माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, March 19, 2024

दंडोबावरील सूर्यास्त

सोलापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरून उजव्या बाजूला वळालो तेव्हा सूर्य हळूहळू पश्चिम क्षितिजाकडे निघालेला होता. दंडोबाच्या टेकडीवरील धुळीने माखलेली झाडे सूर्यप्रकाशातील रंगात वेगळ्या तऱ्हेची भासत होती.
दंडोबाला दंडवत घालून पुन्हा परतीच्या मागे मार्गाने निघालो तेव्हा सूर्य बऱ्यापैकी खाली आलेला होता. टेकडीवरच्या त्या वळणावळणाच्या रस्त्याने तो जणूकाही माझ्याशी लपंडावच खेळत होता, असे वाटले!
#dandoba #hills #sangli #maharashtra #sunset


 

Sunday, March 17, 2024

फरिया बाग

फराहबक्ष…. गुगलवर टाकले आणि मॅप सुरू केला. जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण होते. शहराच्या बाहेर गाडी आल्यावर एका ठिकाणी कॅलव्हरी संग्रहालयाचा फलक दिसला. पुढचा रस्ता हा मिलिटरी भागातून जात होता. केवळ एकच गाडी जाईल एवढ्या छोटा डांबरी रस्त्याने मी आत गेलो. अगदी एका किलोमीटर अंतरावर डावीकडे एक रस्ता छोट्याशा वनक्षेत्रातून पुढे जात होता. साधारणत: अर्धा किलोमीटरवर मला माझे इच्छित स्थळ सापडले. सकाळी तिथे चिटपाखरू देखील नव्हते. परिसर पूर्ण निर्मनुष्य. दूरवरून हा फराह बक्षमहल एका पुराण वास्तूप्रमाणेच दिसत होता. मुस्लिम वास्तुकलेचा तो एक नमुनाच म्हणता येईल. आजूबाजूला असणाऱ्या एकंदरीत परिसरावरून या ठिकाणी कदाचित जुन्या काळी पाण्याचे साठे असावेत, असे वाटले. हा महल एका अष्टकोनी रचनेमध्ये बांधलेला दिसला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने येथे लावलेल्या फलकावरून याचे काम चंगेज खान याने सुरू केल्याचे समजले. बुऱ्हानशहा पहिला याच्या देखरेखीखाली नियामत खान याने हा महल पूर्ण केला. शिवाय बुऱ्हानशहा दुसरा याला तो न आवडल्याने उध्वस्त करण्याचे व पुनर्निर्माण करण्याचा आदेश देखील दिल्याचे इतिहास सांगतो. साधारणत: १५०८ ते १५५३ या दरम्यान हा महाल बांधला गेला असावा. त्या काळात जवळच्याच भिंगार गावातून पाणी आणून त्याच्याभोवती जवळपास १५ एकर जागेमध्ये ते टाकले गेले होते. असे म्हणतात की शाहजहाँने या महालाकडे पाहूनच ताजमहालची रचना केली असावी. परंतु याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.
अहमदनगर मधील इतिहासाच्या पानात जास्त लिहिले न गेल्याने कदाचित हे एक दुर्लक्षित ठिकाण असावे, असे वाटले. बाकी तत्कालीन इतिहासाची छोटीशी का होईना झलक या महलामुळे आपल्याला होते.








