घाट चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता घाटाच्या डोंगर माथ्याच्या दिशेने जातो. त्याच दिशेने मीही मार्गक्रमण सुरु केले. बराच अंतर गेल्यावर रस्ता अधिक कठीण होत असल्याचे जाणवले आणि मी बर्यापैकी घाटाच्या डोंगरांवर आलो आहे, असेही जाणवले. इथून पुढे पायी चालावे म्हणून गाडी रस्त्याच्या कडेला लावली व पदभ्रमंती चालू केली. तसा हा परिसर निर्जन होता. अगदी दूरवर एखादं घर दिसून यायचं. बाकी सर्व परिसर हा शेतीचा होता. घाट महामार्गावर असल्यामुळे व इथल्या शांततेमुळे घाटातील गाड्यांचे आवाज व्यवस्थित ऐकू येत होते. शिवाय संध्याकाळच्या प्रसंगी आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी चाललेली पक्ष्यांची किलबिलही व्यवस्थित ऐकून येत होती. पंधरा-वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर काही घरे दिसून आली आणि तिथूनच दूरवर ते छोटेखानी मंदिर दिसून येत होते. तिथे जाण्याचा रस्ता फार बिकट नव्हता. एका छोट्याशा टेकडीच्या कडेकडेने मार्ग काढत मी मंदिराच्या दिशेने निघालो. थोड्याच अंतरावर टेकडी संपली आणि पुन्हा पश्चिमेकडे जाणारा सूर्य व्यवस्थित दिसायला लागला. एव्हाना मी पूर्णपणे घाटमाथ्यावर आलेलो होतो. खालचा रस्ता आता व्यवस्थित दिसत होता. वाहतुकीची हालचालही लक्षात येत होती. या ठिकाणी एक विस्तीर्ण माळरान दिसून आले. अनेक गुरे इथे चरत होती. पावसाळा संपून केवळ एकच महिना झाला होता. त्यामुळे गवत बऱ्यापैकी ओले व दाट होते. त्यातली पायवाट मात्र व्यवस्थित दिसत होती. कदाचित या रस्त्यावरून सातत्याने ये-जा होत असावी, असे वाटले. मंदिर आता खूपच जवळ आले होते. दोनच मिनिटाच्या प्रवासानंतर मी मंदिराच्या जवळ पोहोचलो. अतिशय छोटा उंचवटा व त्यावर बांधलेले ते मंदिर खूप सुंदर भासत होते. थोड्याच अंतरावर काहीशी झाडी दिसू लागली. शिवाय अजूनही परिसर निर्जन होता. मंदिराच्या प्रवेशद्वारी एक श्वान कदाचित त्याचे रक्षण करत असताना दिसत होता. दूरदूरवर केवर माळरान दिसत होते. मी घाटाच्या डोंगरांच्या बरोबर मागच्या बाजूला आलेलो होतो. एक नितांत शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळाली. तिचा आनंद घेत पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. परत फिरताना घाटाचा व्यवस्थित अंदाज येत होता. डोंगराच्या दिशेने जाऊन रस्त्यांची पाहणी केली. झाडी फारशी नव्हतीच. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून घाटातील वळणदार रस्ते व्यवस्थित दिसत होते. माळशेज घाटापुढे या घाटाची उंची तशी काहीच जाणवली नाही. पण एका आगळ्या वेगळ्या वाटेने डोंगरमाथ्यावर फिरण्याचा आनंद मात्र घेता आला.
