कोकणातील सर्व सुप्रसिद्ध मंदिरे ही समुद्रकिनाऱ्यावर वसलेली आहेत. जसे
गणपतीपुळे, वेळणेश्वर, कुणकेश्वर, हरिहरेश्वर इत्यादी. परंतु दापोलीतील
मागच्या भेटीमध्ये आम्हाला असे एक मंदिर मिळाले जे घनदाट झाडीमध्ये आणि
डोंगरावर वसलेले होते.
दापोलीच्या मुरुडमध्ये आमचा मुक्काम होता. इथूनच
सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असूद गाव आहे. गावातील व्याघ्रेश्वर-गारंबी
रस्त्यावर काही अंतरावर डावीकडे खालच्या दिशेने जाणारा एक रस्ता दिसून
येतो. या पायवाटेने आम्ही चालत चालत जंगलामध्ये प्रवेशकर्ते झालो. कोकणातील
इतर जंगलांप्रमाणे हे देखील एक घनदाट जंगल होते. सुरुवातीला पायवाट
उताराच्या दिशेने जाणारी होती. दाट झाडी असली तरी बऱ्यापैकी मनुष्यवस्ती या
ठिकाणी दिसून आली. आजूबाजूला नारळी, पोफळी, सुपारी आणि फणसाची झाडे जी
कोकणामध्ये निसर्ग अस्तित्वाच्या पाऊलखुणा आहेत, दिसून येत होते. सात ते आठ
मिनिटांमध्ये आम्ही उतार संपवून सपाटीवर पोहोचलो. समोर एक निर्जल ओढा
होता. यावर सुंदरसा पूल देखील बांधलेला होता. ओढ्यातील खडकांची रचना पाहता
पावसाळ्यामध्ये इथे वेगाने पाणी वाहत असावे, असे दिसले. ओढा संपला आणि
पुन्हा चढण सुरू झाली. इथून पुढे बऱ्यापैकी पायऱ्यांची रचना केलेली होती.
जितकी उतरण आम्ही उतरून आलो तेवढीच चढण चढून डोंगराच्या दिशेने निघालो
होतो. अगदी पाचच मिनिटांमध्ये मंदिरापाशी पोहोचलो. मंदिर पूर्ण घनदाट
जंगलामध्ये असले तरी आजूबाजूला बऱ्यापैकी मनुष्यवस्ती होती. विष्णूचे हे
केशवराज मंदिर चहूबाजूंनी वनराईने घेरलेले दिसले. कदाचित अलीकडच्या काळात
मंदिराभोवती दगडांचे कुंपण देखील केले असावे. त्याला एक छोटासा दरवाजा
होता. त्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक पाण्याचा खळाळता प्रवाह देखील
दिसून आला. समोरच दिसत असलेल्या एका गोमुखातून हे पाणी वेगाने खाली पडत
होते. तो एक पाण्याचा जिवंत झरा होता. मागील बाजूच्या डोंगरावरून हे पाणी
२४ तास मंदिराच्या कडेने वाहत खाली जात होते. शिवाय हे पाणी पूर्णपणे
पिण्यायोग्य होते. निसर्गाच्या कुशीतून वाहणारे असे थंड पाण्याचे झरे
सह्याद्रीच्या रांगेत बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. याची शितलता आणि स्वच्छता
कदाचित बाटलीतल्या पाण्याला देखील येत नाही.
मंदिरामध्ये आम्ही काही काळ व्यतीत केला. इथल्या निसर्गराईचा आनंद घेतला. आणि पुन्हा परतीच्या वाटेला लागलो.
