माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, September 21, 2024

आंबा घाट

काही वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा गाडी घेऊन कोकणामध्ये गेलो तेव्हा याच घाटाने पहिल्यांदा कोकण दर्शन झाले होते. त्यामुळे येथील रस्ते बऱ्यापैकी ओळखीचे झालेले होते. यावेळी मात्र श्रावणातल्या मान्सूनमधला हा प्रवास होता. बऱ्याच वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील झालेली दिसते. रस्ते मोठे झालेत पण जंगलं बोडकी होत चाललीत. निसर्ग आणि विकास यातून कोणतीही एकच गोष्ट निवडणं तसं महाकठीण काम. पण ते आपल्याला करायलाच लागणार आहे….
त्या दिवशी आंबा घाटातून प्रवास करताना पावसांच्या सरींचा आनंद घेत आम्ही घाट चढायला सुरुवात केली. साखरपा ओलांडलं की पुढे फक्त जंगलांचंच राज्य. श्रावणातला पाऊस चालू-बंद होणारा अर्थात केवळ वृक्ष ओले करणारा असतो. धुकं मात्र कायम राहतं. जसेजसे डोंगराच्या जवळ जात होतो तसतशी धुक्याची तीव्रता अधिक गडद होत होती. श्रावणधारा मन प्रसन्न करत होत्या. वळणावळणांच्या त्या रस्त्यावरून प्रवास करताना सह्याद्रीच्या अंगाखांदयांवरून आपण पुढे चाललो आहोत, याची अनुभूती आली. सततच्या पावसाने बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे मंदावलेल्या वाहतुकीत हळूहळू निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही निघालो होतो. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर पावसाची तीव्रता कमी होती, असं वाटलं. पण धुकं मात्र दाट झालं होतं. आजूबाजूच्या घनदाट वनराईवरून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत धुकं काहीसं कमी जास्त होताना दिसून आलं. यावेळी फार दूरवर पाहता आलं नाही. पण मान्सूनच्या आणखी एका रूपाला या घाटातून वेगळ्या दृष्टीने पाहता आलं, याचं समाधान आहे. 







Wednesday, September 18, 2024

एक विहंगम दृश्य!

परंदवाडी (ता. मावळ, जिल्हा पुणे) येथील इंदिरा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातून पवन मावळातील पाच शिवकालीन किल्ल्यांचे विहंगम दृश्य दिसते! एका नयनरम्य दुपारी मी टिपलेले छायाचित्र.
 

 

Monday, September 16, 2024

महामार्ग-६६ वरून १६६ च्या दिशेने (दाभोळे - विलवडे - ओणी रस्ता)

पणजीवरून परतताना उशीर झाल्यामुळे आम्ही त्या दिवशी रात्री राजापुरातच मुक्काम केला होता. सकाळी लवकर उठून पुण्याच्या दिशेने प्रयाण सुरू केले. श्रावणातला पाऊस नेहमीप्रमाणे अधून मधून कोसळतच होता. अचानक एखादी जोरात सर यायची, रस्ता पूर्ण ओला करून जायची आणि मग सर्व काही शांत व्हायचं. मध्येच सूर्याचे दर्शन देखील होत होतं. उन्हापावसाच्या या खेळामध्येच आम्ही मुंबई-गोवा महामार्गावर वेगाने प्रवास करत होतो. याच महामार्गावरील वाटूळ गावाच्या थोडं पुढे उजव्या बाजूला आंबा घाटाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला आम्ही लागलो. एका अर्थाने सह्याद्रीतल्या जंगलांमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. रस्ता जवळपास एकपदरीच होता. परंतु त्यावर कुठेही खड्डे नाहीत. काळ्या-कुळकुळीत आणि पावसाने स्वच्छ झालेल्या त्या नागमोडी रस्त्यांवरून आमचा प्रवास चालू झाला. महामार्गातून आतल्या रस्त्यावर वळलं की कोकणातील ग्रामजीवन अनुभवयास मिळतं. इथली शेती, घरं आणि परिसरातील वस्त्या सर्वकाही अनुभवत आणि मजल दरमजल करत आमचा प्रवास सुरू होता. दृष्टी जाईल तिथवर फक्त जंगलच जंगल. अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावणधारा आणि अचानक पणे होणारं सूर्यदर्शन या निसर्गखेळात फारच मजा येत होती. अशा रस्त्यांवरून तासनतास प्रवास करणं म्हणजे स्वर्गसुखच! कुठेतरी घनदाट झाडी असणाऱ्या डोंगरावरून छोटे छोटे धबधबे कोसळताना दिसायचे. जवळच्या नदीला ते मिळत असावेत. ही नदी म्हणजे मुचकुंडी नदी होय. तिच्या नागमोडी प्रवाहाच्या समांतर आमचा प्रवास सुरू होता. कधी कधी डाव्या बाजूला तीचे दर्शन देखील होत होते. वाहती नदी पाहिली की खरोखरीच निसर्ग चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. सृष्टीची अशी विविध रूपे डोळ्यात साठवत आम्ही रत्नागिरी-सोलापूर महामार्गाला लागलो. आणि पुन्हा एकदा रस्त्यांवरील गर्दीचा भाग होऊन गेलो. 


















