माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, January 3, 2021

खंड्या

सकाळी आठ वाजता किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरापाशी पोहोचलो. तोच समोरच्या कमानीतून 'तो' शेपटी हलवत आमच्यापाशी आला. त्याला कदाचित खायला हवे होते असे वाटले. आम्ही सुरुवातीला त्याच्याकडे काहीसे दुर्लक्ष केले आणि किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. मग तोही आमच्या बरोबरच चालायला लागला. पायवाट पूर्णपणे जंगलातून जाणारी होती. बऱ्याच ठिकाणी दोन वाटा जाताना दिसायच्या. अर्थात हा सर्व भुलभुलैयात वाटायला लागला. पण तो त्या वाटेने सराईतपणे आमच्या बरोबर चालला होता. त्याला रस्ता व्यवस्थित माहीत होता. इतक्या घनदाट जंगलातून पुढे सरकायला आम्हाला काहीशी भीती वाटत होती. कारण आमच्या तिघांना व्यतिरिक्त त्या जंगलात कोणीही नव्हते. कदाचित आमच्या आधीही कुणी गेले नसावे. जंगलातल्या त्या पायवाटेवरून चालताना हीच वाट योग्य आहे का? अशी शंका मनात उभी राहायची. पण तो मात्र त्या पायवाटेने सहजपणे पुढे चालला होता. त्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे त्याच्या सोबत चालू लागलो. कधी कधी तो मध्येच जंगलातल्या चिंचोळ्या वाटेत घुसायचा व परत मळलेल्या वाटेकडे धाव घ्यायचा. रानावनात झाडांच्या टोकावरून उड्या मारणाऱ्या माकडांना आणि वानरांना आमची चाहूल लागली की ते त्यांच्या त्याची खबर आपल्या भाऊबंदांना विशिष्ट आवाज करून देत होते. त्या निबिड जंगलामध्ये तो आवाज भेसूर आणि भीतीदायक वाटत होता. पण आमचा सोबती आणि मार्गदर्शक कधीकधी धावत जाऊन माकडांना हुसकून लावायचा. आम्ही थांबलो की तोही स्वतःसाठी एखाद्या झाडीमध्ये जमीन उकरून थंडावा शोधायचा व तिथे अंग टाकून द्यायचा. तो आमची साथ सोडत नव्हता. कदाचित त्याला आमच्या सोबत किल्ल्यावर यायचे होते. एक तास झाला तरीही किल्ल्याच्या पायर्‍या लागल्या नव्हत्या. पण मळलेली पायवाटही अजून संपत नव्हती. जंगलातला प्रदीर्घ रस्ता संपला आणि समोर सह्याद्रीचा कोकणकडा दिसू लागला. लवकरच एक मंदिरही दिसायला लागले. विश्रांती घेण्यासाठी ती एक उत्तम आणि प्रशस्त जागा होती. आम्ही थांबल्यावर तोही मंदिराच्या बाहेर पहुडला. इथून पुढचा टप्पा मात्र पायर्‍यांच्या वाटेचा होता. आता किल्ल्याच्या मुख्य पायऱ्या व्यवस्थित दिसायला लागल्या होत्या. आधीच आमची दमछाक झालेली होती. त्यात ह्या खड्या पायऱ्या चढून जायचे होते. 
 


 
 
