माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, November 9, 2020

जुन्नरच्या अणे घाटातील धबधबा

पावसाळा संपून महिना होत आला. झरे आणि धबधब्यांमधलं वाहतं पाणी आता मंद होत चाललंय. काही ठिकाणी तर ते पूर्णतः आटलंय. पण, जुन्नरच्या अणे घाटातील गुळुंचवाडीच्या नैसर्गिक पुलाखालून वाहणारा हा धबधबा आजही त्याच जोमाने वाहतोय. आजूबाजूला मोठमोठाल्या डोंगररांगा नसूनही घाटातील दरीत खुळखुळणाऱ्या पाण्याचं निसर्ग संगीत सातत्याने अबाधित राखतोय. हीच निसर्गाची किमया आहे! 



Saturday, November 7, 2020

दौंड्या डोंगर

जवळपास एक तासाच्या चढाईनंतर दौंड्या डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. उजव्या बाजूने एक रस्ता माळशेजच्या डोंगर रांगांकडे कडे जात होता.  थोड्याच अंतरावर दोन डोंगरांना जोडणारा माकडदरा पार केला.  थोडेसे चढून आलो.  समोरच अस्वलदऱ्यातून पाण्याच्या नाजूक धारा वाहत होत्या.  त्यांचा हळुवार आवाज पूर्ण परिसरामध्ये भरून गेला होता.  दौंड्या डोंगराच्या मागचा पूर्ण परिसर दिसू लागला.  दूरवर जीवधन किल्ला आकाशाकडे डोळे लावून उभा होता.  शेजारी नाणेघाटाचा कोकणकडा आणि वऱ्हाडी डोंगरांची रांग लांबच लांब पसरलेली दिसली. एकच दृष्टीमध्ये सह्याद्रीच्या त्या अफाट डोंगररांगा निसर्गाची अद्भूत रचना आम्हाला दाखवित होत्या. 

सर्व काही शांत…  त्यात केवळ पक्ष्यांचा किलबिलाट आणि झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांचे निर्मळ आवाज घुमत होते.  निसर्गसंगीत काय असतं? ते अनुभवण्याचा तो परमोच्च क्षण होता. 

 


 

Tuesday, October 13, 2020

दुर्गावाडीचा ऊर्ध्व जलप्रपात

कोकणकड्याची सफर करण्यासाठी जुन्नरमध्ये असणाऱ्या अनेक स्थळांपैकी एक म्हणजे दुर्गावाडी होय. केवळ कोकणकडाच नाही तर छोटेखानी किल्ला, निसर्ग सौंदर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उलटा जलप्रपात यासाठी दुर्गावाडी हे नाव मी खास करून लक्षात ठेवतो. जुन्नर मावळातला हा सर्वात लांबचा परिसर होय. नाणेघाटापेक्षाही अवघड वाटेवर आणि पुणे जिल्ह्याच्या अंतिम टोकावर वसलेलं दुर्गावाडी हे गाव होय.
आपटाळे नंतर मावळात प्रवेश केला की, डाव्या बाजूला इंगळुन गाव लागतं. इंगळुन पासून सरळ डोंगराकडे जी वाट जाते, जिथे डांबरी रस्ता बनवलेला आहे त्याला आंबे हातवीज घाट म्हणतात. ह्याच घाटाने वर गेल्यावर सर्वात शेवटचं गाव आहे दुर्गावाडी. घाट तसा डांबरी रस्त्याचा आहे. पावसाळ्यामध्ये इथे सर्व दाट झाडी हिरवाईने नटलेली असते. शिवाय घाटामध्ये एक सुंदर असा धबधबा देखील आहे. शहरी वस्तीपासून दूर असल्यामुळे इथे फारशी गर्दी दिसून येत नाही. कधीतरी एखादं वाहन घाटातून जाताना दिसतं आणि त्याहीपेक्षा राज्य महामंडळाची बस दोन ते तीन वेळा या रस्त्याने जाते. घाट तसा सुंदर आहे जसं आपण वर चढत जातो, जुन्नर मावळातला बराचसा परिसर आपल्या नजरेमध्ये येतो. सात ते आठ किलोमीटर पार केल्यानंतर आपण आंबे-हातवीज पठारावर पोहोचतो. घाट संपल्यानंतर उजव्या बाजूचा रस्ता हा दुर्गावाडीकडे जातो. याच रस्त्यावर आधी आंबे नंतर हातवीज आणि सर्वात शेवटी दुर्गावाडी गाव आहे. पहिल्यांदा प्रवास करणाऱ्याच्या संयमाची कसोटी मात्र येथे लागते. कारण माझा तसाच अनुभव आहे. जुन्नर परिसर इतका विस्तीर्ण आहे, हे मला या भागात आल्यानंतर पहिल्यांदा समजले. 