Sunday, September 15, 2024

पावसाळ्यातील फोंडाघाट

दाजीपूर अभयारण्यातून बाहेर पडलो आणि थेट फोंडा घाटाच्या दिशेने प्रवास चालू झाला. कोल्हापुराची हद्द संपते तिथे एक छोटी खिंड दिसून आली आणि लगेचच कोकणात प्रवेशकर्ते झालो.
मागच्या वर्षी देखील सिंधुदुर्गमध्ये आलो होतो तेव्हा याच घाटाने मान्सूनच्या वातावरणात रममान होत प्रवास केला होता. त्याची पुन्हा एकदा आठवण झाली. नेहमीप्रमाणे घाट धुक्यामध्ये वेढलेला दिसला. राधानगरीच्या जंगलातून दिसलेली गर्द आणि घनदाट वनराई या घाटामध्ये पुढे आपल्या वारसा नेत होती असे भासून आले. दूरवर डोंगर शिखरांवर लपाछपी खेळणारे धुके आणि सातत्याने कोसळणारा मंद पाऊस आशा वातावरणात वळणावळणाच्या रस्त्यांचा आस्वाद घेत आम्ही चाललो होतो. डाव्या बाजूला डोंगरांवरून कोसळणारे झरे आणि धबधबे मनमोहक निसर्ग संगीत तयार करीत होते. त्या पांढऱ्या शुभ्र जलाभिषेकात चिंब होण्याचा मोह कदाचित फार कमी लोकांना आवरता येईल.


 