ऊन डोक्यावर आलं तरी झाडांचा थंडावा शरीराला अल्हाददायक शीतलता प्रदान करत होता. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. कातळटप्पा सुरु झाला तिथून मात्र ऊन थेट अंगावर येत होतं. तोही आमच्या सोबतीने तिथवर आला. उभा कातळटप्पा हातांचाही वापर करत आम्ही सर करू लागलो. काही ठिकाणी अवघड पायऱ्यांचा मार्ग होता. पण तो अगदी सराईतपणे त्याने पार केला. त्याच्या चढाईमध्ये अगदीच सहजता जाणवत होती. जणूकाही तो रोजच या किल्ल्यावर येत असावा मुख्य दरवाजा पार केल्यानंतर मात्र त्याने आपले अंग टाकून दिले. कदाचित आमची फोटोग्राफीची गडबड लक्षात घेता अजून पंधरा-वीस मिनीटे तरी आम्ही इथून हालणार नाही, असे त्याला वाटले असावे. आणखी दोन पायऱ्यांचे मार्ग सर केल्यानंतर आम्ही एका भव्य गुहेपाशी येऊन पोहोचलो. ते एक मानवनिर्मित लेणंच होतं. हजारो वर्षांचा इतिहास त्यात सामावलेला होता. कमीत कमी ६० ते ७० लोक मावतील इतकी मोठी ती जागा होती. आल्या आल्या त्याने आपली नेहमीची जागा हेरली आणि अंग टाकून दिले. एव्हाना किल्ल्याच्या पायथ्यापासून दोन तास होऊन गेले होते. आम्हालाही भूक लागली होती. त्यामुळे पाठीवरच्या सॅक काढून ठेवल्या व पोट पूजेची सोय करू लागलो. त्यांने आम्हाला इतपर्यंत सोबत दिली होती. कदाचित त्याला काहीतरी खायला हवे असावे, असे आम्हाला वाटले. पण आम्ही दिलेल्या कोणत्याही पदार्थाकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही. आपले मार्गदर्शनाचे कर्तव्य त्याने पूर्ण केले होते. शेवटच्या कातळ टप्प्यासाठी तो आमच्या सोबत नव्हता. येतानाही तो त्या गुहेमध्ये परत दिसला नाही. किंबहुना रस्त्यातही तो आम्हाला परत दिसलाच नाही.
कदाचित केवळ आम्हाला किल्ल्याचा मार्ग दाखवण्यासाठी तो आमच्यासोबत आला असावा. त्याला आम्ही लाडाने "खंड्या" असे नाव ठेवले होते!





Thursday, December 24, 2020

छान किती दिसते फुलपाखरू

त्याच्या अंगी जी चंचलता असते कदाचित ती अन्य कोणत्या प्राणी वा कीटकांमध्ये नसावी. सतत या झाडावरून त्या झाडावर भिरभिरणारे पंख... फुलांच्या शोधात मार्गक्रमण करणारा तो एक कीटक!
डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो तेव्हा अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे निसर्ग संचार करताना दिसत होती. दोन सारख्या रंगाची फुलपाखरे शोधणे, म्हणजे दिव्यच होते. कदाचित त्यांचे सौंदर्य जपण्यासाठी निसर्गाने त्यांना दिलेले हे वरदान असावे. अनेकदा त्यांना पकडण्याचा मोह आवरत नाही. पण ही गोष्ट इतकी साधी ही सोपी नाही. शेवटी त्याला केवळ कॅमेऱ्यातच बंदिस्त करावे लागते. तेही स्लो-मोशनमध्ये! तरच त्यांच्या एकंदरीत हालचाली व्यवस्थित पाहता येतात. जंगलातल्या झाडाझुडपांना सौंदर्य प्रदान करणारी व त्यांचा वंश एक प्रकारे वाढवणारी ही एक जमात होय. कोण जाणे कुठल्याश्या नैसर्गिक अल्गोरिदम नुसार त्यांचा वावर दिसत असतो. अजूनही हा अल्गोरिदम आम्हाला सापडलेला नाही. कदाचित आमचा अभ्यास कमी पडत असावा.
 


Wednesday, December 23, 2020

स्पायडरमॅन

समोर जंगल दिसू लागले की नक्की कोणत्या रस्त्याने आत शिरायचे? हा प्रश्न नेहमी पडत असतो. जंगलातल्या अशा वाटा अनेकदा फसव्या असतात. याच वाटेत 'तो' ठिकठिकाणी जाळं टाकून बसलेला दिसला. अतिशय सुबक विणलेली ती जाळी जागोजागी दिसत होती. त्यांना चुकवत आम्ही मार्गक्रमण करू लागलो. कधीकधी त्या जाळ्याचे दृष्य दोर कपाळाला-मानेला लागायचे. कधी-कधी तर तोंडातही जात होते! त्यातून एक सूचना मिळत होती, बाबा रे! ही वाट योग्य नाही. एका अर्थी तो आमचा मार्गदर्शकच होता. या रस्त्याने कोणीही जात नाही. म्हणूनच मी येथे जाळे लावले आहे, असे त्यांना सुचवायचे होते. त्यामुळे रस्ता शोधायला मदत होत होती.
जाळ्यांच्या निर्माणकर्त्याला आम्ही लाडाने "स्पायडरमॅन" म्हणतो! शहरातला कोळी आणि जंगलातला कोळी यात कित्येक पटीचा फरक आहे. जंगलात त्याने लावलेली जाळी अगदी मोठमोठाले कीटकही तोडू शकत नाहीत, इतकी भक्कम होती. अनेकदा त्याची कलाकुसर आणि सुबकता पाहता निसर्गाने दिलेल्या वरदानाचाही हेवा वाटतो. किती मन लावून एकाग्रतेने तो आपले काम करत असतो. एका अर्थाने आपल्याला मार्गदर्शन करण्याचेही कार्य त्याच्याकडून घडत असते.
इवलासा असला तरी त्याच्या जाळ्याची ताकत मात्र जबरदस्त होती. जंगलातल्या वाटांवर त्याचे साथीदार आणि अनेक सगेसोयरे अशीच सुंदर जाळी टाकून भक्ष्याची वाट बघत होते. निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी कौशल्य प्रदान केलेले आहे. त्याचे कौशल्य त्याला पूर्णपणे माहित आहे. माणसाच्या बाबतीत मात्र असे नाही. वर्षानुवर्षे आपण आपली मूळ कौशल्ये विसरत चाललो आहोत. कदाचित हाच संदेश देत तो मानवासाठी जंगलात जागोजागी जाळी लावत बसला असावा.





