कोकणातल्या घाटरस्त्यांवर हे श्वानवंशीय श्वापद आजकाल नेहमीच नजरेस पडते. यावेळेस देखील अणुस्कुरा घाट चढून आल्यावर रस्त्यावर एकही वाहन नव्हते तेव्हा तो रस्त्याच्या शेजारी चहूबाजूला पाहत शांतपणे उभा होता.....
Tuesday, February 25, 2025
Tuesday, February 11, 2025
तुतारी शिल्प
नेहमीचीच सवय असल्याने सकाळी सहा वाजताच जाग आली. सावंतवाडीच्या एका छोट्या हॉटेलमध्ये आम्ही काल थांबलो होतो. झोप तशी चांगली झाली. सकाळी रस्त्यांवर गजबज ऐकू येत होती. मॉर्निंग वॉकसाठी आणि गाडी चार्जिंगला लावण्यासाठी मी बाहेर पडलो. तेव्हा रस्त्यावरील गर्दी पाहून लक्षात आले की, आज नगरपरिषदेने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रस्त्याच्या कडेने अनेक जण स्पर्धेचे टी-शर्ट घेऊन घालून धावताना दिसले. त्यांच्या मधूनच माग काढत मी गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मोती तलावापाशी आलो. मागच्या एका प्रवासामध्ये आम्ही येथून गेल्याची आठवले. आज पहिल्यांदाच हा तलाव व्यवस्थित पाहता आला. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाची आठवण झाली. हा तलाव तितकाचा मोठा नव्हता. त्यादिवशी मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले बहुतांश स्पर्धक याच तलावाभोवती धावताना दिसत होते. त्यांच्या बाजूनेच फुटपाथ वरून मी चालू लागलो. अगदीच थोड्या अंतरावर तलावाच्या आत एक पूल दिसून आला. इथून पुढे गेल्यावर मध्यभागी धातूमधील एक तुतारीचे शिल्प नजरेस पडले. केशवसुतांच्या स्मरणार्थ या शिल्पाची बांधणी येथे केलेली आहे. अर्थात अशा कोनशीला तिथे लावलेल्या दिसल्या. कविवर्य केशवसुत काही काळ सावंतवाडीमध्ये वास्तव्यास होते, असे वाचण्यात आले. सावंतवाडीतील कवी वसंत सावंत यांच्या कविता देखील या ठिकाणी लावलेल्या दिसल्या. त्यांनी सावंतवाडीवर केलेली एक कविता इथे कोनशिलेमध्ये वाचता येते. तलावाच्या बऱ्यापैकी मधोमध हे शिल्प बांधलेले आहे, म्हणून इथून दोन्ही बाजूंचा तलाव व्यवस्थित न्याहाळता येऊ शकतो. त्यादिवशी तलावाभोवती फेरी मारणाऱ्या मॅरेथॉनपटूंचाच गाजावाजा दिसून येत होता. एव्हाना सूर्योदय देखील झालेला नव्हता. त्यांना आयोजक सातत्याने देत असलेल्या सूचना ऐकतच मी तलावाभोवतीच्या मॉर्निंग वॉकचा आनंद घेऊ लागलो!
— तुषार भ. कुटे
Monday, February 3, 2025
सावंतवाडीतील जेवण
सावंतवाडीमध्ये पोहोचलो तोवर दहा वाजत आले होते. अशातच नेहमीच्या हॉटेलमध्ये फक्त एकच रूम रिकामी होती. त्यामुळे त्यांनी सुचवल्याप्रमाणे दुसऱ्या एका हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली आणि दोन रूम्स देखील मिळाल्या. एव्हाना गावातली गर्दी अतिशय कमी झाली होती. आजूबाजूची दुकाने, आस्थापना बंद झालेल्या होत्या. कुठे जेवायला मिळेल की नाही, याची शाश्वती नव्हती. परंतु आधीच माहिती मिळाल्याप्रमाणे सावंतवाडीतल्या भालेकर खानावळीचा पत्ता शोधत आम्ही चालतच निघालो. अगदीच अर्धा किलोमीटर अंतरावर हे हॉटेल असावे. प्रत्यक्ष जेव्हा या ठिकाणी पोहोचलो तेव्हा पाहिले की इथे जेवणासाठी प्रतीक्षा रांगेमध्ये उभे राहावे लागले. हा आमच्यासाठी एक आश्चर्याचा धक्का होता. आतमध्ये सर्व टेबलांवर लोक जेवत बसले होते. बाहेर देखील बऱ्यापैकी गर्दी होती. परंतु आमच्या सुदैवाने पाचच मिनिटांमध्ये आम्हाला जेवणासाठी बसायला टेबल मिळाले. बाहेर रस्त्यांवर अतिशय तुरळक गर्दी आणि इथे हॉटेलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहून थक्क झालो. नेहमीची कोकणी पद्धतीची थाळी ऑर्डर केली. जेवण संपेपर्यंत गर्दी काही कमी झालेली नव्हती. जेवणाची चव तशी चांगली होती. सावंतवाडीच्या या जेवणाचा स्वाद त्या दिवशी पहिल्यांदाच चाखला.