दुर्ग आणि ढाकोबा च्या शोधात आम्ही २०१२ मध्ये पहिल्यांदा याठिकाणी आलो होतो. त्यानंतर बर्‍याचदा पर्यटनाच्या निमित्ताने इकडे येणे झाले. आंबे-हातवीज पठार हे आमचं जुन्नर मधलं फुलांचे पठार होय. ते पार केल्यानंतर बऱ्याच अंतरावर कोकणकडा आहे. या कड्याच्या अलीकडेच दुर्गावाडीची छोटेखाणी वस्ती दिसून येते. दुर्गावाडी संपलं की, पुढे दुर्ग अर्थात दुर्गाबाईचा किल्ला आहे. किल्ला म्हणावं तसं इथे काहीच उरलेले नाहीये. परंतु, एक छोटासा ट्रेक करण्यासाठी मात्र हा किल्ला उत्तमच. या किल्ल्याभोवती एक छोटी वनराई आहे. वनराईत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला किल्ल्यावरती जाता येते. वनराई पार केल्यानंतर समोर एक विस्तीर्ण माळरानही दिसते. तिथुनच दुरवर ढाकोबा शिखर दिसून येतं आणि पठाराच्या शेवटी कोकणकडा आहे. आजकाल इथे जुन्नर वनविभागाने रेलिंग लावलेल्या आहेत. पर्यटकांची गर्दी होत असल्याने या ठिकाणी संरक्षक रेलिंग लावण्यात आल्या असाव्यात. या आम्ही आमच्या पहिल्या भेटीत पाहिल्या नव्हत्या. असं संरक्षण न असता कोकण कड्यावरून खाली पाहणं, म्हणजे डोकं गरगरत होतं. आता तर ही जागा सुरक्षित झाली आहे. पावसाळ्यात भयंकर धुकं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऊर्ध्व अर्थात उलटा धबधबा या ठिकाणी पाहायला मिळतो. कोकणकड्याच्या खाली ठाणे जिल्हा आहे. तिकडून येणारे वारे वेगवान वारे अतिशय जोरात कोकणकड्यावर धडकतात. त्यामुळेच इथून खाली वाहणारे पाणी पुन्हा वेगाने मागे सरकते व उलटा धबधबा तयार होतो. पर्यटकांची तशी याठिकाणी कमी गर्दी असते. त्यामुळे ह्या धबधब्याच्या आनंद आपल्याला बिना गर्दीचा घेता येऊ शकतो. इथं वाहणारे वारे मात्र प्रचंड वेगाने वाहत असतात. पाण्याचे असंख्य अगणित तुषार अंगावर घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पावसाळ्यातले दोन ते तीन महिने येथे अशीच परिस्थिती असते. या जलप्रपातात न्हाऊन निघण्यासाठी आम्ही दरवर्षी एकदा तरी याठिकाणी येत असतो.

