आळेफाट्याकडून माळशेजच्या दिशेने जाताना पिंपळगाव जोगा धरण लागलं की वातावरणामध्ये थंडावा तयार होताना जाणवतो. उजव्या बाजूला दिसणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि त्याच्या पायथ्याशी सातत्याने झुळझुळणारे पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पाहिलं की मन प्रसन्न होतं.
मढ गाव संपलं आणि वेळखिंडीतून खाली उतरलो की हरिश्चंद्रगडाच्या अजस्त्र डोंगररांगा दूरवर नजरेस पडतात. वाटत राहतं खिरेश्वर मार्गे टोलारखिंडीतून उतरावं आणि हरिश्चंद्रगडाच्या निसर्ग कुशीमध्ये स्वतःला सामावून घ्यावे. वर्षा ऋतूमध्ये हा परिसर हिरवाईने भरायला लागतो. यावर्षी तर कमालच झाली. अगदी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. याच कारणास्तव माळशेज घाटाच्या अलीकडील हा सर्व परिसर हिरवं लेणं अंगावर घेऊन डोलू लागला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली. मध्येच ढगांची सावली आणि ऊन यांचा खेळ चालू झाला होता. डोंगरमाथ्यावर असल्याकारणाने माळशेज घाटाचा हा परिसर सातत्याने ऊनपावसाचे लपंडाव अनुभवत असतो. त्या दिवशी देखील हीच परिस्थिती होती. डावीकडे सिंदोळा किल्ला मग उधळा डोंगर न्याहाळत आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या रिसॉर्टपाशी पोहोचलो. या रिसॉर्टच्या मागच्याच बाजूला… खरंतर पुढच्या बाजूला बरीच मोकळी जागा आहे. इथून माळशेज घाटाचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य परिसर न्याहाळता येतो. उंच उंच डोंगर आणि त्याच्या मध्याहून कोरलेला घाट, वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्यांवरून हळूहळू पुढे सरकत चाललेल्या गाड्या दूरपर्यंत पाहता येतात. माळशेज घाट चढून येणारे प्रवासी प्रामुख्याने घाटाचे ते दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. पावसाळ्यात ही संधी सहसा कोणी सोडत नाही. त्यादिवशी देखील अशीच गर्दी येथे दिसून आली. पाऊस पडून गेला होता. अधून मधून ढगांच्या आडून ऊन डोकावत होतं. थोडं पुढे चालत गेलं की डोंगरकड्याच्या एका ठिकाणी वाऱ्याचा भयंकर झोत वरच्या दिशेने जात असतो.. दरवेळेस हा आम्ही अनुभव घेतोच. घाटाच्या जंगलांमधून वरच्या दिशेने वाहणारे वेगवान वारे या बिंदूपाशी एकवटतात आणि वेगाने ढगांच्या दिशेने जातात. या वाऱ्यांमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू कड्यावरून खाली जात नाही. ती अतिशय वेगाने वरच्या दिशेने फेकली जाते. आणि तिला जर वजन नसेल तर अगदी रिसॉर्टपर्यंत देखील ती उडून जाऊ शकते! हा आमचा इथला नेहमीचा खेळ. त्यादिवशी देखील पुन्हा एकदा खेळून पाहिला. निसर्गात तयार होणाऱ्या अशा छोट्या छोट्या गमती अनुभवायला देखील एक वेगळीच मजा असते. घाटामध्ये एका ठिकाणी वनविभागातर्फे काही दृश्यबिंदू तयार केलेले आहेत. या ठिकाणावरून देखील माळशेज घाटातील हा परिसर इथली माणसं पाहता येतात. खालच्या त्या घनदाट जंगलामध्ये आपल्या दृष्टीद्वारे स्वतःला सामावता येते.
समोरच्या हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांवर सातत्याने ढगांची गर्दी त्या दिवशी देखील दिसून येत होती. वाऱ्याच्या प्रवाहासोबतच ढग प्रवास करत होते. अचानक वाऱ्यांचे वेग वाढू लागले, ढगांची गर्दी देखील झाली आणि वर्षाधारा कोसळू लागल्या. यावर्षी माझ्या अंगावर अनुभवलेला तो पहिलाच पाऊस. अगदी चिंब भिजून गेलो. निसर्गाचा दरवर्षीचा अविष्कार पाहण्यासाठी मी सज्ज झालो होतो. यावर्षीचा हा पहिला अनुभव. कदाचित येथून पुढे देखील वर्षा ऋतूतील हा अनुभव पुन्हा शरीर सुखावून जाईल, हे निश्चित.