Saturday, May 22, 2021
अणे घाट
घाट चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता घाटाच्या डोंगर माथ्याच्या दिशेने जातो. त्याच दिशेने मीही मार्गक्रमण सुरु केले. बराच अंतर गेल्यावर रस्ता अधिक कठीण होत असल्याचे जाणवले आणि मी बर्यापैकी घाटाच्या डोंगरांवर आलो आहे, असेही जाणवले. इथून पुढे पायी चालावे म्हणून गाडी रस्त्याच्या कडेला लावली व पदभ्रमंती चालू केली. तसा हा परिसर निर्जन होता. अगदी दूरवर एखादं घर दिसून यायचं. बाकी सर्व परिसर हा शेतीचा होता. घाट महामार्गावर असल्यामुळे व इथल्या शांततेमुळे घाटातील गाड्यांचे आवाज व्यवस्थित ऐकू येत होते. शिवाय संध्याकाळच्या प्रसंगी आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी चाललेली पक्ष्यांची किलबिलही व्यवस्थित ऐकून येत होती. पंधरा-वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर काही घरे दिसून आली आणि तिथूनच दूरवर ते छोटेखानी मंदिर दिसून येत होते. तिथे जाण्याचा रस्ता फार बिकट नव्हता. एका छोट्याशा टेकडीच्या कडेकडेने मार्ग काढत मी मंदिराच्या दिशेने निघालो. थोड्याच अंतरावर टेकडी संपली आणि पुन्हा पश्चिमेकडे जाणारा सूर्य व्यवस्थित दिसायला लागला. एव्हाना मी पूर्णपणे घाटमाथ्यावर आलेलो होतो. खालचा रस्ता आता व्यवस्थित दिसत होता. वाहतुकीची हालचालही लक्षात येत होती. या ठिकाणी एक विस्तीर्ण माळरान दिसून आले. अनेक गुरे इथे चरत होती. पावसाळा संपून केवळ एकच महिना झाला होता. त्यामुळे गवत बऱ्यापैकी ओले व दाट होते. त्यातली पायवाट मात्र व्यवस्थित दिसत होती. कदाचित या रस्त्यावरून सातत्याने ये-जा होत असावी, असे वाटले. मंदिर आता खूपच जवळ आले होते. दोनच मिनिटाच्या प्रवासानंतर मी मंदिराच्या जवळ पोहोचलो. अतिशय छोटा उंचवटा व त्यावर बांधलेले ते मंदिर खूप सुंदर भासत होते. थोड्याच अंतरावर काहीशी झाडी दिसू लागली. शिवाय अजूनही परिसर निर्जन होता. मंदिराच्या प्रवेशद्वारी एक श्वान कदाचित त्याचे रक्षण करत असताना दिसत होता. दूरदूरवर केवर माळरान दिसत होते. मी घाटाच्या डोंगरांच्या बरोबर मागच्या बाजूला आलेलो होतो. एक नितांत शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळाली. तिचा आनंद घेत पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. परत फिरताना घाटाचा व्यवस्थित अंदाज येत होता. डोंगराच्या दिशेने जाऊन रस्त्यांची पाहणी केली. झाडी फारशी नव्हतीच. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून घाटातील वळणदार रस्ते व्यवस्थित दिसत होते. माळशेज घाटापुढे या घाटाची उंची तशी काहीच जाणवली नाही. पण एका आगळ्या वेगळ्या वाटेने डोंगरमाथ्यावर फिरण्याचा आनंद मात्र घेता आला.
Friday, May 7, 2021
कानिफनाथाच्या डोंगरावर
हायवेवरून दुरच्या डोंगरावर असणारं ते मंदिर बऱ्याचदा मी पाहिलं होतं. पण
तिथे जाण्याचा निश्चित रस्ता माहीत नव्हता. अशावेळी गुगल मॅप पुन्हा मदतीला
धावला. आळे गावाच्या बरोबर मागच्या डोंगरांमध्ये असणारं ते मंदिर गुगल
मॅपवर शोधून काढलं. हे मंदिर होतं कानिफनाथाचं आणि गाव होतं कोळवाडी.
दुपारचं ऊन ओसरल्यानंतर आळे गावात प्रवेश केला. इथून एक रस्ता संत
ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिराकडे अर्थात संतवाडीच्या दिशेने जातो.
याच रस्त्यावर थोड्या अंतरावर एक फाटा उजवीकडे कोळवाडीच्या दिशेने जातो. हे
वळण घेतलं आणि समोरच्या डोंगरावर कानिफनाथाचे ते मंदिर दिसून यायला लागलं.