Tuesday, August 27, 2024
केशवराज मंदिर
Saturday, August 24, 2024
अणुस्कुरा घाट
कोकणातल्या प्रत्येक घाटातून पहिल्यांदा प्रवास करताना त्याबद्दल एक वेगळाच उत्साह असतो. मागील काही वर्षांमध्ये या वेगवेगळ्या घाटातून मी प्रवास केला आणि प्रत्येक वेळी घाटांनी माझ्या डोळ्याचे पारणे फेडले. अणुस्कुरा घाटाबद्दल देखील काहीसं असंच झालं होतं. गोव्याहून परतताना सह्याद्रीच्या जंगलांमधून प्रवास करत आम्ही पाचाळ या गावी पोहोचलो. इथून सहा ते सात किलोमीटर प्रवास केल्यानंतर लगेचच अणुस्कुरा घाटाची सुरुवात झाली.
त्या दिवशी रस्त्यावर रहदारी फारशी नव्हती. परंतु पावसाळी वातावरण होते. अशा वातावरणात सह्याद्रीतले घाटरस्ते अजूनच सुंदर दिसू लागतात. ढगांच्या वातावरणात पसरलेल्या धुक्यामुळे पुढची वाहने दिसत नाहीत. म्हणूनच गाड्या हळूहळू चालवाव्या लागतात. कदाचित यामुळेच इथल्या वातावरणाचा आणखी जास्त आनंदही घेता येतो. त्यादिवशी अणुस्कुरा घाटामध्ये देखील धुके आणि पाऊस पडत होता. आम्ही निसर्गाच्या या आनंदाचा उपभोग घेत घाटमाथ्यावर पोहोचलो. एके ठिकाणी गाडी लावली आणि धुक्याच्या त्या वातावरणामध्ये चिंब होऊन गेलो. अधून मधून अंगावर पडणारा पावसाचा शिडकावा आणि चहूबाजूच्या डोंगरावर वाहणारे धुके त्यामध्ये दिसणारी हिरवी गर्दझाडी, असं अचंबित करणारं वातावरण या घाटामध्ये अनुभवायला मिळालं. अगदी काही मिनिटांमध्येच आम्ही घाटातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचलो. कदाचित कोकणाला जोडणाऱ्या घाटांपैकी हा सर्वात कमी लांबीचा घाट असावा. परंतु इतक्या कमी कालावधीतील प्रवासामध्ये देखील पावसाळी वातावरणाचा आनंद या घाटाने आम्हाला दिला.
Thursday, August 15, 2024
सिंधुदुर्ग रत्नागिरी जंगल
गोव्यातून परतीच्या मार्गाने पुण्याकडे निघालो. सिंधुदुर्गातलं बांदा गाव लागलं की आपल्या मराठी मातीमध्ये प्रवेश केल्याचा अनुभव मिळतो. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना पावसाची रिमझिम काही कमीच होत नव्हती. कुडाळ, ओरोस, कणकवली करत खारेपाटणपर्यंत पोहोचलो. वाघोटण नदी ओलांडली,राष्ट्रीय महामार्ग सोडून उजवीकडे वळण घेतले आणि थेट अणुस्कुरा घाटाच्या दिशेने प्रवास चालू झाला. या वळणापासूनच सह्याद्रीची यंदाच्या मान्सूनमध्ये फुललेली घनदाट वनराई रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसून येत होती. चारपदरी रस्ता जवळपास एक पदरी झाला होता. मागच्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने सह्याद्रीतील ही जंगले आता भरायला सुरुवात झाली होती आणि त्यावरील फुललेली हिरवी-पोपटी पालवी मन प्रसन्न करून जात होती. या रस्त्याने रहदारी जवळपास नव्हतीच. अधूनमधून एखाद दुसरे वाहन समोरून यायचे. घनदाट जंगलांमुळे गावांची आणि वस्त्यांची संख्याही कमीच होती. परंतु अधूनमधून पाऊस आणि कधीमधी ऊन अश्या रम्य वातावरणात आम्ही अनुस्कुरा घाटाच्या दिशेने निघालो होतो. बहुतांश ठिकाणी शेतांची कामे चालू झालेली होती. अर्थात इथल्या