माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, March 23, 2020

कुकडेश्वर

एक हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजा भोज याने जी बारा मंदिरे बारा नद्यांची उगमस्थाने बांधली होती, त्यातीलच एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे कुकडेश्वर होय. कुकडी नदीच्या उगमस्थानी हे मंदिर बांधले आहे. जुन्नर तालुक्यातील पूर गावाच्या डोंगरावर कुकडी नदी उगम पावते. नदीचा खरा प्रवाह जिथून सुरू होतो, त्याठिकाणी हेमाडपंथी शैलीतील हे सुंदर मंदिर दृष्टीस पडते. याठिकाणी पोहोचण्याचा सर्वात सोपा रस्ता जुन्नर-आपटाळे-चावंडफाटा-पूर असा आहे. शिवाय जुन्नर बस स्थानकातून कुकडेश्वरला जाण्यासाठी बससेवाही उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त घाटघर, अंजनावळे येथे जाणाऱ्या बसनेही कुकडेश्वरला जाता येते. पावसाळ्यात हा परिसर इथल्या डोंगररांगांमधून वाहणाऱ्या धबधब्यांनी यांनी सजलेला दिसतो. समोर चावंड किल्ला व आजूबाजूला खळखळणारे धबधबे येथील निसर्ग सृष्टीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.







 

Friday, March 20, 2020

विचित्रगड भ्रमंती

भोर तालुक्याची आमची भटकंती ही केवळ भोर राजवाडा पुरती मर्यादित होती. आता त्या पलीकडे मजल मारायची होती. यावेळेस मग किल्ले रोहिडा सर करण्याचे ठरवले. घरापासून किल्ल्याचे अंतर होते ८० किलोमीटर आणि सर करणारे आम्ही तिघेजण. दोन बाईक वरून मग आमचा प्रवास सुरू झाला. मुंबई-बेंगलोर महामार्गावरील कापूरहोळ गावातून उजवीकडे एक रस्ता भोर गावाकडे जातो. येथून भोरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. हायवे नसला तरी रस्त्याची स्थिती तशी चांगली आहे. याच रस्त्यावर जवळपास आठ-नऊ किलोमीटरवर भोरचा प्रसिद्ध नेकलेस पॉईंट दृष्टीस पडतो. सदर घाटातून खाली उतरून गेले की, भाटघर धरणाचे दरवाजे दिसू लागतात. इथून भोर गाव साधारणत: दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे. भोर पार केल्यावर एक शिवाजी महाराजांचा पुतळा दृष्टीस पडतो. येथून समोर जाणारा रस्ता रोहिड्याकडे तर डावीकडचा रस्ता हा केंजळगड व रायरेश्वराकडे जातो. रोहिडाकडे जाणारा रस्ता देखील फारसा वाईट नाही. भोर-मांढरदेवी रस्त्यावर उजव्या बाजूला रोहिडा कडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो. या रस्त्याने आम्ही सरळ गेलो आणि काही वेळातच रोहिडा किल्ल्याचे दर्शन झाले. एका छोट्याशा टेकडीला वळसा घालून आम्ही बाजारवाडी गावात पोहोचलो. गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बर्‍यापैकी रस्ता चांगला केला आहे. तिथवर आपण सहज बाईक घेऊन जाऊ शकतो. परंतु, आम्ही आमच्या गाड्या या बऱ्याच मागे लावल्या व पदभ्रमंती चालू केली. त्यादिवशी वातावरण हे अतिशय स्वच्छ होते. त्याचा फायदा चांगल्या फोटोग्राफीसाठी निश्चितच झाला. शिवकार्य प्रतिष्ठानने नुकतेच नवे रस्ते व पायवाटा दुरुस्त केल्या होत्या. त्यामुळे त्या शोधण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. पहिला टप्पा पार केल्यावर एक छोटेसे पठार लागते. याठिकाणी सह्याद्रीचा थंडगार वारा इथवर अंगात आलेला सर्व शीण घालवून टाकत होता. या ठिकाणाहून दूरवर केवळ सह्याद्रीच्या डोंगररांगात पाहता येत होत्या. शिवाय दुपारची वेळ झाल्याने कुठेही चिटपाखरूही दिसत नव्हते. किल्ल्याच्या आजूबाजूला फारशी झाडी नाहीये. त्यामुळे उंच कडे हे हेच एकमेव नैसर्गिक संरक्षण किल्ल्याला लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव विचित्रगड असं ठेवलं होतं. त्यांनी स्वतः चढाई करून या किल्ल्यावर विजय मिळवला होता. याच लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांची शिवरायांशी पहिली ओळख झाल्याचे इतिहास सांगतो.
साधारणतः पाऊण-एक तासात आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो. दरवाजा आणि बुरुज हे अजूनही ब-यापैकी भक्कम आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर रोहिडेश्वराचे मंदिर नजरेस पडते. त्याच्या शेजारील मुख्य ध्वजस्तंभ उभा केलाय, जो दूरवरूनही अगदी स्पष्ट नजरेस पडतो. याच रस्त्याने पुढे मार्गक्रमण केल्यावर किल्ल्याचे अन्य बुरुज दिसतात. तटबंदी ही तशी भक्कम आहे. एका बाजूने मांढरदेवीचा डोंगर, महाबळेश्वरच्या पर्वतरांगा, केंजळगड किल्ला नजरेस पडतो तर दुसऱ्या बाजूने किल्ले पुरंदर, सिंहगड, तोरणा व राजगड एका रांगेत एकाच दृष्टीस नजरेत पडतात. त्यादिवशी वातावरण अगदी स्वच्छ असल्याने पुणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात येणारे हे सर्व किल्ले आम्ही उघड्या डोळ्यांनी सहजपणे पाहू शकलो. किल्ल्याच्या इतरत्र ठिकाणी पाण्याची तळी तसेच चुन्याचा घाणा नजरेस पडतो.
सह्याद्रीच्या अशा मोक्याच्या ठिकाणी उभा असलेला किल्ला सर केल्याचे समाधान आम्हाला त्या दिवशी मात्र मिळाले.