मुख्य फाट्यापासून सुमारे दोन किलोमीटरवर कोळवाडी गाव असावं. गावात
पोहोचल्यावर पुनश्च एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. हा
डांबरी रस्ता नसला तरी त्याची स्थिती बर्यापैकी चांगली होती. आजूबाजूला
फक्त शेतीच शेती नजरेत येत होती. दहा मिनिटांमध्ये मी डोंगराच्या पायथ्याशी
असणाऱ्या एका जंगलामध्ये पोहोचलो. इथे पुर्णतः शांतता होती. फक्त झाडांवर
फिरणाऱ्या पक्ष्यांचे आवाज येत होते. मानवी अस्तित्वाचा कोणताच आवाज ऐकू
आला नाही. जंगलाच्या सुरुवातीलाच गाडी पार्क केली आणि पदभ्रमंतीला सुरुवात
केली. वारा नसल्यामुळे जंगलातील सर्व झाडे स्तब्ध होती. थोड्याच वेळामध्ये
जंगल संपले आणि डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच
सिमेंटच्या पायऱ्या याठिकाणी बनवलेल्या दिसून आल्या. कदाचित या मार्गाने
नियमितपणे गावकरी डोंगरावर कानिफनाथांच्या दर्शनाला जात असावेत. थोडं चढुन
गेल्यावर पायवाट आणखीन मळलेली दिसून आली. पायऱ्या संपल्या होत्या. पण
दगडांच्या साहाय्याने अनेक ठिकाणी पायऱ्या निर्मिल्याच्या दिसून येत
होत्या. झाडांची गर्दी कमी झाली होती. पण डोंगरावरून आलेले मोठमोठाले दगड
रस्त्यामध्ये दिसून येत होते. पावसाळ्यात याच मार्गाने पाणी खाली येत
असावे, असेही भासत होते. वाट उत्तम आणि वळणावळणाची होती. सूर्य मावळतीकडे
झुकत होता आणि मी सूर्याच्या विरुद्ध दिशेने डोंगरावर चढत चाललो होतो.
उन्हाची तीव्रता कमी झाली असल्याने दमछाक होत नव्हती. अगदी पंधरा
मिनिटांमध्येच डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. येथून आजूबाजूचा
विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. शिवाय दूरवर सूर्यकिरणांचा
अभिषेक होत असलेला नारायणगड किल्लाही व्यवस्थित दिसत होता. सूर्यकिरणांच्या
वर्षावामुळे आजूबाजूचा परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामुळे मध्यभागी
असलेला नारायणगड अधिक उठून दिसत होता. पहिला डोंगर संपल्यानंतर थोडीशी
सपाटी लागली आणि पुढच्या चढाकडे मार्गक्रमण चालू केले. इथपर्यंत पायवाट
अतिशय चांगली होती. पुढची पायवाट काही शांत जंगलातल्या रस्त्याने पुढे जात
होती. चढण सुरु झाली नि पायर्यांची रचना केलेला रस्ता दिसू लागला.
डोंगराच्या वरच्या भागात असलेले हे जंगल पायथ्यापासूनही व्यवस्थित दिसत
होते. इथे पोहोचल्यावर मात्र त्याची शीतलता मन प्रसन्न करून गेली. आता
चढाईचा रस्ता सुरू झाला होता. ही चढण आधीच्या सर्व चढणीपेक्षा अधिक तीव्र
होती. परंतु पायर्यांचा मार्ग असल्याने ती अवघड जाणवत नव्हती. आजूबाजूला
उगवलेले गवत अजूनही आपला हिरवा रंग ठेवूनच होते. वळणावळणाची ती वाट हळूहळू
डोंगरमाथ्याकडे जाऊ लागली. अतिउच्च माथ्यावर पोहोचल्यावर वरील मंदिराचे
अस्तित्व झाडीतून दिसायला लागले होते. डोंगराच्या पूर्ण माथ्यावर आलो
तेव्हा पुन्हा सूर्यकिरणे अंगावर पडायला लागली व समोरच पूर्ण मंदिर स्पष्ट
दिसायला लागलं. अलीकडच्या काळातच त्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार झाला
असावा, असे दिसले. शेजारीच रहाण्यासाठी एक छोटेसे झोपडीवजा घर दिसून आले.