पावसाचा अंदाज गावकऱ्यांना असल्याने त्यांची लगबग निश्चितच सकारात्मक दिसून येत होती. वातावरण स्वच्छ झाले की कॅनव्हासवर रेखाटण्यात आलेल्या निसर्गचित्रांची अनुभूती या वातावरणात अधूनमधून येत होती. दोन्ही बाजूंना हिरवी-पोपटी दाट झाडी आणि त्यामधून वळणावळणाचे काळेशार रस्ते पाहण्याचा तो दुर्दम्य आनंद होता. राष्ट्रीय महामार्गावरून आत वळण्याच्या आधी वाघोटण नदी पार केली होती. यापुढील प्रवासात देखील ही नदी तीन ते चार वेळा पुन्हा पार केली. अर्थात जंगलातल्या वळणावळणाने ही नदी आपला मार्ग शोधत पुढे चालली होती. नदीचा प्रवाह पावसाच्या पाण्यामुळे शितलतेची आणखी एक पायरी पुढे टाकून वेगाने वाहत असलेला दिसला. नदीच्या दोन्ही काठांवर फक्त झाडेच झाडे. अगदी विरळ मनुष्यवस्ती या भागामध्ये दिसून येत होती. काही ठराविक अंतरावर छोट्या छोट्या गाववस्त्या दिसून यायच्या. कोकणातले ग्रामीण लोकजीवन येथे पाहायला मिळाले. गर्द झाडीतील कोकण रेल्वेचा मार्गदेखील आम्हाला दिसला. आणि सुदैवाने या मार्गावरून वेगाने धावणारी आगगाडी देखील दिसून आली. लहान मुलांची शाळा सुटल्याने देखील त्यांची ठिकठिकाणी आपल्या घरी जाण्यासाठी चाललेली लगबग दिसत होती. काही ठिकाणी उंच तर काही सखल घाटरस्ते पार करत आम्ही अणुस्कुरा घाटाच्या दिशेने चाललो होतो. कधी रत्नागिरी तर कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पाट्या या ठिकाणी दिसायच्या. म्हणजेच आम्ही दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून प्रवास करत होतो! वर्षांनी वर्षे मनुष्याला प्राणवायू देणारी ही जंगले भरलेली बघून मनाला एक सुखद अनुभूती प्राप्त होत होती. एकंदरीत प्रवासात असंच वाटत राहिलं की, याच जंगलातून या रस्त्यांवरून तासनतास असाच प्रवास करत बसावे.
पाऊण-एकतासानंतर आम्ही मुख्य रस्त्यावरील पाचाळ या गावी पोहोचलो आणि थोड्याच अंतरावर अणुस्कुरा घाटाची सुरुवात झाली होती…
Tuesday, August 13, 2024
पणजी
शेकडो वर्षे गोवा प्रांतावर पोर्तुगीजांची सत्ता होती. याच कारणास्तव आजही गोव्यात पोर्तुगीजांच्या बहुतांश पाऊलखुणा नजरेस पडतात. त्यात प्रामुख्याने किल्ले आणि चर्च यांचा समावेश होतो. याशिवाय गोव्याची राजधानी असणाऱ्या पणजी मध्ये पोर्तुगीज वास्तुकलेच्या रचना आजही पाहायला आणि अनुभवायला मिळतात. समाज माध्यमांवर गोव्यातील फाउंटन हास या भागाचे विविध छायाचित्रे व्हायरल झालेले पाहायला मिळतात. किंबहुना पणजीची ती ओळखच असल्यासारखी आहे. पणजी शहराच्या मध्यवर्ती भागात बांधलेल्या इमारती आजही पोर्तुगीज वास्तुशैलीमध्ये वसलेल्या दिसतात.
राष्ट्रीय महामार्ग सोडून आम्ही पणजी शहरामध्ये या ठिकाणी दुपारी बाराच्या सुमारास पोहोचलो असू. त्या दिवशी आठवड्यातला मधला दिवस होता. शिवाय पावसाळा चालू असल्याने शहरांमध्ये पर्यटकांची गर्दी देखील नव्हती. म्हणूनच शोधत शोधत पणजीच्या अल्टींनो टेकडी भागामध्ये आलो. इथे शहरातल्या
छोट्या छोट्या गल्ल्या दिसून येत होत्या. हा संपूर्ण भाग रहिवाशी आहे.
