो चिंचोळा भूभाग प्रवेश करतो तो कणकदुर्ग होय आणि त्याच्याच अलीकडे गोवादुर्ग किल्ला आहे. कणकदुर्गवर भेट देऊन परतताना या गोवा किल्ल्यावर जावे असे ठरवले. संध्याकाळी सूर्य मावळायला आला होता. तो पूर्ण गुडूप होण्याच्या आधी या किल्ल्यावर पोहोचावे, म्हणून आम्ही लगबगीने कणकदुर्गावरून निघालो. गोवा किल्ल्यापाशी पोहोचलो तोवर सूर्य मावळलेला नव्हता. मी झपझप पावले टाकत किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दारातून आत गेलो आणि एका तटबंदीवर जाऊन सूर्याच्या मावळतीचा तो नजारा न्याहाळू लागलो. इथून समोर समुद्रात दिसणाऱ्या सुवर्णदुर्गवरून सूर्य मावळतीकडे चाललेला होता. अर्थात हा नजारा कॅमेऱ्यामध्ये टिपायचा मोह मला आवरला नाही. सूर्य मावळल्यानंतर देखील सायंप्रकाशात आम्ही किल्ला पाहून घेतला. कनकदुर्गपेक्षा बऱ्यापैकी चांगले अवशेष अर्थात किल्ला म्हणावा असे अवशेष अजूनही गोवादुर्गवर दिसून येतात. तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या, प्रवेशद्वारे आणि त्यावरील शिल्पे या खुणा किल्ल्यावर अजूनही त्याच्या ऐतिहासिकतेची साक्ष देत आहेत. या किल्ल्याची पुनर्बांधणी करून तो आणखी व्यवस्थित करता येऊ शकतो.
मध्यभागी असणाऱ्या ध्वजस्तंभापाशी गेलो की इथून कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्गासहित हर्णै बंदरही व्यवस्थित दिसून येते.















Monday, July 24, 2023

एका फोटोमागची गोष्ट

बरोबर दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या दिवशी माझ्या लग्नाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली होती. अर्थात त्यास अंतिम स्वरूप द्यायचे बाकी राहिले होते. त्याच दिवशी सकाळी मी आणि माझा भाऊ दोघेही ओतूरच्या लागाच्या घाटामध्ये फिरण्यासाठी निघालो होतो. पावसाळ्याचा शेवटचा महिना चालू होता. ओतूर सोडल्यानंतर पुढे फापाळे शिवार नावाचे गाव लागते. तिथे पोहोचल्यावर दूर मुंजाबाच्या डोंगरावर एक धबधबा दिसून आला. या धबधब्यापाशी आम्ही यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे आज तिथेच जाऊया असे ठरवले. मग लागाच्या घाटाने वरती पठारावर पोहोचलो. इथे अहमदनगर जिल्हा सुरू होतो. तसा हा भाग बऱ्यापैकी दुर्गम आहे. रस्ते मात्र ठीकठाक आहेत. घाट चढून थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला वळालो. रस्त्यावर एका ठिकाणी एक सुंदर मंदिर दिसून आलं. तिथूनच पुढे कदाचित या धबधब्यापाशी जाणारा रस्ता असावा, असं वाटलं. रस्त्यावर एक गुराखी गुरे वळताना दिसून आला. त्याला या धबधबाविषयी विचारलं. त्यानेच आम्हाला या धबधब्याचे नाव धूरनळी धबधबा आहे, असं सांगितलं आणि मार्गही दाखवला. वातावरणामध्ये पुन्हा पावसाचा खेळ चालू होता. त्यामुळे पावसाची निश्चितता नव्हतीच.
गुराख्याने सांगितलेल्या मार्गाने आम्ही चालत चालत पुढे गेलो आणि थोडंसं खाली उतरल्यानंतर समोरच धुरनळी धबधबा दिसून आला. त्या दिवशी तिथे बऱ्याच वेगाने वारे वाहत होते. अर्थात त्यामध्ये विस्कळीतपणा होता. म्हणून जेव्हा वाऱ्याचा वेग खालच्या दिशेने जोरात यायचा तेव्हा या धबधब्याचे पाणी वेगाने मागे फेकले जायचे. त्या काळात आजच्या इतकी प्रभावी सोशल मीडिया नसल्यामुळे या धबधब्यापाशी काहीच गर्दी नव्हती. आम्ही पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहोचलो. अचानक वेगाने वारी आले की धबधब्यातून खाली पडणारे पाणी जोरात मागे फेकले जायचे. हा नेहमीचा उर्ध्व जलप्रपात नव्हता. वातावरणाच्या स्थितीमुळे तो आज आम्हाला तसा दिसून येत होता. मी थोडासा मागे थांबलो होतो. भाऊ पाण्यामध्ये चालत गेला आणि समोरून वेगाने वारे आल्यावर त्याच्या अंगावर पाणी उडायला लागले. त्याने दोन्हीही हात उंचावले. आणि त्या क्षणी मी हा फोटो काढला होता.
अनेकांना असं वाटतं की हा ऊर्ध्व जलप्रपात अर्थात "रिवर्स वॉटरफॉल" आहे. पण तसं नाही. अतिशय क्वचित प्रसंगी त्याचे पाणी उलट्या दिशेला फेकले जाते. विशेष म्हणजे हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये कोसळतो. आजकाल पावसाळ्यात या धबधब्याच्या खालच्या दिशेला लोकांची भयंकर गर्दी असते. अनेक जण हा फोटो बघूनच रिवर्स वॉटर फॉल बघायचा म्हणून या ठिकाणी येतात. खराखुरा ऊर्ध्व जलप्रपात बघायचं असेल तर जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी पुणे जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात कोसळणारा धबधबा किंवा दुर्गवाडी पठारावर असणारा छोटेखानी धबधबा पाहता येऊ शकेल.