Monday, June 16, 2025
माळशेज व्ह्यू पॉईंट, एमटीडीसी रिसॉर्ट
Saturday, June 14, 2025
ओझर आणि येडगाव धरण
अष्टविनायकांपैकी विघ्नहर गणेशाचे स्थान म्हणजे जुन्नर जवळील ओझर होय. या मंदिरामध्ये आमचे सातत्याने येणे जाणे असतेच. परंतु ओझर गाव ज्या कुकडी नदीच्या आणि येडगाव धरणाच्या काठावर वसलेले आहे, तिथले निसर्ग सौंदर्य पाहत राहणे म्हणजे पर्वणीच असते. येडगाव धरणाच्या बॅकवॉटर परिसरात अजूनही पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाणी साठलेले दिसते. नेहमीच पक्षांची रेलचेल दिसते. त्या दिवशी संध्याकाळी आकाशामध्ये अंधार होण्यापूर्वी घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांचे थवे सातत्याने दिसत होते. पश्चिमेकडे शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या बाजूलाच सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत चालला होता. शिवनेरी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोनेरी किरणांची उधळण दिसून येत होती. त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला अर्थात पूर्वेकडे दूरवर नारायणगड किल्ला देखील हळूहळू अंधारामध्ये गुडूप होताना दिसत होता. धरणातील पाणी मात्र शांत होते. टक लावून ऐकलं की आजूबाजूच्या परिसरातील पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. मागच्या बाजूला गणपती मंदिराततील गजबजाट ऐकू येत असला तरी नैसर्गिक आवाजांची साथ मात्र कानावर सातत्याने पडतच राहत होती. संध्याकाळ आणि सकाळ या दोन्ही प्रसंगी निसर्गामध्ये जो ताजेपणा असतो तो अनुभवताना मनाला एक वेगळीच उभारी येते. असं वाटत राहतं की, हा काळ संपूच नये. संध्याकाळ अंधाराकडे जरी नेत असली तरी ती आपल्या शरीराला सकारात्मकतेची ऊर्जा प्रदान करत असते. या ऊर्जेच्या आधारावरच आपण अंधार स्वीकारू लागतो आणि प्रतीक्षा करत असतो उद्या पुन्हा उजाडण्याची. हे निसर्गचक्र अनुभवने म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते, हे निश्चित.
Wednesday, June 11, 2025
आंबेनळी घाट
जवळपास अडीच ते तीन तासांचा गोवा-मुंबई महामार्गावरचा प्रवास करत आम्ही पोलादपूरला पोहोचलो. यावेळी पुण्यामध्ये परतण्यासाठी आंबेनळी घाटाचा पर्याय निवडला. यापूर्वी देखील मी स्वतः या घाटातून कधीच उतरलो अथवा चढलो नव्हतो. त्या दिवशी माझा हा पहिलाच अनुभव होता. कोकणातील दमट वातावरण आणि प्रखर सूर्यकिरणांना मागे टाकत आमची गाडी घाटाच्या दिशेने निघाली. अगदी थोड्याच अंतरावर घाट रस्त्याचा प्रवास देखील चालू झाला. आजूबाजूची हिरवीगार झाडी नागमोडी वळणांनी पार करत हळूहळू चढाच्या दिशेने आम्ही चाललो होतो. 20 ते 25 मिनिटांमध्येच मानवी वस्ती बऱ्यापैकी मागे पडली आणि सह्याद्रीच्या जंगलांमध्ये आमचा प्रवेश झाला. त्या दिवशी घाटामध्ये फारशी वाहतूक नव्हती. अगदीच महाबळेश्वर पाचगणी किंवा वाईला जाणारी वाहने अथवा येणारी वाहने अधून मधून दिसून यायची. परिसरातील वनराजी बऱ्यापैकी दाट होती. कोकणात उतरणाऱ्या अन्य घाटांपेक्षा ती निश्चितच घनदाट वाटत होती. सह्याद्रीच्या अशा जंगलांमधून प्रवास करताना तेथील नैसर्गिक हवा अंगावर घेताना जी शीतलता अनुभवता येते ती निश्चितच मन सुखावणारी असते. त्यादिवशी देखील माझी काही वेगळी भावना नव्हती. जवळपास मध्यापर्यंत घाट चढून आल्यावर एका वळणावरती उंच गगनाला भिडलेला शिवरायांचा प्रतापगड नजरेस पडला. या किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी मार्ग झालेला आहे. त्यामुळे त्याची उंची इतकी जाणवत नाही. परंतु आंबेनळी घाटाच्या या बाजूने प्रतापगडाचे रौद्ररूप मात्र मनात भरले. साडेतीनशे वर्षांपूर्वी याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 दातांचा बोकड कापला होता याची वारंवार आठवण येत राहिली. शिवाजी महाराजांनी त्याकाळी या किल्ल्याची का निवड केली असावी? याचे उत्तर मात्र मला मिळाले. किल्ल्याभोवती असणार जावळीचं घनदाट जंगल म्हणजे या परिसराचं नैसर्गिक संरक्षणच होतं.