म्हणून मुख्य रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि पायीच रस्त्यांवर आम्ही
फिरू लागलो. प्रत्येक घराचा रंग वेगवेगळा आहे. त्याची रचना भारताच्या अन्य
भागामध्ये कुठेही दिसून येत नाही. अशी रंगीबेरंगी घर इथल्या
गल्ल्यागल्ल्यांमध्ये दिसून येतात. त्यातून फिरलं की, कुठल्यातरी वेगळ्याच
देशात फिरत आहोत असा भास होतो.
समाजमाध्यमांवर इथे बनवलेले रील्स
लोकप्रिय झाल्यामुळे बहुतांश शनिवार-रविवारी इथे पर्यटकांची गर्दी होत
असावी. कदाचित याच कारणास्तव इथल्या रहिवाशांनी येथे ‘फोटोग्राफीला
परवानगी नाही’चे फलक देखील लावलेले आहेत. तरीदेखील आम्ही त्या गल्ल्यांमधून
फिरून ठिकठिकाणी फोटो काढले. अर्थात या ठिकाणी फोटो काढले नाही तर
पणजीमध्ये फिरण्याची भावनाच तयार होत नाही,हे ही तितकच खरं.
Sunday, August 11, 2024
मारुतीराय मंदिर, पणजी
दक्षिण गोव्यातून पुण्याच्या दिशेने परतीच्या मार्गावर असताना आम्ही पणजी शहरात प्रवेश केला. पणजीतल्या छोट्या छोट्या रस्त्यावरून वळणावळणाने आम्ही एका छोट्याशा टेकडीपाशी आलो. याच टेकडीवर सुंदर असे मारुतीराय मंदिर दृष्टीस पडले. बहुतांश गेरु रंगाने आणि इतर रंगांच्या संगतीने हे मंदिर रंगवलेले होते. शिवाय एका प्रवेश कमानीतून आत गेल्यावर वरच्या दिशेने मंदिराकडे जाण्यासाठी सुंदर पायऱ्या देखील बांधलेल्या होत्या. खरंतर मंदिराच्या मागील प्रवेशद्वारापर्यंत जाण्याकरता डांबरी रस्ता आहे. परंतु आम्ही पायऱ्यांनीच मार्गक्रमण करत मंदिरापाशी पोहोचलो. गोव्यातील मंदिरांच्या खास शैलीत बांधलेले असे हे मंदिर होते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बांधलेला एक दीपस्तंभ हा लक्ष वेधून घेत होता. त्याच्या शेजारी सभामंडप आणि पुन्हा मंदिराकडे जाण्याकरता छोट्या पायऱ्यांची रचना केलेली दिसली.
हे पणजीमधील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे. असे म्हणतात की, मुख्य मंदिरातील मारुतीची मूर्ती मुख्य रस्त्यावरून, मंदिराच्या तळघराच्या भिंतीच्या उघड्यामधून देखील दिसू शकते.
एकंदरीत मंदिराचा संपूर्ण परिसर रमणीय असाच होता. पणजीला भेट देत असाल तर हे मंदिर नक्की पाहून या.