मी मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा आजूबाजूला कोणीही नव्हते. एव्हाना मागच्या
बाजूचा परिसरही दिसायला लागला होता. मागील बाजूस बऱ्याच अंतरापर्यंत झाडीच
झाडी दिसून आली. जंगलाची घनता मात्र अधिक नव्हती. शिवाय त्या बाजूने
डोंगरावर उतरण्यासाठी एक पायवाट जाताना दिसली. समोरच्या डोंगरावर दूरवर एक
छोटेखानी दर्गा दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून हे दोन्ही डोंगर सलग
वाटत होते. परंतु इथे आल्यावर ते एकमेकांपासून वेगळे असल्याचे दिसले.
समोरच्या डोंगरावरील दर्ग्याकडे जाण्यासाठी कानिफनाथांचा हा डोंगर पूर्ण
उतरून समोरचा डोंगर चढावे लागत होते. पायवाटेने थोडे खाली उतरलो आणि उजव्या
बाजूला एका भव्य पाषाण नजरेस पडला. तिथे बसून समोरचा विस्तीर्ण परिसर
न्याहाळता येऊ शकत होता. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही एक सर्वोत्तम
अशी जागा होती. सूर्य बऱ्यापैकी पश्चिम क्षितिजाकडे झुकलेला होता. त्यामुळे
सूर्याची कोवळी किरणे अंगावर तीव्रतेने पडत नव्हती. या ठिकाणी बसून समोरचा
परिसर तासनतास न्याहाळत बसावा, असे वाटत होते. पण दहा मिनिटांमध्ये मी घरी
लवकर जायचे म्हणून तेथून काढता पाय घेतला. पुन्हा मंदिरापाशी आलो तोवर
कोणीतरी वाटसरू मंदिरात आल्याचा दिसला. मंदिराच्या मागच्या बाजूने पुन्हा
परतीच्या वाटेला लागलो. उतरताना मात्र फारसे कष्ट पडले नाहीत. परंतु एक
सुंदरश्या ट्रेकचा आनंद घेतल्याचे समाधान मात्र लाभले.
#ऑक्टोबर #२०२०
Monday, April 26, 2021
पुनेवाडी
Monday, March 1, 2021
कुंजरगडाचे भुयार
फारसे अवशेष नसलेल्या किल्ल्यांवर काहीतरी वेगळं सापडणं म्हणजे पर्वणीच असते. प्रत्येक किल्ल्याचा स्वतःचं काहीतरी निराळं वैशिष्ट्य असतं. नसलं तरी कधी कधी ते अचानकपणे सापडतही. अकोले तालुक्यातल्या टोकावर वसलेल्या फोफसंडी या गावातील कुंजरगडावर आम्हाला काहीसा असाच अनुभव आला. किल्ल्यावर तटबंदीचे फारसे अवशेष शिल्लक नाहीत. जे आहेत ते ही पूर्णतः ढासाळलेल्या स्थितीमध्ये आहेत. ज्या बाजूने आम्ही किल्ल्यावर चढलो तिथून तुटलेला बुरुज दिसून येतो. परंतु किल्ल्याचा महादरवाजा हा पूर्व दिशेला मध्यभागी आहे. इथून मळलेली पायवाट वर येते. यावरूनच कदाचित इथेच महादरवाजा असावा असे दिसते. या रस्त्याने खाली गेलं की थोडी झाडी सुरू होते. हा रस्ता थेट विहीर नावाच्या गावाकडे जातो. इथूनच एक पायवाट उजवीकडे फोफसंडी गावाकडे जाते. ज्या ठिकाणी हे दोन्ही रस्ते एकत्र येतात तिथे कुंजरगडाला एक भव्य नैसर्गिक गुहा तयार झालेली आहे. ऋतू कोणताही असो सह्याद्रीतल्या दर्या-खोर्यात वाहणारा गार वारा या ठिकाणी मनाला शांत करतो. समोरच्या विस्तीर्ण डोंगररांगा येथून न्याहाळता येतात. तसेच मांडवी नदीच्या उगमस्थानी तिचा खळाळता प्रवाहदेखील ऐकू येतो. याच गुहेला लागून थोड्या अंतरावर एक मानवनिर्मित भुयार तयार केलेले आहे. ते दिसतं अगदी एखाद्या लेण्यांसारखं! हे भुयार म्हणजे कुंजरगडाला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी केलेला एक मार्गच आहे. पूर्वेकडे त्याची व्याप्ती मोठी असली तरी पश्चिमेकडे जाण्यासाठी केवळ एका माणसाच्या आकाराचे भुयार आहे. त्यातून थोडीशी कसरत करत पुढे गेले की, हरिश्चंद्रगडाच्या बाजूचा संपूर्ण सह्याद्री नजरेस पडतो. समोर विहीर गावही दिसून येते किल्ल्याच्या दोनही बाजूंना एकाच वेळी नजर ठेवण्यासाठी कदाचित या भुयाराची निर्मिती केली गेली असावी. असे वैशिष्ट्यपूर्ण भुयार केवळ याच किल्ल्यावर आम्हाला दिसून आले. पावसाळ्यात त्यात बऱ्यापैकी पाणी भरलेले असते. परंतु आपण चालत जाऊन पलीकडच्या दिशेने निश्चितच पाहू शकतो.