एक सूर्यास्त

काही सूर्यास्त खासच असतात. त्यातीलच हा एक.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यास्त अगदी सातच्या नंतर होणार होता. त्या दिवशी सायकल घेऊन मी एका धरणाच्या सफरीवर गेलो होतो. पलीकडे जाण्यासाठी डोंगराच्या मधोमध काढलेला एक रस्ता होता. काळा कुळकळीत आणि सपाट रस्ता डोंगरामधील खिंडीतून खाली उतरत होता. माझी सायकल फेरी संपली आणि मी परतीच्या मागे मार्गाने निघालो तेव्हा सूर्य पश्चिमेच्या क्षितिजाकडे हळूहळू झुकत चालला होता. मला सूर्यास्त होण्याआधी डोंगराच्या त्या खिंडीमध्ये परत पोहोचायचे होते. कारण याच माथ्यावरून दूरवर सूर्यास्त अधिक उत्तम दिसेल याची मला खात्री होती.. डोंगर जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची चढण अधिक तीव्र होत होती. शेवटी या चढणीवर सायकल चालवणे मला कठीण होऊन बसले. सायकलवरून उतरलो आणि ती हातात घेऊनच निघालो. झपाझप पावले टाकत अंगातून घाम काढत मी त्या डोंगरावरच्या खिंडीकडे निघालो होतो. सूर्य मागच्या बाजूला होता. खिंडीतील वळणावळणाचा तो रस्ता मला त्याच्या दिशेने खुणावत होता. त्या खिंडीत मधोमध एक छोटेखानी मंदिर देखील बांधलेले होते. दोन पाच मिनिटांनी एखादी चारचाकी व दुचाकी त्या खिंडीतून खाली यायची. माझे ध्येय हळूहळू जवळ येत होते. मी वेगाने चालत चालू लागलो. आणि अखेरीस त्या खिंडीपाशी पोहोचलो. सायकल स्टॅंडवर लावली आणि मागे सूर्याच्या दिशेने वळून बघितले.
आजूबाजूच्या डोंगररांगांमधून सूर्य पश्चिम क्षितिजावर पोहोचलेला होता. त्याची सकाळप्रमाणेच शांत व शितल किरणे आसमंत उजळवून टाकत होती. तसाच खिंडीत बसून राहिलो. शहरापासून दूर गावापासूनही काही अंतरावर असणाऱ्या त्या शांत आणि निवांत परिसरात तो सूर्यास्त अतिशय उठून दिसत होता. तेजस्वी सूर्याची शांतता अनुभवता येत होती. सूर्य मावळून दिवस अंधाराकडे तरी जात असला तरी तो उद्या पुन्हा नव्याने उगवण्याची आशा देऊन जात होता. प्रत्येक सूर्यास्त हीच आशा देऊन जातो. त्यामुळेच त्याच्याकडे पाहत तासनतास बसत रहावसं वाटतं!


 

Thursday, March 7, 2024

गुगल मॅपची महती

आधुनिक युगातील प्रवासाचा सर्वात मोठा वाटाड्या म्हणजे गुगल मॅप होय. त्याच्यामुळे आज काल कोणाला पत्ता विचारत बसण्याची गरज पडत नाही. गुगल मॅप आपल्याला योग्य रस्त्याने इच्छित स्थळी पोहोचविते. परंतु हाच गुगल मॅप अनेकदा चुकीचे रस्ते देखील दाखवतो. त्यामुळे चक्क शासकीय फलकांवर देखील गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवत आहे, असे लिहिलेले दिसते. असाच एक फलक ताम्हिणी घाटाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मुळशी तालुक्यामध्ये गावकऱ्यांनी लावलेला आहे!



Wednesday, March 6, 2024

गोवळकोंडा किल्ला

महाराष्ट्राच्या सीमेबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांचे वास्तव्य लाभलेला हा हैदराबादचा गोवळकोंडा किल्ला होय. शिवशाही आणि कुतुबशाहीमध्ये मैत्रीचे संबंध होते. दक्षिण दिग्विजय करण्यासाठी निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भागानगरच्या याच गोवळकोंडा किल्ल्यामध्ये कुतुबशहाची भेट घेतली होती. शिवस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला पाहताना मन भरून आले. शिवाजी महाराजांचा चरण स्पर्श या किल्ल्याला लाभलेला आहे. शिवाय जवळपास महिनाभर मराठ्यांचा राजा याच किल्ल्यावर वास्तव्यास होता. किल्ला पाहताना शिवकाळातील ही अनुभूती मन प्रसन्न करणारी ठरली.