Saturday, August 10, 2024
मिरजान किल्ला
गोकर्ण पासून मिरजान किल्ला सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला लागल्यावर आम्ही पुन्हा दक्षिणेच्या दिशेने निघालो. अगदी १५ ते २० मिनिटांमध्येच एक फाटा उजवीकडे मिरजान किल्ल्याच्या दिशेने लागला. इथून दोनच मिनिटांच्या अंतरावर किल्ला दिसून आला. बाहेरूनच किल्ल्याची रचना अतिशय नीटनेटकी आणि शिस्तबद्ध असल्याची जाणवली. शिवाय किल्ल्याचे अवशेष आजही जसेच्या तसे टिकून असल्याचे दिसले. पाऊस अजूनही अधेमधे पडतच होता. किल्ल्याच्या समोरच गाडी पार्क केली आणि चढायला निघालो. तसं पाहिलं तर हा एक भुईकोट किल्ला आहे. प्रवेशद्वारापासून अनेक बुरुज आजही भक्कम अवस्थेमध्ये टिकून असल्याचे दिसतात. पायऱ्या चढतानाच आपण आजही त्याच काळामध्ये वावरत आहोत, असं देखील वाटून गेलं. आज या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे आम्हाला फोटोग्राफीसाठी बऱ्यापैकी रिकामी जागा मिळत होती. मुख्य प्रवेशद्वारातून वरती गेल्यानंतर आजूबाजूचे दोन्ही तटबंद्या दिसून आल्या. त्याकाळी हा किल्ला कोणत्या किल्लेदाराने किंवा स्थापत्यकाराने बांधला असावा त्याला मनोमन नमन करावेसे वाटले. किल्ल्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी आजही शाबूत असल्याच्या दिसल्या. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर किल्ल्याचा मध्यवर्ती भाग दिसून आला. इथे देखील तीन ते चार बुरुज भक्कम अवस्थेमध्ये दिसत होते. याशिवाय पाण्याचे टाके आणि भुजारी मार्ग देखील योग्य ठिकाणी बांधलेले होते. किल्ल्याभोवतीचा काही भाग कदाचित अलीकडच्या काळामध्ये पुन्हा बांधला गेला असावा. परंतु तो तितकासा लक्षात येत नाही. किल्ल्यातील राजवाड्यांचे अवशेष, सभामंडप तसेच अन्य प्राचीन खोल्या आजही इथल्या इतिहासाची साक्ष देतात. १०० एकरामध्ये हा किल्ला स्थित आहे. किल्ल्याला एकंदरीत न्याहाळत असताना पावसाच्या थोड्या थोड्या सरी चालू झाल्या होत्या. आणि अचानक वेगाने पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी भिजलो होतो. पावसापासून बचावासाठी आसरा घेतला तोवर वर्षाधारांनी अजून वेग घेतला होता. त्यामुळे बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून होतो. मग एक छत्री काढली आणि त्याच भर पावसामध्ये किल्ला न्याहाळायला निघालो. पुढील भागातील अवशेष बऱ्यापैकी पडलेले होते. बाहेरून दिसणाऱ्या तटबंदी शाबूत होत्या. परंतु आतमध्ये त्या ढासाळलेल्या दिसून आल्या. एकंदरीत भुईकोट किल्ल्यांची वाईट अवस्था पाहता हा किल्ला आजच्या भाषेत उच्च श्रेणीमध्ये यावा असाच वाटला.
इतिहासामध्ये डोकावले तर अग्निशाणी नदीच्या तीरावर बांधलेला हा किल्ला सोळाव्या शतकातील आहे. त्याचे बांधकाम गैरोपा राणी चेन्नई भैरवी देवी हिने केल्याचे समजते.
भुईकोट किल्ला कसा असावा तसेच त्याचे संवर्धन कसे करावे? हे पाहायचे असल्यास या किल्ल्याला नक्की भेट द्या.