Saturday, September 14, 2024

दाजीपूरच्या अभयारण्यातून

कोल्हापुरातून निघालो तेव्हा वातावरण पूर्णपणे ढगाळ होते. अधून मधून पावसाची एखादी सर यायची. ती सुद्धा फक्त रस्ता ओला करण्यापुरतीच. यंदाच्या दमदार पावसाने राधानगरीचा रस्ता हिरव्यागार वनराईने फुललेला होता. पाऊण-एक तासानंतर आम्ही खिंडी वरवडे गावामध्ये पोहोचलो. आणि उजवीकडे राधानगरी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागलो. पावसाळ्यातल्या अन्य रस्त्यांप्रमाणेच बऱ्याच ठिकाणी याही रस्त्याची स्थिती दिसत होती. पण ती देखील सुरुवातीलाच. पुढे गेल्यानंतर रस्ता बऱ्यापैकी ठीकठाक होता. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये, डोंगरदर्‍यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याने आम्ही मार्गक्रमण करत चाललो होतो. डोंगरमाथ्यावरील ढगांची गर्दी वाढत चाललेली होती. आणि वातावरण देखील ढगांमुळे अधिक गडद झाल्याचं भासत होतं.
वळणावळणाचे ते रस्ते पार करत आम्ही दाजीपूर अभयारण्यामध्ये शिरलो. गव्यांसाठी हे अभयारण्य सुप्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी तशा पाट्या देखील लावलेल्या दिसल्या. धुके आणि पावसाचा खेळ पूर्ण रस्त्याने चालूच होता. अधेमध्ये एखादं गाव लागायचं. त्यातील वस्ती देखील फार मोठी नव्हती. गावाकडच्या जीवनाचे प्रतिबिंब अनुभवत आम्ही फोंडा घाटाच्या दिशेने निघालो. अगदी थोड्याच वेळामध्ये राधानगरी धरणाचा जलाशय दिसून आला. दोन-तीन दिवसांपूर्वीच हे धरण १००% भरले होते. शिवाय त्याचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडले होते. परंतु पाण्याची एकंदरीत आवक पाहता धरण १००% च्या पातळीवरच स्थिर असावे असे वाटून गेले. धरणाच्या उत्तरेकडून जंगलामधून जाणाऱ्या रस्त्याने आम्ही हळूहळू चढत्या दिशेला चाललो आहोत, असे वाटत होते. डाव्या बाजूला निसर्ग झाडीतून राधानगरीचा जलाशय सातत्याने नजरेस पडत होता तर उजवीकडे डोंगरांवरून खळाळते झरे आणि धबधबे देखील दृष्टीस पडत होते. याच रस्त्यावर राऊतवाडीचा सुप्रसिद्ध धबधबा देखील दिसून आला. लाल मातीच्या पाण्यामुळे त्याचा रंग लालसर दिसून येत होता. येथूनच वळसा घालून आम्ही डोंगर झाडीमध्ये प्रवेशकर्ते झालो. एव्हाना रस्त्याची गर्दी पूर्णपणे नाहीशी झाली होती. मंद धुक्याच्या वातावरणात प्रवास करत आणि पावसाचे तुषार अंगावर झेलत त्या हिरव्या झाडीतून आम्ही पुढे निघालो होतो.
सह्याद्रीच्या अशा छत्रसावलीमध्ये निसर्गाचे वर्षा ऋतूतील अप्रतिम सौंदर्य दृष्टीस पडते. ते किती साठवू आणि किती नको, या प्रश्नाचे उत्तर देखील आपण सातत्याने शोधत राहतो. असेच काहीसे त्या दिवशी आमच्या बाबतीत देखील घडले.










Friday, September 13, 2024

रंकाळा

आजवर जितक्या वेळा कोल्हापुरामध्ये आलो त्या प्रत्येक वेळेस रंकाळा तलाव मी पाहिलेला आहे.  यंदा पहिल्यांदाच वर्षा ऋतूमध्ये हा तलाव अनुभवयास मिळाला. यंदा देखील कोल्हापुरात वर्षावृष्टी चांगली झाल्याने तलावात बऱ्यापैकी पाणी जमा झाले होते. इथे नियमित दिसणारी बदके पाण्यावर पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसली. शिवाय काहीसे मंद वारे चालू असल्याने समुद्रासारख्या लाटा देखील तयार होताना दिसत होत्या. शहरातल्या लोकांना समुद्राचा अनुभव असेच शहरी तलाव देत असतात. रंकाळा देखील त्याला अपवाद नव्हता. 




 