घाट चढून जवळपास सपाटीला आल्यावर आम्ही बऱ्यापैकी उंची गाठलेली आहे याची जाणीव झाली. ठीक ठिकाणी वळणावर उंच कडा वाहने सावकाश चालवा अशा पाट्या लावलेल्या दिसल्या. कोकणात उतरणाऱ्या अन्य कुठल्याही घाटात अशा प्रकारची पाटी दिसली नाही. शिवाय वरून पाहिल्यावरती खालच्या बाजूला खोल खोल दर्या दिसत होत्या. कदाचित हा सर्वात उंचीवरचा घाट असावा. अनेकदा अरुंद रस्त्यांवर गाडी चालवताना येथे धडकी देखील भरते. जिथवर नजर जाईल तिथपर्यंत केवळ जंगलच जंगल नजरेस पडत होतं. रायगड जिल्ह्याची हद्द संपून आम्ही सातारा जिल्ह्यात अर्थात महाबळेश्वर मध्ये प्रवेश केला. आणि लगेचच थंडगार वाऱ्यांनी आमचे सहर्ष स्वागत केले. महाबळेश्वरला पोहोचलो तोवर वातावरणात बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. आजूबाजूच्या घनदाट वनराईमुळे थंडगार वाऱ्याचे झोप अंगावर घेत आम्ही वाईच्या दिशेने प्रस्थान केले.
--- तुषार भ. कुटे
Thursday, May 22, 2025
खवणे पॅराडाईज
सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला तालुक्यातील खवणे समुद्रकिनाऱ्यावरचा हा आमचा पहिलाच प्रवास. रविवार असल्याने बऱ्यापैकी गर्दी दिसून येत होती. तरीही सिंधुदुर्ग जिल्हा पुणे-मुंबईपासून दूर असल्याने रायगड, रत्नागिरीच्या तुलनेत या ठिकाणी गर्दी बरीच कमी असते. सावंतवाडी वरून निघालो ते थेट खवण्याच्या समुद्रकिनाऱ्याकडेच. किनाऱ्याच्या अलीकडेच उजव्या बाजूला समुद्राच्या बॅकवॉटरच्या दिशेने एक रस्ता खाली उतरतो. या बॅकवॉटरच्या काठावर खवणे पॅराडाईज या होमस्टे मध्ये आम्ही थांबलो होतो. समोर समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये पसरलेली कांदळीवने दिसून येत होती. त्याच्या काठावरच आमचा निवास होता. मागच्या वर्षीपासून इथे कयाकिंग सुरू झालेले आहे. रविवार असल्याकारणाने या तलावसदृश जलवनामध्ये रंगीबेरंगी होड्यांची गर्दी झालेली दिसली. वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले पर्यटक अतिशय उत्साहाने वल्हे मारत होड्या चालवत होते. आजूबाजूने कांदळी वनाने वेढलेल्या त्या जलसांभारामध्ये या रंगीबेरंगी होड्या विशेष भासत होत्या.
अजून दोन दिवस तरी आमचा या ठिकाणी मुक्काम असणार होता. विशेष म्हणजे मोबाईलला रेंज नव्हती! त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क जणू तुटल्यातच जमा होता. इंटरनेटसुद्धा बंदच. म्हणून समोरच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत राहणं हा एकच उद्योग उरला होता.
Saturday, April 5, 2025
मांगणी देवी मंदिर
जवळपास दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा हडसर किल्ल्यावर गिर्यारोहण करण्याची संधी मिळाली. वातावरण पावसाळी होते. त्यामुळे आजूबाजूचा पूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजावरून समोरच्या हिरव्यागार डोंगररांगा ढगांच्या गर्दीमध्ये न्याहाळताना एका टोकावर एक मंदिर दृष्टीस पडले. हे मांगणी देवी मंदिर. तेव्हापासूनच या डोंगराच्या टोकावरील मंदिरात जाऊन यावे, असे वाटत होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये योग आला नाही. एक दिवस मी एकट्यानेच या डोंगराच्या टोकावर जाण्याचे ठरवले. मांगणेवाडी हे या डोंगराच्या पायथ्याचे गाव. जुन्नरचा गणेशखिंड घाट याच डोंगरामध्ये आहे. गणेश खिंडीच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराच्या टोकावर मांगणी देवीचे हे मंदिर स्थित आहे.
सकाळच्या प्रहरी साडेसहाच्या दरम्यान गावातून वाट काढत मी डोंगर सर करायला सुरुवात केली. उन्हाळा असल्याकारणाने रस्त्याच्या आजूबाजूला केवळ वाळलेले गवत होते. त्यामुळे वाट देखील व्यवस्थित दिसत होती. परंतु आजूबाजूला चिटपाखरू देखील नव्हते. वळणावळणाच्या त्या रस्त्याने मार्ग काढत मी पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचलो. त्या ठिकाणावरून नाणेघाटापर्यंतच्या डोंगररांगा दृष्टीस येत होत्या. आणि समोरच आणखी एका उंचवट्यावर मांगणी देवीचे मंदिर देखील दिसून आले. अगदी काही मिनिटांमध्येच मी डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर अर्थात मंदिरापाशी पोहोचलो. तिथून दिसणारा नयनरम्य परिसर कदाचित शब्दांमध्ये मांडणे निश्चितच अवघड होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जवळजवळ पूर्ण जुन्नर तालुका, इथले किल्ले, डोंगररांगा, पाणीसाठे तसेच छोटी छोटी गावे स्पष्ट दिसत होती. त्यामुळे इथला व्हिडिओ काढण्याचा मोह मला आवरला नाही.
--- तुषार भ. कुटे



