Wednesday, August 7, 2024
गोकर्ण
गोकर्णविषयी दोन-एक वर्षांपूर्वी ऐकले होते. कर्नाटकातील हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे यावेळेसचा प्रवास गोकर्णपर्यंत करायचा असे आम्ही आधीच ठरवले होते. म्हणूनच यावेळेस गोकर्ण हेच मुख्य आकर्षण होते. तिसऱ्या दिवशी गोकर्णला जाऊन यायचे ठरवले. याच दिवशी सकाळी अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश हा T20 विश्वचषकाचा सामना होता. रिसॉर्टवरच आम्ही या सामन्याच्या थराराचा मनमुराद आनंद घेतला. आणि जवळपास ११ च्या सुमारास रिसॉर्टवरून थेट गोकर्णच्या दिशेने निघालो. दोन दिवसांपूर्वी आम्ही महाराष्ट्रातून गोव्यामध्ये प्रवेश केला होता. आज गोव्यामधून कर्नाटकामध्ये जाणार होतो. १५ ते २० मिनिटांच्या गोव्याच्या त्या गर्द झाडीतील प्रवासानंतर आम्ही पनवेल-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ ला लागलो. आणि गाडी सुसाट वेगाने दक्षिणेला निघाली. आज महामार्गावर काहीच गर्दी नव्हती. पाऊस मात्र येत जात होता. कधी कधी त्याचा जोर बराच असायचा तर कधी तो संथगतीने पडत होता. ३० ते ४० किलोमीटर अंतरानंतर आम्ही गोवा-कर्नाटक सीमारेषेवर पोहोचलो. गोव्यातून बाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पोलिसांची नाकेबंदी असते. तशीच या ठिकाणी देखील होती. अर्थात या राज्यातून दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांची तपासणी या ठिकाणी प्रामुख्याने होत असते. अर्थात ती आमची देखील झाली. कर्नाटकात प्रवेश केल्यानंतर आम्ही सुसाट वेगाने गोकर्णच्या दिशेने निघालो. रस्त्यात कारवार हे कर्नाटकातील एक मोठे गाव देखील लागले. इतक्या वर्षांमध्ये या राष्ट्रीय महामार्गाची अजूनही बरीच कामे चालू असल्याचे दिसून आले. या भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला होता. नद्या देखील दुधडी वाहून चाललेल्या होत्या. त्या सुंदर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही गोकर्णच्या फाट्यापाशी पोहोचलो आणि उजवीकडे समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने निघालो. चार पदरी रस्ता आता दोन पदरी झाला होता. आणि पावसाचा वेग देखील वाढीस लागला होता. गर्द हिरवाईने मनमोहक वातावरणात रंग भरल्याचे दिसत होते. आणि आम्हाला गोकर्णला पोहोचण्याची ओढ लागलेली होती. इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी गाडीमध्ये संपलेला सीएनजी गॅस भरून घेतला पुन्हा मार्गस्थ झालो. गोकर्णमध्ये पोहोचलो तेव्हा दुपार झालेली होती. म्हणून दुपारचे जेवण करण्यासाठी एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो. महाराष्ट्रापासून इतक्या दूर असून देखील या ठिकाणी असलेल्या वेटरला मराठी भाषा अवगत होती याचे विशेष वाटले. तसं पाहिलं तर पूर्ण गोव्यामध्ये आम्ही सर्वांशी मराठी भाषेमध्येच बोलत होतो. अर्थात भाषेची अडचण जाणवली नाही.
जेवण संपवून गोकर्णच्या दिशेने निघालो. खरंतर या ठिकाणाने आमचा अपेक्षाभंग करायला सुरुवात केली होती. कारण याविषयी बरंच ऐकलं आणि वाचलं देखील होते, परंतु तशा प्रकारचं हे ठिकाण नव्हतं. छोट्या छोट्या गल्ल्यांमधून मार्ग काढत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. वातावरण पूर्ण ढगाळलेलं होतं. समुद्र खवळलेलाच होता. किनाऱ्यावर बऱ्यापैकी गर्दी होती, परंतु अतिशय अस्वच्छ समुद्रकिनारा या ठिकाणी दिसून आला. आजूबाजूच्या काही डोंगरांवर मंदिरे दिसून येत होती. या व्यतिरिक्त देखील अनेक मंदिरे या परिसरात होती. परंतु इथली अस्वच्छता विशेष करून दिसून येत होती. गुगल मॅपवर देखील अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी जावेसे वाटले नाही. आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. सुमारे दोन तासांचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलो होतो. पण काहीच साध्य झाले नाही. त्यामुळे कर्नाटकामध्ये आलोच आहोत तर कोणत्यातरी ठिकाण बघून जाऊ, असा विचार आम्ही केला. तेव्हा जवळच मिरजान किल्ला दृष्टीस पडला. मग काय… त्या दिशेने मोर्चा वळवला.