Monday, September 9, 2024

विलासगड दुर्ग

सांगली शहरापासून सर्वात जवळ असलेला डोंगरी किल्ला म्हणजे विलासगड होय. निघण्याच्या आदल्या दिवशी गुगल मॅपवर त्याचे स्थान शोधले. माझ्या सध्याच्या स्थानापासून त्यांचे अंतर होते जवळपास ४० किलोमीटर. सकाळच्या वेळी जरी निघालो तरी किमान पाऊण तास तरी लागणार होता. म्हणून आदल्या दिवशी लवकरच झोपलो. सकाळी साडेपाच वाजता जाग आली आणि सहा वाजेपर्यंत मी किल्ल्याची चढाई करण्यासाठी तयार झालो होतो. हिवाळा असल्यामुळे दिवस लहान होता आणि सूर्यही उशिरा उगवणार होता. त्यामुळे अजूनही बऱ्यापैकी अंधार पडलेला होता. सांगलीहून निघालो तेव्हा सूर्य उगवण्याची काहीच चिन्हे नव्हती. रस्त्यावर देखील तुरळक गर्दी होती. गाडी आष्टाच्या दिशेने लागली तोवर रस्त्यांवरील पथदीप देखील बंद झालेले होते. सांगलीच्या बाहेर इस्लामपूरच्या दिशेने जाणारा रस्ता बऱ्यापैकी खराब झालेला होता. शिवाय बऱ्याच ठिकाणी खड्डे देखील पडलेले होते. त्यातूनच वेगाने वाट काढत मी आष्टाच्या दिशेने निघालो. आष्टामध्ये पोहोचलो तेव्हा काहीसा सकाळचा संधी प्रकाश दिसायला लागला होता. तसेच आजूबाजूची उसाची शेती देखील हिरवीगार दिसत होती. आष्टा गावातून डावीकडे एका फाट्याने येडेनिपाणीच्या दिशेने निघालो. रस्ता वळणावळणाचा आणि हिरव्यागार उसाच्या शेतातून जाणारा होता. सकाळच्या त्या प्रहरी या रस्त्यावर प्रवास करणारा कदाचित मीच एकटा होतो. रस्त्यात लागलेल्या एका गावापाशी परिवहन मंडळाची बस दिसून आली. तेव्हा हायसे वाटले. सुमारे पावणे सात ते सातच्या सुमारास मी येडेनिपाणी गावच्या अलीकडेच डाव्या बाजूला वळण घेतले. एव्हाना त्या डोंगरावरील मल्लिकार्जुनाचे मंदिर व्यवस्थित दिसत होते. निघण्यापूर्वी या किल्ल्याचे तसेच किल्ल्यावरील मल्लिकार्जुनाच्या मंदिराची छायाचित्रे आंतरजालावर पाहिली होतीच. म्हणून सदर किल्ला ओळखण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावली. त्यावेळी येथे येणारा कदाचित मी एकटाच असेल. या किल्ल्यावर मल्लिकार्जुनाचे देवस्थान आहे म्हणूनच पायथ्यापासूनच भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी अतिशय व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या दिसल्या. आजूबाजूला बऱ्यापैकी सुंदरसं जंगल होतं. परंतु बहुतांश झाडाची पानगळ झालेली दिसली. किल्ला चढायला सुरुवात केली आणि झपाझप पायऱ्या चढत थेट मल्लिकार्जुनाच्या मंदिरापाशीच थांबा घेतला. जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटे इथे पोहोचायला लागली असती. एव्हाना सूर्यदेवाने पूर्व क्षितिजावरून दर्शन दिले होते. सूर्याचा आता कोवळा प्रकाश आसमंतात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेला दिसला. ऊस पट्ट्यातली ती हिरवीगार शेती आता व्यवस्थित दिसायला लागली होती. दूरवरुन या डोंगरावर दिसून आलेले मल्लिकार्जुनाचे देवस्थान आता जवळू लागलं होतं. डोंगरात खोदलेल्या एका लेण्यांमध्ये मल्लिकार्जुन देवस्थान स्थित असल्याचे दिसले. आतमध्ये शंकराची एक पिंडी देखील होती. मानवी कारागिरांनी खोदलेलं ते एक सुंदर लेणं होतं. मंदिराच्या आत जाऊन आलो आणि पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो. येथूनच वरच्या बाजूला जाण्यासाठी एक पायवाट देखील दिसून आली. विलासगड दुर्गाच्या पाऊलखुणा याच भागात दिसून येतात. पाचच मिनिटांनी किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावर पोहोचलो. इथे खऱ्याखुऱ्या दुर्ग पाऊलखुणा दिसून आल्या. मंदिर आणि दर्गा यांच्या भिंती एकमेकांना लागलेल्या होत्या. समोरच एक भग्न अवस्थेतील कृष्णमंदिर होते. तर दर्ग्याला लागून विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर देखील दिसून आले. त्याच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा अखेरच्या घटका मोजत असलेला दिसला. दर्ग्याला वळसा घालून पूर्वेकडे आलो तर तिथे देखील किल्ल्यावरील वाड्यांचे भग्नावशेष आढळून आले. समोरच्या बाजूला बऱ्यापैकी मोकळे मैदान होते. किल्ल्यावरील एकमेव टाके पाण्याअभावी सुकलेले दिसले. काही वेळ आजूबाजूचा परिसर न्याहाळून मी परतीच्या मार्गाला लागलो. अधूनमधून तुटलेल्या तटबंदी देखील दिसून होत्या. आणि शिवरायांच्या स्वराज्यातील किल्ल्यांवर असलेला जरीपटका इथे मनाने डोलताना दिसून आला.


