 

Wednesday, March 4, 2020

थरारक केंजळगड

दिनांक १९ फेब्रुवारी २०२०, शिवजयंती

यंदाच्या शिवजयंतीला थोडा हटके किल्ला करावा असा बेत होता. त्यातूनच आमची किल्ले केंजळगड व रायरेश्वराची गडभ्रमंती निश्चित झाली. ज्ञानेश्वरीला सोबत घेऊन केलेला हा सतरावा किल्ला होय.
मागे रोहीड्याच्या भ्रमंतीमध्ये किल्ल्यावरून केंजळगडाचे भौगोलिक स्थान लक्षात आले होते. त्यामुळे रस्त्याची बर्‍यापैकी माहीती होती. शिवाय गुगल मॅपची सोबत तर नेहमीच असते. आम्ही तिघे, प्रतीक व सुमेध असे पाच जण यावेळी किल्ला सर करणार होतो. केंजळगड तसा पुणे जिल्ह्याच्या टोकावर असणारा किल्ला होय. परंतु, प्रत्यक्ष पायथ्याच्या गावात पोहोचल्यावर समजले की, तो सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात येतो! तीन चार किलोमीटरचा घाट चढल्यावर घाटातच ओवरी वस्ती नावाचे बहुतेकांनी आदिवासी गाव आहे. तिथून किल्ल्याची खरी चढण चालू होते. डोंगरावरील डांबरी रस्त्याच्या घाटामुळे ६० ते ७० टक्के चढण कमी झालीये. तदनंतर जवळपास अर्ध्या तासाचा रस्ता उरतो. आम्हाला इथवर पोहोचता-पोहोचता साडेनऊ वाजले होते. ऊन पडू लागलं होतं. परंतु, किल्ल्यावर जाणारी वाट ही जंगलातील असल्याने उन्हापासून संरक्षण होण्याची शक्यता होती. दहा-पंधरा घरांची वस्ती असलेल्या या गावातही सातारा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेपासूनच समोर जाणारा रस्ता पुढे गावात व उजवीकडून किल्ल्याच्या दिशेने जातो. या हमरस्त्याने आमची पदभ्रमंती चालू झाली. गावातील एका ग्रामस्थांना वाट विचारली होती. परंतु, प्रत्यक्ष चालून गेल्याशिवाय तिचा अंदाज येत नाही, हेही तितकेच खरे! याचा अनुभव याहीवेळी आम्हाला आला. निम्म्या रस्त्यापर्यंत छान पायवाट होती त्यानंतर पुढे जाण्यासाठी दोन रस्ते फुटलेले होते. उजव्या बाजूच्या मळलेल्या पायवाटेने पायर्‍या तयार केलेल्या दिसल्या. डाव्या बाजूची मात्र फारशी प्रचलित नव्हती, असे दिसले. परंतु मळलेली पायवाट किती आव्हानात्मक असते, याची प्रचिती यावेळी मात्र आम्हाला आली. खडी चढण व त्यात मातीची पायवाट ही आमच्या किल्लेरोहनाच्या कौशल्याची परीक्षा पाहणारी ठरली. ती कित्येक ठिकाणी निसरडी झाली होती. त्यातही ज्ञानेश्वरी सोबत असल्याने अतिशय सावधगिरीने हा टप्पा एकमेकांच्या साथीने पार करावा लागला. इथल्या पंधरा ते वीस मिनिटांचा रस्ता खरोखर थरारक असाच होता! तो झाडीतून जात असल्याने उन्हाची तीव्रता जाणवली नाही. तो पार करत आम्ही कातळकोरीव पायर्‍यांच्या समोर येऊन ठेपलो. मुख्य दरवाजा पूर्ण उद्ध्वस्त झालेला होता. त्याच्या समोरच एक मोठी गुहा होती. पावसाळा संपून इतके महिने झाले तरी पाण्याचा ओलावा अजूनही या गुहेत जाणवत होता. किल्ल्याचा शेवटचा टप्पा सहज व पूर्णपणे कातळकोरीव पायऱ्यांचा होता. शिवाय तो सावलीत असल्याने इथे बसून समोरील सह्याद्रीचे रूप न्याहाळत बसायला एक वेगळाच आनंद मिळाला. डाव्या बाजूला रायरेश्वराचे पठार तर उजवीकडे रोहिड्याच्या डोंगररांगा नजरेस पडल्या. किल्ल्याच्या माथ्यावर मात्र किल्लेपणाचे फारसे अवशेष दिसले नाहीत. थंडगार पाण्याचे एक टाके, दोन-तीन पडीक मंदिरे, वाड्याचे भग्न अवशेष, चुन्याचा घाणा व धान्यकोठार यापलीकडे किल्ल्यावर पूर्ण वाढलेले व वाळलेले गवत पसरलेले दिसले. पलीकडच्या बाजूने महाबळेश्वरच्या महाकाय डोंगर रांगा व धोम धरणाचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवता आले. किल्ल्यावरून परतताना मात्र डाव्या बाजूची वाट आम्ही चुकवली होती ती शोधत शोधत खाली उतरलो. त्यामुळे गडउतार सहज सोपा झाला होता. एक छोटेखानी टुमदार किल्ल्याची भ्रमंती पार पडली होती व ज्ञानेश्वरीच्या यादीत एका थरारक किल्लेरोहनाची भर पडली होती. किल्ल्याच्या पूर्वेकडे एकवार नजर टाकून आम्ही रायरेश्वराच्या दिशेने प्रस्थान चालू केले.