Wednesday, November 25, 2020

गुगलभाऊ मॅपवाले यांची किमया

जुन्नरमधले किल्ले संपले तेव्हा आजूबाजूंच्या किल्ल्यांवर आम्ही नजर टाकायला सुरुवात केली होती. या सर्व किल्ल्यांना जुन्नरमधून अशा प्रकारे जाता येईल, याचा शोध घेण्याचा आम्ही गुगल मॅपद्वारे प्रयत्न केला. त्यातच आम्हाला अकोले तालुक्यातील भैरोबा दुर्ग सापडला. हरिश्चंद्रगडाच्या अभयारण्यामध्ये कोथळे गावानजीक हा किल्ला स्थित आहे.... तो अगदी जुन्नरच्या सीमेला लागूनच!
खिरेश्वरातल्या टोलार खिंडीपासून काहीच अंतरावर हा किल्ला दिसून येत होता. गुगल मॅपद्वारे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याने वेगळीच वाट दाखवली. नकाशात दाखवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगडावर चढून पाचनईमार्गे लव्हाळी, कोथळे मग भैरव दुर्ग...  असा भलामोठा १८ किलोमीटरचा मार्ग दाखवण्यात आला. त्यामुळे आम्ही गोंधळून गेलो. टोलार खिंडीतून अगदी जवळ असणारा किल्ला गाडी मार्गानेही ९० किलोमीटर इतक्या अंतरावर होता! वाटेत जंगल असल्यामुळे आतील वाट कदाचित गुगलला माहित नसावी. अखेरीस बरेच सर्वेक्षण करून आम्ही टोलार खिंडीतूनच कोथळेच्या भैरवगडाला जायचे ठरवले. प्रत्यक्ष गेल्यावर समजले की, इथून जंगलातली एक उत्तम वाट कोथळे गावामध्ये जाते. जी गुगलला माहीतच नाहीये! विविध ट्रेकर व ब्लॉगर यांनीही त्यांच्या या किल्ल्यावरील ट्रेकचे वर्णन केले आहे. परंतु, कोणीही टोलार खिंडीतून हा किल्ला सर केलेला नाही!

 

खिंड ते किल्ल्याचा पायथा हे अंतर साधारणत: तीन किलोमीटरचे असावे. हा रस्ता पूर्णतः जंगलातून जातो. कृपया गूगलभाऊ मॅपवाले यांनी याची नोंद घ्यावी! खरंतर जंगलातील आमचे स्थान शोधण्यासाठी त्यांची फार मोठी मदत झाली होती. त्याबद्दल त्यांचे आभारच.
या प्रवासाचा सविस्तर लेख लवकरच तुमच्या समोर येईल.


Monday, November 9, 2020

जुन्नरच्या अणे घाटातील धबधबा

पावसाळा संपून महिना होत आला. झरे आणि धबधब्यांमधलं वाहतं पाणी आता मंद होत चाललंय. काही ठिकाणी तर ते पूर्णतः आटलंय. पण, जुन्नरच्या अणे घाटातील गुळुंचवाडीच्या नैसर्गिक पुलाखालून वाहणारा हा धबधबा आजही त्याच जोमाने वाहतोय. आजूबाजूला मोठमोठाल्या डोंगररांगा नसूनही घाटातील दरीत खुळखुळणाऱ्या पाण्याचं निसर्ग संगीत सातत्याने अबाधित राखतोय. हीच निसर्गाची किमया आहे!