Sunday, September 1, 2024

सुवर्णदुर्ग

हर्णै बंदराच्या काठावर तीन किल्ले आहेत. अर्थात हे सर्व किल्ले आपण दोन ते तीन तासांमध्ये सहज बघू शकतो. संध्याकाळच्या वेळेस आम्ही हर्णै बंदरावर पोहोचलो होतो. सूर्य जवळपास मावळतीकडे झुकलेलाच होता. आधी कणकदुर्ग आणि नंतर गोवादुर्ग किल्ला पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. खरंतर इथे येण्याचा येण्याचे उद्दिष्ट हे समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्याचेच होते. परंतु संध्याकाळी जाऊन येण्यास उशीर लागत असल्याने आम्ही तो बेत रद्द केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच किल्ला पाहण्याचे ठरवले. या योजनेप्रमाणे आम्ही सकाळी हर्णै बंदरावर पोहोचलो. कणकदुर्गाच्या पायथ्याशी सुवर्णदुर्गाच्या दिशेने जाणाऱ्या बोटी लागतात. याची चौकशी आम्ही कालच करून ठेवलेली होती. त्यामुळे आज गेल्यागेल्या लगेचच बोटीने सुवर्णदुर्गाच्या दिशेने निघालो. कणकदुर्गाचा समुद्राच्या दिशेने गेलेला सुळका ओलांडून जवळपास १५ ते २० मिनिटांमध्ये आम्ही सुवर्णदुर्गापाशी पोहोचलो. किनार्‍यापासून हा किल्ला एक किलोमीटर देखील आतमध्ये नसावा. अजूनही बांधणी उत्तम स्थितीमध्ये आहे.
किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी आम्ही पोहोचलो होतो. समुद्रकिनाऱ्यावर असते तशीच वाळू या ठिकाणी पसरलेली दिसली. महाद्वाराच्या पायरीवर एक कासवाची प्रतिमा कोरलेली होती. तर उजव्या बाजूच्या तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसून आली. ही मूर्ती बऱ्यापैकी प्राचीन असावी, असे दिसले. किल्ल्याच्या नेहमीच्या रचनेप्रमाणे प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवड्याही दिसून आल्या. आणि त्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या होत्या. अर्थात आजही त्या भक्कम स्थितीमध्ये आहेत. किल्ल्याची पूर्ण तटबंदी अजूनही उत्तम स्थितीमध्ये असल्याची दिसते. अर्थात समुद्रकिनाऱ्यापासून लांब असल्याने किल्ला अजूनही पाहण्यालायक आहे, असे दिसते. डाव्या बाजूने पुढे गेल्यावर विहीर आणि काही राजवाड्याचे अवशेष दिसून आले. तसेच धान्याचे कोठार देखील होते. बऱ्याच ठिकाणी वाड्यांचे अवशेष दिसतात. आतली जमीन काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी खोलगट असल्याची दिसली. पश्चिमेकडचा चोर दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे. त्याच्याजवळ जाऊन बघितले. कदाचित इथून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता असावा. एकंदरीत सहा ते सात विहिरी किल्ल्यावर होत्या. काही ठिकाणी तोफेच्या नळ्या देखील दिसून आल्या.
असं म्हणतात की दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता असणारी कादंबिका देवी हिचे मंदिर त्यांनी कधीतरी सुवर्णदुर्गावरून हलवून अलिबागच्या किल्ल्यामध्ये नेले होते. किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन तास तरी लागतात. शिवाय इथून इथल्या तटबंदीवरून अरबी समुद्र दूरवर क्षितिजापर्यंत दिसून येतो. इसवी सन १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतल्याचे समजते. शिवाय ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये त्याच्यासाठी महाराजांनी दोन हजार रुपये खर्च केल्याचे देखील लिहिलेलं आहे.