Thursday, November 21, 2019

मस्तानीची कबर, पाबळ

सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील आठवड्यात इतक्या वर्षांनी पाबळला जाताना हे ठिकाण पाहण्याची संधी मिळाली. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरपासून पाबळ गाव वीस किलोमीटर अंतरावर आहे. या गावामधल्या लोणी रस्त्यावर डाव्या बाजूला बाजीराव पेशव्यांच्या मस्तानी बाईसाहेबांची समाधी बाहेर एकाकी पडल्याचे दिसते. त्या शेजारीच गावचे सुन्नी कब्रस्तान आहे. मस्तानीच्या कबरीभोवती सध्या सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे व चबुतराही बांधलेला आहे. परंतु सध्याची त्याची अवस्था पाहता महाराष्ट्रातल्या एका दुर्लक्षित स्थळांपैकीच हे एक ठिकाण असल्याचे जाणवते.








Tuesday, November 19, 2019

चौरंगा दत्त मंदिर टेकडी, पेठ

पुणे-नाशिक महामार्गावरचा सर्वात पहिला बायपास रस्ता तयार झाला होता आंबेगाव तालुक्यातल्या पेठ या गावी! याच गावाच्या मागे दूरवर एक डोंगर दिसतो व त्यावर एक भव्य मंदिरही बांधल्याचे दिसते. हाच चौरंगा डोंगर होय. या डोंगरावर एक दत्तमंदिर आहे. पेठ गावातून एक रस्ता घोडेगाव कडे जातो. या रस्त्यावर उजवीकडे एक पाण्याची टाकी आहे. तिथून डाव्या बाजूला एक फाटा फुटून एक रस्ता भावडी गावात जातो. सदर रस्त्याने पुढे गेल्यावर आपला सौरंगा डोंगराच्या दिशेने प्रवास चालू होतो. हा परिसर बऱ्यापैकी चढाचा परंतु बिनाझाडीचा आहे. सौरंगा डोंगरावर दत्ताचे मंदिर झाल्याने आता थेट वरपर्यंत गाडी जाण्याचा रस्ता तयार केला आहे. पायथ्यापासून डांबरी रस्त्याने थोडे वर गेल्यास एक आश्रम दृष्टीस पडतो. तेथून पुढचा रस्ता कॉंक्रिटचा बांधलेला आहे. मी या डोंगरावर गेलो तेव्हा घाट रस्ता चालू होण्यापूर्वीच गाडी पायथ्याला पार्किंग केली व पायी रस्ता पार करायला सुरुवात केली. रस्त्याची चढण तशी बर्‍यापैकी आहे. परंतु, रस्ता सपाटच असल्याने फारशी दमछाक होत नाही. केवळ तीन वळणांमध्ये कॉंक्रिटचा रस्ता थेट माथ्यावर जातो. पावसाळ्यात येथुन नयनरम्य नजारा पाहायला मिळतो. माथ्यावर दत्ताचे बऱ्यापैकी मोठे मंदिर बांधले आहे. मंदिरात काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर खेड तालुक्यात तर पायथा आंबेगाव तालुक्यात मोडतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचेही असेच आहे. अवसरी घाटापासून खेड घाटात पर्यंतचा व बहुतांश आंबेगाव तालुक्याचा परिसर येथून न्याहाळता येऊ शकतो. डोंगरावर फारशी झाडे नसल्याने उन्हाळ्यात वैराण अवस्था पाहायला मिळते.