Saturday, August 15, 2020

कुकडेश्वर - कुकडीचं उगमस्थान

सुमारे दहा एक वर्षांपूर्वी केलेली नाणेघाटाची ती सफर अजूनही आठवते. परतीच्या मार्गात ढगाबरोबर लपाछपी खेळणारा शंभू डोंगर अतिशय रौद्र भासत होता. याच डोंगराच्या पायथ्याशी कुकडेश्वर वसलेला आहे. त्या वेळेस फक्त ऐकलं होतं. प्रत्यक्ष अनुभवायला मात्र एक वर्ष जावं लागलं.
कुकडेश्वर म्हणजे कुकडी नदीचं उगमस्थान. जुन्नर तालुक्यातून वाहणारी कुकडी नदी पुर गावातल्या कुकडेश्वराच्या डोंगरावर उगम पावते. याच गावामध्ये कुकडेश्वरचे हेमाडपंथी मंदिर आहे. जुन्नर मधल्या चार हेमाडपंती मंदिरांपैकी ते एक!
नंतरच्या काळात अनेकदा इथल्या भेटी झाल्या. पावसाळ्यातल्या कुकडेश्वर अतिशय निसर्गरम्य वातावरणात बहरताना दिसतो. सह्याद्रीच्या आजुबाजुच्या डोंगरांवरून ढग दाटीवाटीने गर्दी करत असतात आणि त्यांवरून फेसाळणार्या दूध सागर धबधब्यांनी डोंगर सजलेले दिसतात. यंदाच्या पावसाच्या सुरुवातीलाच कुकडेश्वराचे दर्शन झाले. लॉकडाउनच्या आधीही एकदा इथे जाऊन आलो होतो.
इथे पहिल्यांदा आलो तेव्हाच नदीचं मूळ उगमस्थान कुठे आहे याबद्दल उत्सुकता होती. आजपर्यंत अजूनही त्या ठिकाणी जाता आले नाही. पावसाळ्यात कुकडी नदी इथूनही भरभरून वाहत असते. डोंगरावरील दाट झाडी आणि त्यातून सुरू झालेला कुकडी नदीचा प्रवाह...  खुळखुळणारा, निसर्गाचे संगीत मनात साठवून ठेवणारा आणि हिरव्या वनांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा असाच असतो. कुकडेश्वर मंदिर आलं की, समोरच एक गोमुख आहे. तिथून नदीचा सतत प्रवाह चालू असतो. वरील डोंगरावरून येणारे पाणी मंदिराच्या समोरूनच वाहत जाते. उगमस्थान असल्यामुळे प्रवाह फारसा विस्तीर्ण नाही. परंतु त्या छोटेखानी धारेत येथील पवित्र सामावलेलं असतं. त्यादिवशी वातावरण स्वच्छ होतं. दूरचे डोंगर अगदी स्पष्ट दिसत होते. चावंड किल्ला तर मनमोहकच...  इथून चावंडचे फोटो काढणे म्हणजे फोटोग्राफर साठी पर्वणीत असते. तेही वातावरण स्वच्छ असल्यावर मात्र सांगायलाच नको.
या परिसरामध्ये मानवी वस्ती तशी इतर भागांपेक्षा कमीच. त्यामुळे जंगलातून पक्ष्यांचे येणारे आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतात. विशेषकरून जेव्हा तिची हिरवाई फुललेली असते, त्यावेळेस सातत्याने या ठिकाणी बसून ते ऐकत राहावेसे वाटतात. कुकडेश्वर मंदिर तसं बर्यापैकी ढासाळलेल्या होतं. पुरातत्व खात्याने त्याची डागडुजी नुकतीच केली आहे. परंतु याहीपेक्षा ते प्राचीन काळात सुंदर असावं, असं एकंदरीत रचनेवरून दिसतं. मन:शांती हवी असेल तर जुन्नरच्या डोंगररांगात असलेल्या कुकडेश्वरी एकदा नक्कीच भेट द्या!






Monday, August 10, 2020

नेतवड बंधारा

मांडवी व पुष्पावती या जुन्नर परिसरातल्या मुख्य नद्या. अकोले तालुक्यातील फोफसंडी येथे मांडवी नदी तर हरिश्चंद्रगडाच्या वाटेवरील खिरेश्वराच्या  कुशीत पुष्पावती नदी उगम पावते. दोन्ही नद्यांवर अनुक्रमे चिल्हेवाडी व पिंपळगाव जोगा धरणे बांधलेली आहेत .राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ पार केल्यानंतर या नद्या नेतवड गावापाशी एकत्र येतात. मग इथून पुढे पुष्पावती नदी प्रवाहित होऊन येडगाव धरणात कुकडी नदीला मिळते आणि नेतवड गावात या दोन्ही नद्यांचा संगम होतो. या ठिकाणी एक ब्रिटीशकालीन बंधारा आहे. त्याला नेतवड धरण म्हणूनही संबोधले जाते. पावसाळ्यात व हिवाळ्यातही बऱ्याचदा या बंधाऱ्यावरून पाणी वाहताना दिसते. हा परिसर चहूबाजूंनी हिरवाईने नटलेला आहे. त्यामुळे बंधार्‍यावरून पाणी वाहत असताना नयनरम्य नजारा या ठिकाणी तयार होतो. बंधार्‍यावरून पाण्याचा वेग अनेकदा खूप असतो. त्यामुळे फेसाळणार्‍या पाण्याचे तुषार तयार झालेले दिसतात. त्याच्यासमोरच संगमेश्वराचे मंदिर आहे. इथून बंधाऱ्याचा व नदीचा बराच मोठा परिसर नजरेच्या आवाक्यात येतो. शिवाय या ठिकाणी बरीचशी फोटोजेनिक स्थळेही आहेत. नेतवड बंधाऱ्यावर जाण्यासाठी ओतूर-जुन्नर व ओतूर-नारायणगाव या दोन्ही रस्त्यांवरून मार्ग आहेत. त्यापैकी कुठलाही निवडला तरी फारसा फरक पडणार नाही.