--- तुषार भ. कुटे
Friday, January 31, 2025
आंबोली घाटातून सावंतवाडी
कोल्हापुरातून गाडी चार्ज करून निघालो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत आले होते. कागल-निपाणी-आजरा मार्गे अंबोली घाटातून आज वेंगुर्ल्याला पोहोचायचे होते. महामार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे चालू असल्याने पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केलेली होती, त्यामुळे वाहतूक बऱ्यापैकी मंदावलेली दिसून आली. याच कारणास्तव कोकणात गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी उशीर व्हायला लागला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केला तेव्हा पूर्ण अंधार झाला होता. आंबोलीच्या वळणावळणाच्या जंगलातून आम्ही प्रवास करत चाललो होतो. एव्हाना या रस्त्यांवरील वाहतूक देखील अतिशय तुरळक झाली होती. पोहोचायला उशीर होत असल्याने वेंगुर्लेऐवजी सावंतवाडीलाच थांबू असा विचार आम्ही केला.
यावेळी पहिल्यांदाच मोठ्या घाटप्रवासामध्ये ईव्ही गाडी आम्ही घेऊन गेलो होतो. आंबोली घाट सुरू झाला तेव्हा गाडीची रेंज १५७ किलोमीटर दाखवत होते. इथून सावंतवाडी जवळपास ३० किलोमीटर अंतरावर राहिले होते. घाटामध्ये प्रवास करताना बहुदा एक्सलरेटर जास्त वापरायची गरज पडली नाही. आणि रस्ता पूर्णपणे उताराचा होता. जवळपास एक तासानंतर आम्ही सावंतवाडीमध्ये पोहोचलो. त्यावेळी गाडीची उरलेली रेंज वाढवून तब्बल १८० किलोमीटरची झाली होती. म्हणजेच उताराच्या या रस्त्यावर रीजनरेशनमुळे गाडीची रेंज तब्बल २३ किलोमीटरने वाढली होती! शिवाय आजपर्यंत सर्वात कमी ऊर्जा या प्रवासामध्ये लागल्याचे दिसले. ११५ वॅट प्रतिकिलोमीटरने आमचा हा प्रवास झाला होता. एकंदरीत ऊर्जा मिळवण्यासाठी गाडीने उताराच्या या रस्त्याचा अतिशय सुयोग्य वापर केल्याचे दिसून आले!
Saturday, December 28, 2024
सरसेनापती संताजी घोरपडे समाधी
नरसोबाच्या वाडीतून पंचगंगा आणि कृष्णाच्या संगमावर पोहोचलो तेव्हा समोर पंचगंगेच्या पलीकडे एक ऐतिहासिक स्थळ दिसून आले. लगेचच गुगल मॅपवर तपासून बघितले. हे स्थळ होते सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी. मराठ्यांच्या इतिहासात नावाजलेला हा मावळा सरसेनापती म्हणून मराठी जनतेला परिचित आहेच. त्यांची समाधी कृष्णा-पंचगंगेच्या या संगमावर आहे, याची त्यादिवशी माहिती झाली आणि लगोलग या दिशेने प्रयाण केले. पंचगंगा नदीचा पूल पार करून अगदी पाचच मिनिटांमध्ये मी या ठिकाणी पोहोचलो.
सकाळच्या प्रहरी येथे चिटपाखरू देखील नव्हते. समाधीच्या बाहेर एक गाडी लावलेली दिसली. मी देखील माझी गाडी तिथेच लावली आणि आतमध्ये प्रवेश केला. उजव्या बाजूला दगडामध्ये बांधलेले हे जुने मंदिर दिसून आले. खरंतर ही दोन मंदिर होती. पहिले हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे (ममलकत मदार) यांचे श्री सुब्रमण्यम महादेव कुटुंब पंचायतन मंदिर आणि दुसरे कृष्णा व पंचगंगा संगम तीर्थावर असणारे पुरुष व स्त्री भक्तांना देखील बाराही महिने दर्शन घेता येणारे महाराष्ट्रातील एकमेव श्री कार्तिक स्वामी मंदिर होते. या मंदिरांच्या समोरच ऐतिहासिक वाड्याची रचना असणारी वास्तू होती. त्याच्या मधोमध एक सुंदर प्रवेशद्वार होते. त्यातून खाली नदीच्या दिशेने उतरत गेलो. आणि समोरच पंचगंगा नदीचे दर्शन झाले. डावीकडे नदीच्या पलीकडून नृसिंह मंदिर देखील दिसत होते. आणि समोर पंचगंगेच्या तीरावर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी देखील दिसून आली. त्या दिवशी कोवळ्या उन्हाचा अभिषेक त्या समाधीवर होत होता. तिथेच पायऱ्यांवर बसून राहिलो. संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची आठवण झाली. शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकीच एक संताजी होय. इतिहासात पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तींची जन्मस्थळे आणि स्मारके आपल्याला सातत्याने प्रेरणा देतच राहतात.
स्वराज्याच्या या पराक्रमी मावळ्याला वंदन केले आणि येथील परिसर नजरेस साठवून परतीच्या मार्गाला लागलो.
--- तुषार भ. कुटे




