Saturday, February 13, 2021
इतिहासाचे भीष्माचार्य: वा. सी. बेंद्रे
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये इतिहास या विषयाच्या अभ्यासाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. किंबहुना महाराष्ट्रीय समाज आपल्या इतिहासापासून बराचसा वंचित होता. या काळात वि. का. राजवाडेंसारख्या इतिहासकारांनी शास्त्रशुद्ध इतिहास लेखनास सुरुवात केली. त्यांचाच वारसा चालवणारे इतिहास संशोधक लेखक व अभ्यासक म्हणजे वा. सी. बेंद्रे अर्थात वासुदेव सीताराम बेंद्रे होय.
इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून वा. सी. बेंद्रे यांची ओळख आहे. इतिहास कसा अभ्यासावा व त्याची लिखाण पद्धती कशी असावी? याची शास्त्रशुद्ध रचना व मार्गदर्शन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केल्यास बेंद्रे यांचे अतिशय बहुमूल्य योगदान आपल्याला दिसून येते. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९६ मध्ये रायगड जिल्ह्यातील पेण येथे झाला. त्यांचे एकंदरीत कार्य पाहता महाराष्ट्राच्या भूमी जन्मल्याचे भाग्य मराठी भाषिकांना लाभले, असेच म्हणावे लागेल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात शिवजयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो. महाराष्ट्रभर किंबहुना पूर्ण भारतात व जगभरात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे व प्रतिमा आहेत. आज शिवाजी महाराज कसे दिसतात? हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, शंभर वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. महाराष्ट्र पाठ्यमंडळाच्या इतिहासाच्या पुस्तकात निकोलावो मनुची या प्रवाशाने 'इब्राहिम खान' या सरदाराचे काढलेले चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून छापले जात होते. त्या काळात शिवाजी महाराज यांचे हेच एकमेव चित्र अस्तित्वात होते. परंतु, वा. सी. बेंद्रे यांनी या चित्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, शिवाजी महाराजांच्या भोवती सर्व मुस्लिम सैनिक दिसत आहेत. यावरून ते शिवरायांचे चित्र नक्कीच नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते, हे शोधण्याचा बेंद्रे यांनी प्रयत्न केला. इतिहासाचे विविध ग्रंथ चाळत असताना त्यांना मॅकेंझीने संपादित केलेल्या ग्रंथाचा भाग हाती लागला. इसवी सन १६६४ च्या सुरत मोहिमेच्या वेळी डच गव्हर्नर व्हॅलेंटाईन आणि शिवाजी महाराजांच्या भेटीदरम्यान यांचे काढलेले चित्र व व्हॅलेंटाईनचे पत्र वा. सी. बेंद्रे यांना या ग्रंथात मिळाले. शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक वर्णन व सदर चित्र जुळवल्यास हे चित्र शिवाजी महाराजांचे आहे, याची त्यांना खात्री पटली. याच चित्राचा आधार घेऊन आज अस्तित्वात असणारी शिवाजी महाराजांची विविध चित्रे तयार करण्यात आलेली आहेत.
शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर खऱ्या अर्थाने प्रकाशझोत टाकण्याचे कार्य वा. सी. बेंद्रे यांनी केले. अनेक वर्षांपासून शिवपुत्र संभाजी म्हणजे व्यसनाधीन, व्याभिचारी, दुर्वर्तनी असा विविध नाटककारांनी तसेच कवींनी जनमानसासमोर रेखाटला होता. बेंद्रे यांसारख्या हाडाच्या इतिहासकाराला ही गोष्ट पटली नाही. म्हणूनच त्यांनी संभाजी महाराजांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. भारतामध्ये शिवकालीन इतिहासाची साधने फारशी उपलब्ध नसल्याने त्यांनी युरोपियन साधनांचा जसे इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज साधनांचा अभ्यास करून संभाजी महाराजांचे चरित्र पूर्ण केले. यासाठी त्यांना जवळपास चाळीस वर्षे लागली! इसवी सन १९६० मध्ये बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचे पहिले शास्त्रशुद्ध चरित्र मराठी माणसांसमोर आणले. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने मराठी जनांना समजली. छत्रपती संभाजी म्हणजे पराक्रमी, धोरणी, मुत्सद्दी, स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, संस्कृत जाणकार अशा विविध रूपाने महाराष्ट्राला समजला. त्यांच्या जीवनातील सर्व विसंगती व कल्पोकल्पित कथा बेंद्रे यांनी खोडून काढल्या. इतिहासाचे पान न पान चाळून त्यांनी हे चरित्र लिहिले होते. याच चरित्राचा आधार घेऊन संभाजी महाराजांवर अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या व आजच्या काळातील चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका लिहिल्या गेल्या आहेत. बेंद्रे यांचे हे योगदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही. संभाजी महाराजांच्या मुळ समाधीचा शोधही वा. सी. बेंद्रे यांनीच लावला आहे. प्रारंभी संभाजी महाराजांची समाधी तुळापुर येथे आहे, असे समजले जात होते. परंतु, कालांतराने अनेक ऐतिहासिक संदर्भ शोधल्यानंतर विविध पुराव्यांच्या आधारे ही समाधी वढू बुद्रुक या गावापाशी आहे, असे बेंद्रे यांच्या लक्षात आले. आज त्या समाधीचे सुशोभीकरण करून उत्कृष्ट स्मारक करण्यात आलेले आहे.
केवळ छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी या विषयांचेच नाही तर मालोजीराजे, शहाजी राजे तसेच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे आणि छत्रपती राजाराम राजे यांचे चरित्र देखील वा. सी. बेंद्रे यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिले आहे. याशिवाय कुतुबशाही व आदिलशाही सारख्या मुसलमानी शाह्यांचे देखील मराठीत लेखन करण्याचे कार्य वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. इतिहासकार कसा असावा? याचा वस्तुनिष्ठ पाठ बेंद्रे यांनी घालून दिला. इतिहास म्हणजे कादंबरी नाही, इतिहास म्हणजे नाटकही नाही, आजच्या परिभाषेत चित्रपट किंवा मालिकाही नाही. तर इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने पुराव्यांचा आधार घेऊन लिहिलेला असतो, हेच वा. सी. बेंद्रे यांच्या लिखाणातून प्रतीत झाले. इतिहास कसा लिहावा, त्याचा अभ्यास कसा करावा, याची शास्त्रशुद्ध पद्धती मार्गदर्शक रूपाने त्यांनी "साधन चिकित्सा" नावाच्या पुस्तकामध्ये केली आहे. इतिहास संशोधकांची ती गीता मानली जाते. आज वा. सी. बेंद्रे यांची १२५ वी जयंती आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांच्या इतिहास संशोधनात मोलाची कामगिरी केलेल्या बेंद्रेंना महाराष्ट्रीय जनता सदैव स्मरणात ठेवेल, अशी आशा वाटते.
![]() |
| इब्राहिम खानचे चित्र |
![]() |
| बेंद्रेंनी शोधलेले शिवाजी महाराजांचे पहिले चित्र |





























